31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रMPSC परीक्षा पुढे ढकलताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट ; रस्त्यावर उतरून केले आंदोलन

MPSC परीक्षा पुढे ढकलताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट ; रस्त्यावर उतरून केले आंदोलन

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात ठिकठिकाणी सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी व्यक्त नाराजी केली जात आहे. पुणे, कोल्हापूर, जळगाव, नागपूर अशा शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

एमपीएससीची परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. परंतु, सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सरकारने हा निर्णय जाहीर करताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कित्येक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्ष भाजपनेही विद्यार्थ्यांच्या भवितव्याला वेठीस धरणे योग्य नसल्याचे म्हणत महाविकास आघडी सरकारवर टीका केली. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांत एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

पुण्यात विद्यार्थ्यांचा रास्तारोको

एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे. सुरुवातीला अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला होता. पण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

कोल्हापुरात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे पडसाद कोल्हापुरातही उमटले. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. तसेच, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एकत्र येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या प्रकारमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

जळगावात विद्यार्थ्यांचा रास्तारोको

राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे जळगावातील विद्यार्थ्यांनी ही संताप व्यक्त केला. येथे विद्यार्थ्यांनी कोर्ट चौकात जमत रास्ता रोको केला. यावेळी २५०  ते ३०० विद्यार्थी उपस्तथित होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे येथील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

 नागपूर, सांगलीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संताप

सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सरकारच्या या निर्णयाचे पडसाद नागपूर आणि सांगलीमध्ये उमटले. नागपुरात सक्करदरा चौकात जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर सांगलीमध्ये सुद्धा विधार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विध्यार्थी आणि विद्यार्थीनी अपस्थित होत्या. राज्य सरकाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यांनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या काही नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार यांनी परीक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी