33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईलसीकरण पुन्हा सुरू!

लसीकरण पुन्हा सुरू!

टीम लय भारी

मुंबई : लसीकरणाच्या (Vaccination) पहिल्याच दिवशी ‘कोविन अ‍ॅप’मध्ये झालेल्या गोंधळामुळे रविवार व सोमवार असे दोन दिवस ही मोहीम थांबवल्यानंतर मंगळवारपासून ती पुन्हा सुरू होत आहे. आता ‘कोविन अ‍ॅप’ सुरू झाले असून मंगळवारी देण्यात येणाऱ्या चार हजार लाभार्थ्यांना अ‍ॅपवरून लघुसंदेश पाठविण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवडय़ातून चारच दिवस लसीकरण होणार असून एकाच सत्रात हे लसीकरण होणार आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीला सुरुवात झाली. मात्र ‘कोविन अ‍ॅप’मधील तांत्रिक बिघाडामुळे पहिल्याच दिवशी चार हजार जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिकेला पूर्ण करता आले नाही. पहिल्या दिवशी के वळ ५० टक्के लसीकरणच होऊ शकले. म्हणजेच के वळ १ हजार ९२६ जणांना लस देता आली होती. या मोहिमेसाठी वापरलेल्या ‘कोविन अ‍ॅप’मध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारतर्फे सुरू होते. लसीकरण करताना या अ‍ॅपवर नोंद करणे आवश्यक आहे. पहिल्या दिवशी हाती नोंद (मॅन्युअली) करण्यास पहिल्या दिवशी राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र यापुढील सर्व नोंदी अ‍ॅपवरच करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे या अ‍ॅपच्या दुरुस्तीसाठी लसीकरण मोहीम दोन दिवस बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, आता या अ‍ॅपमधील त्रुटी दूर करण्यात आल्या असून मंगळवारपासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

लसीकरणासाठी पालिकेने आधी सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ९ अशी वेळ निश्चित केली होती. मात्र पहिल्याच दिवशी नोंदणीपैकी अध्र्याच जणांचे लसीकरण झाले. त्यामुळे वेळेआधी काम पूर्ण झाले. दरम्यान, पुन्हा लसीकरण सुरू झाल्यानंतर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या एकाच सत्रात लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल; केईएम रुग्णालय, परळ; शीव रुग्णालय; कूपर रुग्णालय, विले पार्ले; व्ही. एन. देसाई रुग्णालय, विले पार्ले; वांद्रे भाभा रुग्णालय; डॉ. आंबेडकर शताब्दी रुग्णालय, कांदिवली; राजावाडी रुग्णालय, घाटकोपर; बीकेसी कोविड सेंटरवर एकूण ४० केंद्रांवर लसीकरण होणार आहे, तर राज्य सरकारच्या माध्यमातून जे.जे. रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. जेजेमध्ये दररोज १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी