33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीचे जामखेडमधील कार्यकर्ते म्हणतात, रोहित पवारांना ग्रामविकासमंत्री करा 

राष्ट्रवादीचे जामखेडमधील कार्यकर्ते म्हणतात, रोहित पवारांना ग्रामविकासमंत्री करा 

सत्तार शेख: लयभारी न्यूज नेटवर्क 

अहमदनगर  : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेला राजकीय तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीने शिवसेनेला सोबत घेत सत्तास्थापनेच्या हलचाली गतीमान केल्या आहेत. यामुळे आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. सत्तेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघाला रोहित पवारांच्या रूपाने संधी मिळावी यासाठी स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. रविवारी जामखेड तालुक्यातील बुथ कमिटी सदस्यांच्या बैठकीत सर्वच स्थानिक नेत्यांनी आमदार रोहित पवार यांना पक्षाने ग्रामविकास मंत्री करण्याचा सुर आळवत तसा एकमुखी ठरावच पास केला.

आमदार रोहित पवार यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बुथ कमिटी सदस्यांचे आभार मानण्याकरिता जामखेड तालुका राष्ट्रवादीच्या वतीने बुथ कमिटी सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध नेत्यांनी आमदार पवारांना मंत्री करण्याचा सुर आवळला. दरम्यान जेष्ठ नेते वैजिनाथ पोले यांनी आमदार रोहित पवार यांना पक्षाने ग्रामविकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी द्यावी असा प्रस्ताव आपल्या भाषणातून मांडला. या प्रस्तावाला राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुर्यकांत (नाना) मोरे यांनी सर्वांच्या वतीने अनुमोदन दिले.आमदार रोहितदादाना पक्षाने मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी असा ठराव जिल्हा राष्ट्रवादीने पाठवण्याचा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी धरला. आमदार रोहित पवारांच्याच उपस्थितीत स्थानिक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी मंत्रीपदाची मागणी लावून धरल्याने रोहित पवारही अवाक झाले.

कर्जत – जामखेड या दोन्ही तालुक्यांतून महाशिवाघाडीच्या सरकारमध्ये आमदार रोहित पवार यांना काम करण्याची संधी द्यावी या मागणीने आता जोर धरला आहे. मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार रोहितदादा पवार यांना ग्रामविकासमंत्री करण्यात यावे ही मागणी मतदारसंघातील जनतेतून जोर धरत आहे. मतदारसंघातील जनतेच्या मागणीचा पक्ष गंभीरपणे दखल घेऊन आमदार पवारांना मंत्रीपद बहाल करणार का ? याची उत्सुकता रोहित पवार समर्थकांना लागली आहे.

 

हे सुद्धा वाचा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी