33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : शरद पवारांचा टोला; ‘ऑक्सफर्ड’नेही परीक्षा रद्द केल्या, राज्यपालांना अधिक...

Sharad Pawar : शरद पवारांचा टोला; ‘ऑक्सफर्ड’नेही परीक्षा रद्द केल्या, राज्यपालांना अधिक माहिती असेल!

टीम लय भारी

दापोली : राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनबरोबर विद्यापीठात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून बरेच वादळ उठले होते. राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यपालांनी परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला.

निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय कोकण दौ-यावर आहेत. पाहणी केल्यानंतर माध्यमांशी पवार यांनी संवाद साधला. नुकसान झालेल्या विभागाची पाहणी केली असता संपूर्ण यंत्रणा सगळ्याच ठिकाणी पोहोचली नाही. त्यामुळे अजूनही प्राथमिक माहिती आपल्याकडे आली असल्याचे प्रशासकीय अधिका-यांनी सांगितले आहे. यात फळबागा, शेती, घरे याची नुकसान झाले आहे. याचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जे नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी, असे पवार म्हणाले.

राज्यात सुरू झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षांवरून शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले, पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला, तर भारतातील नामांकित विद्यापीठे तसेच जगातील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. देशात जर खासगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील, तर शासनाने घेतलेला निर्णय आणि त्यात अगदीच चुकीचे कोणी केले आहे असे होत नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते, असा टोला पवार यांनी लगावला.

कोकणवासीयांना दिलासा

आंबा, नारळ, सुपारी या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई देताना पुढील ७-८ वर्षाचा विचार करून द्यायला हवी, असे पवार म्हणाले. बागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या बागायती जमिनी साफ करायची देखील मोठी अडचण आहे. रोजगार हमीतून फळबाग उत्पादन करण्याची ही योजना पुन्हा लागू केली तर इथला शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ उद्याच याबद्दलची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कोकणवासियांना संकटातून बाहेर काढण्याचा योग्य निर्णय घेतला जाईल. यामध्ये गरज भासल्यास केंद्राकडे जाऊन मदतीची मागणी करू, यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेतील. निसर्ग चक्रीवादळाने सगळ्या भागात नुकसान झाले असतानाही इथला माणूस खचून गेला नाही तर पुन्हा कामाला लागला आहे. पर्यटन क्षेत्रात अनेक नुकसान झाले आहे. या क्षेत्राला उभारी देण्याचा विचार केला जाईल, असा विश्वासही पवार यांनी कोकणवासीयांना दिला.

…तर फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील वादळग्रस्त कोकणचा दौरा करणार आहेत. शरद पवार यांनी फडणवीसांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते कोकणात येणार असतील तर चांगलेच आहे. त्यांच्या ज्ञानात भर पडेल, अशी कोपरखळी पवारांनी लगावली आहे.

पवार यांनी आपल्या खास शैलीत सांगितले की, कोकणात किती नुकसान झाले आहे हे सर्वांना कळले पाहिजे. प्रत्येकजण वेगळ्या भागांतून येतो. मी बारामतीच्या दुष्काळी भागातला आहे. ते नागपुरातले आहेत. समुद्राचा आणि नागपूरचा काही संबंध नाही. त्यामुळे सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल. आमच्याही पडते आहे. त्यांच्याही ज्ञानात भर पडेल, ही चांगली गोष्ट आहे, असे पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी