संपादकीय

गौतमी पाटीलचा नाच, अन् जळणाऱ्यांचा थयथयाट !

सध्या महाराष्ट्रात अतिशय चिंतेचा आणि जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अख्खा महाराष्ट्र या समस्येमुळे चिंताग्रस्त झालेला आहे. ही समस्या म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil name Controversy). गौतमी पाटीलच्या नृत्यामुळे आतापर्यंत अनेक वाद निर्माण झाले आहेत. आता तिच्या आडनावावरूनही नवा वाद निर्माण झाला आहे. तिने पाटील हे आडनाव लावू नये म्हणून काही मराठा संघटना व त्यांच्या नेत्यांनी इशारे दिले आहेत. जणू काही पाटील या आडनावाचे पेटंट या मराठा संघटनांकडेच आहे. त्यामुळे अन्य कुणाला हे आडनाव वापरता येणार नाही. वापरायचेच असेल तर या स्वयंघोषित मराठा नेत्यांची परवानगी घ्यावी लागेल.

खरेतर, गौतमी पाटील हिचा राज्यभरात मोठा चाहता वर्ग तयार झालेला आहे. नृत्य कार्यक्रमाच्या तिला भरपूर सुपाऱ्या मिळतात. त्यामुळे प्रस्थापित नृत्यांगणांची दुकाने बंद व्हायची वेळ आली आहे. सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे, प्रिया बेर्डे अशा अनेक कलावंतांनी गौतमी पाटील हिच्यावर तोंडसुख घेतले आहे. गौतमीचे नृत्य अश्लिल असल्याचा आरोप घाडगे, बेर्डे, पुणेकर आदींनी केला होता. एवढेच नव्हे तर रसिकांनी गौतमीचे कार्यक्रम पाहू नयेत असे आवाहनही या कलाकारांनी केले होते. त्यांच्या या आवाहनात कलेविषयीची चिंता कमी, अन् गौतमीविषयीची आसूया जास्त दिसत होती.

हे सुद्धा वाचा

गौतमी पाटीलचा नाच, अन् जळणाऱ्यांचा थयथयाट !

वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे बर्थडे बॉयला पडले महागात

पाहुणं जेवला का? म्हणताच 25 लोक शेडसोबत कोसळले; गौतमी पाटील पुन्हा चर्चेत

एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराविषयी निश्चितपणे आसूया असतेच. पण मेघा घाडगे व सहकाऱ्यांनी गाठलेली खालची पातळी ही गौतमीच्या नृत्यापेक्षाही वाईट आहे.

मेघा घाडगे व प्रिया बेर्डे या दोघीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेले रचनात्मक काम महाराष्ट्राला अद्याप तरी ठावूक नाही. परंतु गौतमी पाटील हिचे करिअर बरबाद करण्यासाठी त्यांनी राजकीय पदाचा मात्र निश्चित वापर केला. थेट अजितदादा पवार यांच्याकडे गौतमीची तक्रार त्यांनी केली. अजितदादांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुनावले व गौतमीचे कार्यक्रम घेऊ नयेत अशी तंबी दिली.

मेघा घाडगेंसारख्या कलाकारांना गौतमी पाटीलने जशास तसे उत्तर द्यायला हवे होते. पण या पोरीने नम्रता व विनयता दाखविली. माझ्याकडून चूक झाली हे तिने मान्य केले. येथून पुढे अशी चूक होणार नाही अशी जाहीर हमी दिली. अजितदादांबद्दल तिने आदर व्यक्त केला. मेघा घाडगे व अन्य कलाकारांबद्दल सुद्धा तिने आदर व्यक्त केला.

यश मिळाल्यानंतर सुद्धा किती विनयशिलता असावी हे सुरेखा पुणेकर, प्रिया बेर्डे, मेघा घाडगे यांनीच गौतमी पाटील हिच्याकडून शिकायला हवे. किर्तनकार इंदूरीकर महाराज यांनीही गौतमी पाटीलवर टीका केली होती. त्यावर सुद्धा गौतमी पाटीलने महाराजांविषयी आदर व्यक्त करून आपली भावना मांडली होती.

मुळात अभिनय व नृत्य हे शास्त्रशुद्ध असावे. त्यात अश्लिलता असू नये याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. परंतु मराठीमधील दिग्गज अभिनेत्रींनी लाज वाटावी इतकी हिन कलाकृती यापूर्वी सादर केलेली आहे. यांत धकधक गर्ल माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, सई ताम्हणकर यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. २० – २५ वर्षांपूर्वी अभिनयाच्या माध्यमातून सादर केले जाणारे अंगविक्षेप समाजमान्य झालेले नव्हते. तेव्हा माधुरी दिक्षितने ‘धक धक करने लगा’ या गाण्यावर छाती पुढे करून नृत्य केले. ‘छोली की पिछे क्या है’ याचा शोध घेण्याचे आवाहनही तिने नृत्यातून केले. परंतु तिच्या अभिनयाचे व नृत्य कलेचे नेहमीच तोंड भरून कौतुक केले जाते.

राधिका आपटे हिने तर कळसच केलेला आहे. झाकून ठेवायचे अवयव सुद्धा तिने सताड उघडे करून दाखविले आहेत. पण तरीही तिच्यावर एवढी जोरदार टीका झाली नव्हती. अभिनेत्री विशिष्ट वर्गातील असल्या तर त्यांनी काहीही केले तर त्यामुळे कलेचा विकास होत असतो. गौतमी पाटील ही ‘नाही रे’ या वर्गातून आलेली असल्यामुळे तिचे यश प्रस्थापित कलावंतांना मान्य होणारे नाही.

गौतमी पाटील हिला मिळत असलेले जम्बो यश हे प्रस्थापित कलाकारांची दुकाने बंद करणारे ठरू लागले आहे. खरेतर, या प्रस्थापित कलावंतांनी ‘आपण आऊटडेटेड’ होत चाललो आहोत, हे मान्य करायला हवे. ज्येष्ठेतेचा मान स्विकारून त्यांनी तरूणांना संधी द्यायला हवी. गौतमी पाटीलसारख्या नवतरूणीकडून काही चुकत असेल तर तिला या क्षेत्रातील मान्यवरांनी ज्येष्ठ या नात्याने वडिलकीचे सल्ले द्यायला हवेत. खासगीमध्ये तिला मार्गदर्शन करायला हवे. पण तसे होताना दिसले नाही. गौतमी पाटील हिची जाहीर बदनामी करून तिचे करिअर कसे बरबाद व्हायला हवे यासाठीच या तथाकथित ज्येष्ठ कलावंतांनी प्रयत्न केले.

‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ या म्हणीनुसार सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे व प्रिया बेर्डे यांच्या वक्तव्याने गौतमी पाटीलचे काहीच बिघडले नाही. उलट गौतमी पाटीलची प्रसिद्धी अधिक झाली. तिचे नृत्य खरंच अश्लिल आहे का, हे लोक बारकाईने पाहू लागले.

सुरूवातीचा काही काळ सोडल्यानंतर गौतमी पाटील नव्याने जी काही कला सादर करीत आहे, त्यात फार वावगे वाटावे असे काही दिसत नाही. तिची अदाकारी लोकांवर प्रभाव टाकते. अंग पूर्णपणे झाकलेले तिचे नृत्य पाहिले तरी ते प्रभावीच वाटते. तिच्यात अंगभूत कला असल्याचे जाणवते. तिने अश्लिल व अंगविक्षेपांचा कसलाही आधार घेतला नाही तरी तिचे नृत्य प्रभावीच वाटते. प्रभावी नृत्यासोबतच कमालीचा समजूतदारपणा, इतरांचा आदर करण्याची वृत्ती, विरोधकांविषयी सुद्धा नम्रपणे व आदरयुक्त केलेली तिची वक्तव्ये… अशा सगळ्या बाबींमुळे गौतमी पाटीलने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. या वस्तुस्थितीचा तिच्यावर जळणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांनी विचार करायला हवा.

मालिका कलावंत किरण माने यांनी गौतमी पाटीलचे केलेले समर्थन खरोखरच कौतुकास्पद आहे. किरण माने हे स्पष्टवक्ते व सामाजिक भान असलेले अभिनेते आहेत. जातीचे लेबल लावणाऱ्या मराठा नेत्यांची त्यांनी अनुल्लेखाने कानउघाडणी केली हे बरे झाले.

खरेतर मराठा तरूणांपुढे शिक्षण, करिअर, रोजगार असे अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. आरक्षणासारखे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. अशा सामाजिक प्रश्नांमध्ये लक्ष घालून, सरकारवर दबाव टाकून मराठा समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी या मराठा संघटनांनी ऊर्जा खर्ची घालायला हवी. परंतु उथळ नेत्यांनी गौतमी पाटीलला लक्ष्य केले आहे.

सध्या गौतमी पाटीलचा टीआरपी जोरात आहे. गौतमी पाटील हा शब्द गुगल ट्रेडींगमध्ये सुद्धा जोरात आहे. त्यामुळे गौतमी पाटील हे नाव आपल्या लिखाणातून, तोंडून बाहेर पडले तरी प्रसिद्धी मिळते हे कुणीतरी या मराठा नेत्यांना सांगितलेले असावे. त्यामुळेच त्यांनी गौतमीच्या आडनावावर आक्षेप घेतला.

मी आडनाव बदलणार नाही. हेच आडनाव कायम ठेवणार असल्याचे तिने ठणकावून सांगितले आहे. कायदेशीररित्या प्रत्येकाला आपले नाव, आडनाव काय असावे हे ठरविण्याचा अधिकार आहे. एवढेच नव्हे तर आई वडिलांनी दिलेले नाव सुद्धा बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. त्यामुळे मराठा समाजाने तिच्या आडनावावर कितीही आदळआपट केली तरी जोपर्यंत ती स्वतः ठरवत नाही तोपर्यंत तिचे आडनाव कुणीच बदलू शकत नाही.

मेघा घाडगेंसारखे कलावंत बोंबलून गप्प बसले, तसेच एके दिवशी मराठा नेतेही सुद्धा बोंबलून गप्प बसतील. सध्या तरी गौतमी पाटील हिला सुगीचे दिवस आहेत. नियती गौतमीसोबत आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेला थयथयाट सुद्धा गौतमीला फायदाचाच ठरत आहे.

तुषार खरात

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

10 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

11 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

11 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

11 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

12 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

14 hours ago