30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमुंबईBKC JUMBO COVID HOSPITAL चा प्रत्यक्ष अनुभव : हे तर मृत्यूचे घर!

BKC JUMBO COVID HOSPITAL चा प्रत्यक्ष अनुभव : हे तर मृत्यूचे घर!

राजेश सावंत

मुंबई :- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अभूतपूर्व भीषण गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील परिस्थितीकडे सरकारने तातडीने लक्ष दिले पाहीजे. बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटर या रुग्णालयामध्ये मृत्यूचे प्रमाण फार मोठे आहे. मात्र खरी आकडेवारी दिली जात नाही.

माझी पत्नी राजेश्वरी सावंत हीला डायबेटीसचा त्रास होता. तिला पोटदुखी व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने १० एप्रिल रोजी दुपारी ४:४७ वाजता बीकेसी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिचा कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्टही उपलब्ध नव्हता. मला सांगितले होते की आत वॉर्डमध्ये गेल्यावर सर्व टेस्ट केल्या जातील आणि उपचारही चांगले होतील. मात्र रात्रीचे १०:३० वाजले तरी तिच्याकडे कोणीही ढुंकूणही पाहिले नव्हते. याबाबत मी त्यांनी दिलेल्या ०२२६८५०२१०० या क्रमांकावर चौकशी केली असता अद्याप डॉक्टरांची विजीट झालेली नाही,  त्यांनी औषधांची प्रिस्किपशन दिली की पुढील उपचार सुरु करू, असे उत्तर एका नर्सने दिले. तिने नाव सांगितले नाही. मी पत्रकार आहे आणि ती माझी पत्नी आहे हे सांगूनही सकाळचे ९ वाजले तरी तिच्यावर कोणतेही उपचार केले नव्हते. रात्रभर केवळ ऑक्सीजनवर ठेवलेली माझी पत्नी पोटात दुखू लागल्याने तडफडत होती. व्याकूळ झाली होती. तोंडाला ऑक्सिजन मास्क असल्याने तिला धड बोलता येत नव्हते की बेडवरुन उठण्याची अंगात ताकद शिल्लक राहिली नव्हती. तिने मला फोन करुन ही भयानक परिस्थिती सांगितली आणि येथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवा किंवा नसेल कुठे जागा तर मला घरी तरी घेऊन चला, असे म्हणत ती ढसाढसा रडली. मी तिला कसेबसे सावरले. ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला की लगेच हलवतो, तू थोडा धीर धर, खचू नको, अशी मनधरणी केली.

बाहेरची परिस्थितीही कठीण होती. खासगी रुग्णालयातही कुठेच ऑक्सिजन बेड उपलब्ध नव्हता. मी हताश झालो होतो. दुसऱ्या दिवशी दुपारी माझ्या पत्नीचा मला फोन आला की तिच्यात उठायची व बोलायची ताकद नव्हती. कसेबसे तिने मला सांगितले की तिने बेडवरच लघवी केली आहे आणि तिला खूप तहान लागली आहे. पाणी पाणी करत तडफडत होती. तिने सांगितले की तेथे अनेकांनी उलटी करुन ओकून घाण केली होती. शौचालयाबाहेर आणि आतही घाण होती. रुग्णांना धड जाता येत नसल्याने ते शौचालयात पोहोचायच्या आतच लघवी-संडास केल्याने सर्वत्र घाण होती.

या भीषण परिस्थितीत बाहेर कुठेही ऑक्सिजन बेड मिळेल का यासाठी मी प्रयत्न करत होतो. त्याचवेळी पत्नीच्या काळजीपोटी मी ०२२६८५०२१०० या क्रमांकावर सारखा फोन करत होतो आणि पलिकडून सर्व व्यवस्थित असल्याची उत्तरे दिली जात होती.

सायंकाळनंतर तर माझी पत्नी बोलण्याच्याही मनस्थितीत नव्हती. फोनही उचलण्याची, घेण्यासाठी तिला शक्य होत नव्हते. सायंकाळी तिच्या भावाने व्हिडीओ कॉल केला असता तिने मोबाईल कसाबसा उचलला पण तिला बोलायला होत नव्हते. जीभ अडखळत होती. ती हाताने मोबाईल इकडे तिकडे फिरवत होती. मात्र ते मोबाईलवरील आतील भयाण परिस्थिती दृश्य पाहुन आम्ही दोघेही हादरलो. माझ्या पत्नीसह आजूबाजूच्या बेडवरील रुग्णसुद्धा हातवारे करत होते. विव्हळत होते. मदतीसाठी तडफडत होते. पण तिथे कुठेही डॉक्टर, नर्स किंवा वॉर्डबॉय दिसत नव्हते.

या गंभीर परिस्थितीत काय करावे, कुणाची मदत घ्यावी, कोणाला सांगावे, सगळं काही विचार करण्याच्या पलिकडचे होते. त्याही अवस्थेत आम्ही सगळ्यांना कुठे बेड उपलब्ध होईल का म्हणून विचारत होतो. आणि आतमध्ये माझ्या पत्नीची तब्येत ढासळत असल्याने तिला आयसीयुमध्ये हलवण्यासाठी ओळखीचे समाजसेवक, कोविड योध्दे, नगरसेवक, आमदारांना सांगत होतो. पण निर्ढावलेले कर्मचारी आणि डॉक्टरांनी कुणाच्याही फोनला दाद दिली नाही. कारण ते आतमध्ये होते. बाहेरुन आपण फक्त फोन करु शकतो. आत काय चाललय ते त्या डॉक्टरांना जाब विचारणारा कोणीही नाही.

गेल्यावर्षी २०२० मध्ये आपण कोविड योध्दे म्हणून ज्यांचा अभिमानाने गौरव केला. सत्कार केला. ते कोविड योध्दे आता २०२१ मध्ये कुठेही दिसत नाहीत. काही अपवाद वगळता सगळ्यांचे काळीज आता दगडाचे झालेत. कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. ज्यांची इम्यूनिटी पॉवर चांगली आहे, ते या आजारातून कसेबसे बरे होतात. मात्र अन्य आजार असलेले रुग्ण तडफडून मरत आहेत. ही इथली खरी वस्तूस्थिती आहे.

मी आणि माझा मेहुणा प्रत्यक्ष ३ दिवस तेथे बाहेर दिवसभर उभे होतो आणि एकंदर परिस्थितीचा अंदाज घेतला तर तिथे २०००  रुग्णांवर उपचार होतात. आणि १०८ आयसीयू बेड आहेत. पण तिथला मृत्यूदर पहाता येथे आलेला प्रत्येक तिसरा माणूस जर तिथे मरत असेल, तर मग या कोविड केअर सेंटरमध्ये नेमके चाललेय काय? वाढता मृत्युदर, वाढती रुग्णसंख्या, अपुरी आरोग्य यंत्रणा, निष्क्रीय प्रशासन, खोटे रिपोर्ट, औषधांची कमतरता, उदासीन सत्ताधारी व विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि कोविडच्या नावाखाली जंबो घोटाळा… या अपयशाला जबाबदार कोण? गेल्यावर्षी नावाजलेले हे बीकेसी कोविड रुग्णालय आता मृत्यूचे घर ठरले आहे. ही अवस्था विदीर्ण अशी आहे. हे का होतेय, याकडे लक्ष कोण देणार?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी