32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रवनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

 

टीम लय भारी

 

मुंबई :- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे (Pooja Chavan) अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार  संजय राठोड  (Sanjay Rathod Resignation) यांनी २८ फेब्रुवारीला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली असून तो आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा तातडीने मंजूर केला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे.

परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. पुण्यातील वानवडी भागात इमारतीतून उडी घेऊन ८ फेब्रुवारी रोजी पूजाने आत्महत्या केली होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्याने आणि त्यात संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले होते. पूजाच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत असा थेट आरोप करत भाजपच्या महिला आघाडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला होता. त्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले.

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संजय राठोड यांना अखेर पायउतार व्हावे लागले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, राठोड यांचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडेच असल्याची बाब बुधवारी पुढे आली आणि पुन्हा एकदा वातावरण तापले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत याबाबत सरकारला जाब विचारला. राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला की नाही याची कल्पना नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांनी तो फ्रेम करण्यासाठी आपल्याकडे ठेवला असेल, असा टोला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता तर राठोडांचा राजीनामा फ्रेम केला नाही तरी चालेल पण कायद्याच्या फ्रेमवर्कनुसार त्यांच्यावर गुन्हे फ्रेम केले गेले पाहिजेत, असे शेलार म्हणाले होते. यावर राष्ट्रवादीने बचावात्मक पवित्रा घेतला होता. राठोडांचा राजीनामा कुठे आहे हे तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालय सांगू शकेल असे उत्तर नवाब मलिक यांनी दिले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक चिघळू न देता मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावर पुढील कार्यवाही केल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी