34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री म्हणताहेत, या वेळेच्या निवडणुकीत मजा नाही

मुख्यमंत्री म्हणताहेत, या वेळेच्या निवडणुकीत मजा नाही

लय भारी न्यूज नेटवर्क

ठाणे : समोरून लढताना कोणीही दिसत नाही. लहान मुलाला विचारलं तरी तो सांगेल राज्यात युतीचं सरकार येईल. या वेळेच्या निवडणुकीत मजा आणि चुरस राहिलेली नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांची खिल्ली उडविली.

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राहूल गांधी, शरद पवार, राज ठाकरे, सुशीलकुमार शिंदे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. आता एक तिसरा पक्ष आला आहे. त्यांनी सत्ता नकोच, विरोधी पक्ष द्या, अशी मागणी केली आहे. अशा शब्दांत राज ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांचे मिळून दहा टक्के आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत. विरोधी पक्षनेता करायचा असेल, तर दोन्ही पक्षांचे विलिनीकरण करण्याची गरज आहे, हे सुशीलकुमार शिंदे यांनी बरोबर ओळखले आहे. ते द्रष्टे नेते आहेत. त्यांना भविष्य दिसतेय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार हे राहूल गांधी यांनाही अचूक ठाऊक आहे. त्यामुळेच ते बँकॉकला फिरायला गेले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तर बिकट स्थिती आहे. आधे इधर, आधे उधर बाकी मेरे पीछे अशी त्यांची स्थिती झाल्याचा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.

मुंबई व ठाण्यातील विकासकामांविषयी यावेळी मुख्यमंत्र्यांनी विस्तृत तपशिल मांडला. मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) कोणत्याही ठिकाणी सहजपणे पोहोचू असे वाहतूक जाळे आम्ही तयार करत आहोत. जल वाहतूक असो, रेल्वे असो, मेट्रो असो किंवा बस सेवा असो एकाच तिकिटावर तुम्हाला प्रवास करू देण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. संपूर्ण एमएमआर मेट्रोच्या माध्यमातून जोडले पाहीजे. ठाण्यात देखील इंटर मेट्रो आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र सरकारबरोबर बैठकही झाली आहे. हायब्रीडच्या मध्यमातून मेट्रो आणत आहोत. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मेट्रोचा मोठा फायदा होणार आहे. एवढेच नाही तर, ठाणे ते बोरिवली रोपवे आणणार आहोत. त्यामुळे प्रदूषण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोपरी येथील उड्डाण पुलाचे आठ पदरीकरण करणार आहोत. भिवंडीपर्यंत 25 किलो मीटरचे मेट्रो मार्ग तयार करणार आहोत. ठाण्यात जलवाहतूक सुरू करणार आहोत. ठाण्याला स्मार्ट सिटी योजनेमध्ये घेतले आहे. त्यामुळे इथे कामे सुरू आहेत.

ठाण्यात जुन्या इमारतींचा बिकट प्रश्न होता. पण समुह विकासाच्या माध्यमातून तो सुद्धा मार्गी लागलेला आहे. येणाऱ्या काळात राज्यात 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये होणार आहे. त्याचा फायदा आपल्याला व्हायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.

विकासात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढच्या वर्षी तो पहिल्या क्रमांकावर आणू. देशातील एकूण 25 टक्के रोजगार आपण महाराष्ट्रात आणला आहे. सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रातच झाली आहे. या सरकारमध्ये कधीही घोटाळे झाले नाहीत. अजूनही चांगली कामे आपल्याला करायची आहेत. हावडी मोदी या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज लोक अमेरिकेत आले होते. भारत हा मजबूत देश असल्याचे आता पाकिस्तानलाही कळले आहे. पाकिस्तान काश्मिरमध्ये दररोज कारवाया करीत होता. परंतु कलम 370 हटविल्यामुळे जम्मू व काश्मिर मुक्त केले आहे. जम्मू काश्मिरमध्ये तिरंगा फडकला असल्याचा उच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी