35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमुंबईCorona14 : ‘कोरोना’च्या 14 रूग्णांना महापालिकेने सोडले वाऱ्यावर, देखरेखीसाठी एकही कर्मचारी नाही

Corona14 : ‘कोरोना’च्या 14 रूग्णांना महापालिकेने सोडले वाऱ्यावर, देखरेखीसाठी एकही कर्मचारी नाही

टीम लय भारी

मुंबई :  तब्बल १४ ‘कोरोना’ पॉझिटिव्ह ( Corona14 ) असलेल्या रूग्णांना एका इमारतीत वाऱ्यावर सोडून मुंबई महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी निघून गेले आहेत. या रूग्णांची कसलीही काळजी घेतली जात नाही. त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही. अवेळी मिळणारे जेवण अत्यंत निकृष्ट असते. अस्वच्छ पाणी प्यावे लागते. डॉक्टर्स फोन घेत नाहीत. सोशल डिस्टन्शिंगच्या तीन तेरा वाजल्या आहेत. एका ठिकाणाहून दुसरीकडे वरात काढली जाते, अशी खळबळजनक माहिती एका रूग्णाने ‘लय भारी’ला दिली.

या रूग्णाने जी माहिती दिली ती अत्यंत धक्कादायक अशीच होती. आमची ही दयणीय अवस्था मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांपर्यंत पोचवा अशी विनंतीही या रूग्णाने ‘लय भारी’कडे केली.

या रूग्णाने त्यांची संपूर्ण परवडच ‘लय भारी’कडे कथन केली. ते म्हणाले की, आम्ही १४ रूग्ण ( Corona14 ) भांडूप (पश्चिम) येथील रहिवाशी आहोत. त्यांत तब्बल नऊ महिला आहेत. आम्हा १४ जणांपैकी आम्ही नऊ जण एकाच चाळीत राहतो. उरलेले पाचजण आमच्याच परिसरात राहतात. आम्हाला ६ एप्रिल रोजी घरातून कॉरन्टाईन केंद्रात आणले. कांजूरमार्ग (पूर्व) येथील म्हाडाच्या परिवार इमारतीत हे सेंटर उभारले आहे. तिथे आम्हाला ठेवण्यात आले.

दोन दिवस आम्ही तिथेच होतो. ८ एप्रिल रोजी आमची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात आम्ही १४ जण पॉझिटिव्ह ( Corona14 ) आढळलो. त्यानंतर ११ एप्रिल रोजी आम्हाला अंधेरी येथील सेव्हन हिल्स रूग्णालयात नेण्यात आले. तिथे आम्हाला रात्री ७ वाजता नेले होते. पण ११.३० वाजेपर्यंत आतमध्ये घेतलेच नाही. कागदपत्रे नाहीत असे तेथील कर्मचारी सांगत होते.

शेवटी रात्री ११.३० वाजता आतमध्ये घेण्यात आले. रात्रभर उपाशीच राहिलो आम्ही. भूक लागली होती पण जेवण मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडासा नाश्ता मिळाला. त्यानंतर आमच्यावर उपचार सुरू झाले. औषधे दिली गेली. सेव्हन हिल्समधील उपचार पद्धत चांगली होती. जेवणही चांगले होते.

पुन्हा १५ एप्रिल रोजी आमची घशातील स्वॅबची चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल १८ एप्रिल रोजी आला. परंतु या अहवालाबद्दल आम्हाला अद्याप काहीच माहिती दिली गेलेली नाही. आमचा अहवाल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जो काही असेल तो सांगितला तर त्यानुसार आम्हाला काळजी घेता येईल. पण त्याची माहितीच आम्हाला दिली जात नाही.

Corona14 : ‘कोरोना’च्या 14 रूग्णांना महापालिकेने सोडले वाऱ्यावर, देखरेखीसाठी एकही कर्मचारी नाही
निकृष्ट जेवण दिले जाते

त्यानंतर १८ एप्रिल रोजी पुन्हा आम्हाला ( Corona14 ) कांजूरमार्ग (पूर्व) येथील दुसऱ्या इमारतीत आणण्यात आले. गुजराती समाजाचा पंचटी हॉल या ठिकाणी आहे. तिथे आम्हाला सोडून देण्यात आले. पण तिथे कमालीची अस्वच्छता होती. तिथे कचरा साचलेला होता. सगळी अव्यवस्था होती. इथे राहण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही पोलीस अधिकारी आले. त्यांनीही मान्य केली की, येथे राहण्यासाठी स्थिती नाही.

या पोलीस अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. तरीही त्या मच्छर आणि असुविधा असलेल्या स्थितीत आम्ही ( Corona14 ) एक रात्र तिथेच काढली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला कांजूरमार्ग – कर्वेनगर येथील म्हाडा कॉरन्टाईन इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले.

या नव्या ठिकाणी एका खोलीत दोघेजण अशी आमची व्यवस्था करण्यात आली. पण या ठिकाणी सुविधांची दयनीय स्थिती आहे. साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय केलेली नाही. गेल्या सात दिवसांपासून आम्ही बेसिनचे (फिल्टर न केलेले) अस्वच्छ पाणी पीत आहोत. या ठिकाणी जेवण वेळेवर येत नाही. डॉक्टर्सना फोन केला तर ते फोन घेत नाहीत. ते स्वतःही आम्हाला भेटायला येत नाहीत. समोरून फोन सुद्धा करीत नाहीत.

आमच्यातील काहीजणांना थंड पाण्याने आंघोळ सहन होत नाही. पण हिटरची सोय नसल्याने थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागते. सर्वात वाईट प्रकार म्हणजे आम्हाला औषधेही दिली जात नाहीत. आम्ही स्वतःच औषधे विकत घेत आहोत. त्यासाठी नातलगांना औषधे घेऊन या ठिकाणी यावे लागते. त्यांनाही संसर्गापासून अलिप्त ठेवण्याची कसरत आम्हाला करावी लागते. साधे मास्क सुद्धा आम्हाला दिलेले नाही.

काल, शुक्रवारी तर कळसच झाला. संतापजनक प्रकाराला आम्ही सामोरे गेलो. आम्हाला दुपारी १२ वाजता महापालिकेकडून फोन आला. तुम्हाला मुलुंड येथील मीठानगर येथील केंद्रात हलविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी तयारी करण्याची सुचना केली.

आम्ही ( Corona14 ) बॅगा भरून तयारीत होतो. पण दिवसभरात आम्हाला न्यायला कोणीही आले नाही. रात्री ९.३० वाजता एसटी महामंडळाची बस आली. एसटी महामंडळाच्या चालकाला सुरक्षा कीट (पीपीई) नव्हते. त्यामुळे तो बिचारा घाबरून गेला. शेवटी कसाबसा तो न्यायला तयार झाला.

Corona14 : ‘कोरोना’च्या 14 रूग्णांना महापालिकेने सोडले वाऱ्यावर, देखरेखीसाठी एकही कर्मचारी नाही

आणखी दुसऱ्या एका कॉरन्टाईन सेंटरवरून चार जणांना बसमध्ये घेण्यात आले. असे आम्ही १८ जण (त्यात १० महिला) मुलुंडच्या मीठानगर केंद्रावर पोहोचलो. पण प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांनी आम्हाला अडविले. तुम्हाला नेमून दिलेल्या डॉक्टरांना सोबत का आणले नाही अशी विचारणा झाली. तुमच्याकडे कोणतीच कागदपत्रे नाहीत, असाही आक्षेप नोंदविण्यात आला. त्यामुळे ते आतमध्ये घ्यायला तयार होईनात.

काही वेळानंतर मीठानगर सेंटरची जबाबदारी पाहणारे डॉक्टर्स तिथे आले. ‘तुम्ही सध्या पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह आहात हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही आतमध्ये घेऊ शकत नाही’ असे या डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर डॉक्टरांचे महापालिका अधिकाऱ्यांशी बोलणे झाले. आम्हाला मीठानगरला कुणी पाठविले यासंबंधी सगळेच हात वर करायला लागले. कुणीच आमची जबाबदारी घेईनात.

Corona14 : ‘कोरोना’च्या 14 रूग्णांना महापालिकेने सोडले वाऱ्यावर, देखरेखीसाठी एकही कर्मचारी नाही

त्यानंतर कसेबसे आतमध्ये घ्यायचा निर्णय त्यांनी घेतला. पण एका खोलीमध्ये सात ते आठ जणांना राहावे लागेल असे आम्हाला सांगण्यात आले. हा प्रकार धक्कादायक होता. आमच्यापैकीही कुणीही ‘कोरोना’तून बरे होऊच नये. कुणी बरे होण्याच्या मार्गावर असेल तर त्याला दुसऱ्यांकडून लगेच संसर्ग झाला पाहीजे, अशी व्यवस्था केली होती की काय ?

धक्कादायक म्हणजे, या सेंटरवर अगोदरच तब्बल ५८ पॉझिटिव्ह रूग्ण होते. यातील बहुतांश जणांमध्ये ‘कोरोना’ची गंभीर लक्षणे होती. खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे त्यांच्यात होती. त्यातील ३२ जण तर गंभीर होते. त्यांना ऑक्सीजनवर ठेवले होते. तिथे दोन दिवसांपूर्वी एका १५ वर्षाच्या मुलीचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला होता. तिची ‘कोरोना’ग्रस्त आई तिथे रडत होती, अन् तेथील कर्मचाऱ्यांना काहीतरी विनवणी करीत होती.

Corona14 : ‘कोरोना’च्या 14 रूग्णांना महापालिकेने सोडले वाऱ्यावर, देखरेखीसाठी एकही कर्मचारी नाही

दुसऱ्या बाजूला आम्हा १४ जणांमध्ये ( व नव्याने सोबत आलेल्या ४ जणांना) कसलीही लक्षणे नव्हती. आम्ही पूर्णत ठणठणीत होतो. आम्ही लवकरच ‘कोरोना’मुक्त होऊ अशी आमची वैद्यकीय स्थिती आहे. परंतु या ५८ जणांसोबत आम्हाला ठेवले तर आम्ही बरे होण्याऐवजी आणखी संसर्ग वाढून मरणाच्या दाढेत जाऊ शकतो.

शेवटी आम्ही तिथे न राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही अगोदर राहात असलेल्या कांजूर – कर्वेनगर येथे परतण्याचे ठरविले. आम्ही काय करायचे त्याबद्दल कुणीच आम्हाला मार्गदर्शन करीत नव्हते. मीठानगरमधील रूग्ण गंभीर आहेत, त्यामुळे सुस्थितीत असलेल्या आम्ही १८ जणांनी इतरत्र गेलेलेच चांगले असे आम्हाला तेथील कर्मचाऱ्यांनी खासगीमध्ये सांगितले.

शेवटी बस चालकाला विनवणी करून रात्री पावणे एक वाजता आम्ही कर्वेनगरच्या इमारतीत परतलो. आमच्या मुळच्या खोलीत आलो. पण या ठिकाणी राहायचे किंवा नाही याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडून आम्हाला काहीही सुचना करण्यात आलेल्या नाहीत.

Corona14 : ‘कोरोना’च्या 14 रूग्णांना महापालिकेने सोडले वाऱ्यावर, देखरेखीसाठी एकही कर्मचारी नाही

गेली आठ दिवस आम्ही येथे राहात आहोत. कोणत्याही सुविधा नाहीत. कोणताही मनुष्य खाणार नाही, इतके वाईट जेवण आम्हाला दिले जाते. आज शिरा दिला होता. तो शिजलेला सुद्धा नव्हता. कच्चा शिरा आम्हाला दिला. रोज असेच अर्धे कच्चे जेवण आम्हाला दिले जाते. माणूस म्हणून वागणूक दिली जात नाही.

‘कोरोना’ पेशंटला दही आणि लोणचे द्यायला नको. पण आम्हाला हे दररोज दिले जाते. दररोजच्या जेवणात एकच ठरलेली भाजी आहे, ती म्हणजे बटाटा. चपाती, बटाट्याची भाजी आणि डाळ – भात या व्यतिरिक्त कोणतेही जेवण दिले जात नाही. भाजीत बदल केला जात नाही. जेवण जनावरेही खाणार नाहीत या दर्जाचे आहे. फळे तर बघायलाही मिळत नाहीत, अशी खंत या रूग्णाने व्यक्त केली.

दरम्यान, या ‘कोरोना’ रूग्णाने ‘लय भारी’ला सांगितलेली हकिकत गंभीर होती. त्यांना सुविधा नाहीतच, पण त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी सुद्धा कुणी नाही. त्यामुळे यातील एखादा रूग्ण वैतागून निघून गेला तर बाहेरच्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो. रूग्णांना फोनरूनही समुपदेशन केले जात नाही.

Corona14 : ‘कोरोना’च्या 14 रूग्णांना महापालिकेने सोडले वाऱ्यावर, देखरेखीसाठी एकही कर्मचारी नाही

‘कोरोना’ रूग्णांना वाऱ्यावर सोडले जात असेल तर ‘कोरोना’ची लढाई सरकार व महापालिका कशी जिंकणार असाही सवाल आता उपस्थित झाला आहे. ‘कोरोना’ रूग्णांची काळजी घेण्यात महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे की काय असाही सवाल या १४ रूग्णांमुळे उपस्थित झाला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सुचना करतो असे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी