34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
HomeराजकीयGoodbye : खडसेंचा भाजपला रामराम! उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Goodbye : खडसेंचा भाजपला रामराम! उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

टीम लय भारी

मुंबई : गेले कित्येक दिवस भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा अखेर संपुष्टात आली आहे. गेली 40 वर्षे भाजपला वाढवणारे खडसे यांनी बुधवारी अखेर भाजपला सोडचिठ्ठी (goodbye) दिली. येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयामुळे राज्यात भाजपला मोठा धक्का बसला असून दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र यामुळे मजबूत होण्यास मदत होणार आहे. खडसे यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा केली असून त्यानुसार त्यांनी पक्षात प्रवेश करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता हा प्रवेश होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी भाजपचा राजीनामा दिला असल्याचे फोनवरून आपल्याला सांगितले. यामुळे हा प्रवेश होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

खडसे यांच्यासोबत त्यांचे नेतृत्व स्वीकारणारे इतर नेते पक्षात येणार आहेत, त्यामुळे काही आजी, माजी आमदार सुद्धा असू शकतात, त्यांची नावे उद्या दिली जातील, असेही पाटील यांनी सांगितले. खडसे यांच्या सोबतच राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपात गेलेल्या तीन चार मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी यावेळी केला. खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे आम्हाला एक जाणकार आणि अनुभवी नेता मिळणार असून त्याचा फायदा पक्ष बळकटीसाठी होईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणा-या नेत्यांचा पक्ष प्रवेश जाहीररीत्या केला जाणार असून त्यासाठी कुठेही विषय अंधारात ठेवला जाणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, हा प्रवेश कधी होईल याविषयीची उत्सुकता राष्ट्रवादी सोबतच भाजपमधील खडसे समर्थकांना लागली होती. याच पक्ष प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत मागील महिन्यात चर्चा केली होती. त्या चर्चेदरम्यान काही नेत्यांनी खडसे यांना पक्षात घेण्याला विरोध दर्शवला होता, तर बहुतांश पदाधिका-यांनी खडसे आल्याने पक्ष मजबूत होईल अशी सूचना केली होती. त्यानंतर अनेकदा खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चर्चा सुरूच होत्या. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे यांचा राष्ट्रवादीत जाहीररित्या प्रवेश होणार आहे. खडसे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव आणि त्या परिसरात बळकट होणार असली तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वेळोवेळी कोंडीत पकडण्यासाठी खडसेंचा मोठा वापर महाविकास आघाडीकडून केला जाण्याची शक्यता आहे. यासाठीच खडसेंना तातडीने विधान परिषदेवर घेऊन त्यांना ग्रामविकास अथवा राष्ट्रवादीकडे असलेले कामगार मंत्रीपद दिले जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या मंत्रीपदामध्ये बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीत येण्यास अनेक भाजप नेते उत्सुक : जयंत पाटील

येणा-या काळात अनेक भूकंप पाहायला मिळतील, एकनाथ खडसेंसोबत येण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. राजीनामा देऊन कोरोना काळात विधानसभा निवडणुका घेणे शक्य नसल्याने हळुहळू त्याबाबत निर्णय होईल. ज्यांना तांत्रिक अडचणी आहेत ते नंतर येतील, एकनाथ खडसेंसोबत कोण येणार याबाबत फारशी चर्चा केली नाही. खडसेंचे नेतृत्व मानणारे, भाजपाकडून ज्यांचा हिरमोड झाला आहे ते सगळी लोक राष्ट्रवादीत येतील असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

कन्येसह खडसे राष्ट्रवादीत जाणार; सून मात्र भाजपमध्येच

एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपमध्येच राहणार असून हा खडसे यांच्या राजकीय खेळीचा भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. रोहिणी खडसे यांनीही बुधवारीच भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

…म्हणून रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार

आपली खासदारकी कायम ठेवण्यासाठी रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणार असल्याचं सांगण्यात येत. राष्ट्रवादीतून खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले भाजपमध्ये गेले होते. मात्र, साता-यात राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याने पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला होता. सध्या जळगावातही तिच परिस्थिती आहे. जळगावमध्ये गिरीश महाजन आणि पर्यायाने भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत गेल्यास पराभवाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती असल्यानेच रक्षा खडसे यांनी तूर्तास भाजपमध्येच राहण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, निवडणूक प्रचारातून भाजप कार्यकर्त्यांनी अंग काढून घेतल्यानं रोहिणी यांना पराभवाचा फटका बसला होता. पक्षांतर्गत दगाबाजीमुळेच रोहिणी खडसेंचा पराभव झाला असून त्याला पक्षातील बडे नेते जबाबदार असल्याचा आरोप खडसेंनी केला होता. रक्षा खडसे या भाजपमधून बाहेर पडल्यास लोकसभेच्या होणा-या पोटनिवडणुकीत असाच दगाफटका होण्याची शक्यता असल्यानेही रक्षा यांना भाजपमध्येच ठेवण्याची खेळी नाथाभाऊंनी खेळल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी