32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeआरोग्यबीकेसी जम्बो कोविड सेंटर सुसज्ज नसल्याचा मनसेचा दावा

बीकेसी जम्बो कोविड सेंटर सुसज्ज नसल्याचा मनसेचा दावा

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयात (BKC jumbo Covid Hospital) कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी कोणीही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. (BKC jumbo Covid centre not well-equipped claims MNS) येथील अतिदक्षता विभागात फक्त एक एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध असून बाकी सर्व खोगीर भरती केल्याचा आरोपही मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. बीकेसी कोविड सेंटर प्रशिक्षित तज्ञांनी सुसज्ज नाही. त्यामुळे या केंद्रातील कोविड रुग्णांच्या जीवाला धोका असल्याचे चित्रे यांनी म्हटले असून यासंदर्भात चित्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या गंभीर विषयात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तथापि, रुग्णालयाने चित्रे यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. (Maharashtra Navnirman Sena (MNS) has alleged that the BKC jumbo hospital in Mumbai is not equipped with trained specialists and that the lives of Covid patients at the center are at risk.)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे #CMOMaharashtra यांना लिहिलेल्या पत्रात मनसे नेते अखिल चित्रे यांनी म्हटले आहे की, “बीकेसी कोविड सेंटरच्या अतिदक्षता विभागात तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, अतिदक्षता विभागात फक्त एक एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध आहे. तसेच हृदयरोग आणि अर्धांगवायूच्या उपचारांसाठी हृदय व तज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट उपलब्ध नाहीत. जर एखादा रुग्ण गंभीर झाला तर त्यांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले जाते.”

वाचा – बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयातील सावळागोंधळ आणि रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणा-यांवर कारवाईची मागणी

 

मनसे नेते अखिल चित्रे यांनी ट्विटरवरही हे पत्र पोस्ट केले आहे. या पत्रात ते म्हणतात की, “माननीय @CMOMaharashtra आपल्या व्यस्ततेमुळे पाठवलेल्या पत्राची बहुदा आपण दखल घेणार नाही, म्हणून हे पत्र सार्वजनिक करतोय ( @rajeshtope11 @mybmc ) बीकेसी कोव्हिड सेंटर ICU मध्ये उपचार करणारे ९० टक्के डॉक्टर (BDS,BAMS,BUMS,BHM) आहेत. कृपया यादी तपासून या गंभीर विषयात तातडीने लक्ष घाला”.

वाचा – BKC JUMBO COVID HOSPITAL चा प्रत्यक्ष अनुभव : हे तर मृत्यूचे घर!

 

दरम्यान, मनसे नेते अखिल चित्रे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना बीकेसी जंबो हॉस्पिटलचे डीन राजेश डेरे म्हणाले की, मनसेच्या नेत्याने केलेले आरोप पूर्णपणे निराधार असून गरज भासल्यास ते डॉक्टरांची परेड करण्यास तयार आहेत.

BKC Covid Center : बिकेसी जम्बो कोविड केंद्राचा घोळ, मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला सोपवला, चार दिवस महिलेचा शोध

 

डीन राजेश डेरे म्हणाले, “सध्या बीकेसी सेंटरमध्ये 2,328 बेड आहेत. आमच्याकडे पुरेसे सल्लागार, डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय आहेत ज्यांना त्यांच्या अनुभवांनुसार रूग्णांवर उपचार सुरू करण्यासाठी भरती करण्यात आले आहे. बहुतेक डॉक्टरांचा अनुभव 12+ वर्षे आहे, ”असे ते म्हणाले.

डीन राजेश डेरे म्हणाले, “येथे सुमारे 21,000 रूग्ण बरे झाले आहेत आणि बीकेसी कोविड सेंटरमध्ये घेतलेले उपाय हे सर्वोत्कृष्ट आहेत.”

हे पण वाचा – आधी पॉजिटीव्ह मरणानंतर निगेटीव्ह, दोष नेमका कुणाचा

 

डीननुसार, सध्या बीकेसी कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टरांची यादी खालीलप्रमाणे आहे.

सल्लागार – 30
एमबीबीएस डॉक्टर – 18
बीएएमएस – 115
बीएचएमएस – 93
बीडीएस – 14 (या डॉक्टरांची नेमणूक फक्त प्रशासकीय कामांसाठी केली जाते.)

आयसीयू विभागात पुरेसे विशेषज्ञ नसल्याच्या आरोपावरून डीन म्हणाले की, आयसीयूमध्येही पर्याप्त मनुष्यबळ आहे.

सल्लागार : 21
आरएमओ : 54
नर्स : 95
तंत्रज्ञ : 18
पीसीए : 70

दरम्यान, आमच्या प्रतिनिधीने अधिक चौकशी केली असता येथील डीन डॉ. राजेश डेरे हे स्वत:चे पद सांभाळण्यासाठी सपशेल खोटे बोलत असल्याची प्रतिक्रीया येथील रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. मुळात येथे एकही तज्ञ डॉक्टर कायमस्वरुपी उपलब्ध नाही. जे आहेत त्यांना बीकेसी आणि सेवन हिल्स रुग्णालयातील पेशंट पहावे लागतात. दोन्हीकडे पोहचताना व तेथील रुग्णांची तपासणी करताना या डॉक्टरांची तारांबळ उडत आहे. मात्र डीन डॉ. राजेश डेरे हे याकडे लक्ष न देता ते फक्त वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यात आणि आरोप झाल्यानंतर आम्ही किती छान काम करत आहोत हे दाखवण्यात आपली एनर्जी वाया घालवत आहेत. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून रुग्णांच्या नातेवाईकांचीही परवड होत आहे. तक्रार करायची कोणाकडे आणि केली तरी कोणीही दखल घेत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

बीकेसी जम्बो कोविड सेंटर सुसज्ज नसल्याचा मनसेचा दावा

दरम्यान, बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गलथान कारभार सुरु आहे. एकीकडे कोरोनाने जवळची माणसे हिरावली जात आहेत तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणाने त्यांचे शेवटचे दर्शनही घेणे कुटुंबियांच्या नशीबी आले नाही. बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयातील या सावळागोंधळाची कसून चौकशी करावी आणि हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणा-यांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मालाड येथील भाजपा नगरसेविका योगिता सुनिल कोळी यांनी केली आहे.

बीकेसी जम्बो कोविड केंद्राने घोळ घातल्याने ६७ वर्षीय संगीता सदानंद तनाळकर यांचा अंतिम विधी परब यांनी केला. चार दिवसांनी उघडकीस आले की ७२ वर्षीय रजनी परब या जीवंत असून त्या बीकेसी कोविड सेंटरमध्येच उपचार घेत आहेत. बीकेसी जम्बो कोविड केंद्राने केलेल्या घोळामुळे या दोन्ही कुटुंबांना प्रचंड मानसिक त्रास झाला.

दुसरीकडे महापालिका आर/ साऊथ वॉर रुममधील आरोग्य अधिका-याने कोरोना पॉजिटीव्हचा अहवाल आलेला नसतानाही कांदिवली येथील राजेश्वरी राजेश सावंत या ४१ वर्षीय महिलेला कोविड पॉजिटीव्ह असल्याचे पत्र देत बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयात १० एप्रिल रोजी उपचारासाठी पाठवले. बीकेसी कोवीड सेंटरमधील प्रशासन व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व योग्य उपचार न झाल्याने राजेश्वरी सावंत यांचा १४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर दुस-या दिवशी १५ एप्रिल रोजी राजेश्वरी या कोरोना निगेटीव्ह असल्याचा अहवाल देण्यात आला. कोविड सेंटरमधील डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय आणि प्रशासनाच्या उदासिन व भोंगळ कारभारामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून त्यांचे नातेवाईकही हतबल झाल्याचे पाहायला मिळते.

बीकेसी जम्बो कोविड सेंटर सुसज्ज नसल्याचा मनसेचा दावा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी