नाना पटोले यांची हकालपट्टी करा, कॉंग्रेसमधून होतेय मागणी

महाराष्ट्रात सध्याच्या काँग्रेसच्या दयनीय परिस्थितीत जनतेचा पाठिंबा मिळवायचा असेल तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील मोहीम तीव्र झाली आहे. याच अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी नाना पटोले यांच्या कार्यकाळात काँग्रेस कशी अस्ताव्यस्त होत आहे, याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी पत्राद्वारे केले आहे.

आपल्या नेतृत्त्वात काँग्रेस प्रगतीच्या अपेक्षेत आहे. एकेकाळी काँग्रेस देशाचा एक प्रमुख पक्ष होता. खरे म्हणजे, काँग्रेस हा नुसता राजकीय पक्ष नसून एक विचार आहे, एक चळवळ आहे. काँग्रेससारखी परंपरा इतर कोणत्याही पक्षात दिसत नाही. एक मोठा राजकीय पक्ष आज आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी धडपडतोय, अशी परिस्थिती मागील काही वर्षांपासून उत्पन्न झाली आहे. आपला काँग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी, कामगार, आदिवासी, युवा वर्ग, महिला, शोषित, पीडित, वंचित, मागासवर्गीय यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी, महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी २०२१मध्ये नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरविला विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखा जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशैलीमुळे हा किल्ला आता निसटला आहे. हे सर्वश्रुत आहे.

सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची दाणादाण उडत आहे. फेब्रुवारी २०२१मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची वाताहत सुरू झाली आहे. डिसेंबर २०२१मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून काँग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या. क अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपाच्या बावनकुळे यांचा जबरदस्त विजय झाला. जून २०२२मध्ये विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एकचे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली. त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. ४ जुलै २०२२ला शिंदे- फडणवीस सरकारची बहुमत चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्त्वाची होती. पण काँग्रेसचे तब्बल १० आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतानासुद्धा अनेकांनी पक्षविरोधी काम केले. या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरविण्यात आले नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

सर्व बाजूंनी काँग्रेस सपशेल तोंडघशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे. जर भाजपाने पाठींबा दिलेले सत्यजित तांबेसारखे अपक्ष उमेदवार पाचही जागांवर निवडून आले तर विधान परिषदेच्या सभापतीपदाचा तिढा तयार होईल. महाराष्ट्रात बेबंदशाही आहे, असे म्हणायलाही आता काही अर्थ उरलेला नाही. राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाईल. पक्षात शिस्त नाही. मुळात पक्षाच्या विचारधारेवरही नेत्यांच्या मनात आदर नाही. एकीकडे राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत, पण स्थानिक काँग्रेस नेत्यांना मात्र पक्षापेक्षा स्वतःच्या सत्तेची पडलेली आहे. अशा काँग्रेसविरोधी घटना घडत असताना प्रदेश काँग्रेस अध्यक्षांमध्ये कारवाई करण्याची धमक उरलेली नाही. तसे केल्यास पक्षात कोण उरेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे.

ज्या काँग्रेसची पाळेमुळे शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत रोवली गेली होती. त्या पक्षाकडे कार्यकर्तेच उरले नाहीत. म्हणजेच पक्षाचा कणा उरलेला नाही. पक्षांतर्गत गटबाजी हा मोठा प्रश्न राज्यातील काँग्रेससमोर उभा ठाकला आहे. संघटनेची घडी विस्कळीत झालेली आहे. आज संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. चैतन्य निर्मितीसाठी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुण वर्गाची गर्दी बघता एका नव्या वर्गाला काँग्रेस जवळची वाटत आहे. काँग्रेसपासून दुरावलेली माणसे जोडण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत. परंतु, हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तीत करण्यासाठी ठोस रणनीती प्रदेशाध्यक्षांना कितपत जमेल, ही शंका आहे.

हे सुद्धा वाचा : मला निलंबित करून काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला; सुधीर तांबेंना काँग्रेसचा दणका

VIDEO : सत्यजित तांबेनी काँग्रेसला फसविले : नरेंद्र वाबळे, अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ

खात्रीने सांगतो महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार येणार; केंद्रात ही सत्ता आणू : नाना पटोले

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष आजच्या घडीला सक्षम नेतृत्त्व नसणारा पक्ष म्हणून दिसत आहे. विविध निवडणुकींमध्ये सतत होणारे पराभव असण्याचे कारण म्हणजे पक्षाची असलेली दयनीय अवस्था आहे. या पक्षात नेते उरले आहेत. परंतु कार्यकर्ते नाहीत. राज्यात या पक्षाचा चेहरा गेल्या अनेक वर्षांपासून बदलला नाही. गेली अनेक वर्षे त्याच त्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. तळागाळातील कार्यकर्ते यामुळेच पुढे जाऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नवे चेहरे क्वचितच दिसत आहेत. परिणामी राजकीय करिअरसाठी काँग्रेस विचारसरणीचे लोक इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस असे अनेक पक्ष राज्यात प्रभावशाली होत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा आणि इतर माध्यमांतून तसेच काँग्रेसाध्यक्ष म्हणून आपल्या मदतीने काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु, महाराष्ट्राचे काय, हा प्रश्न कायम राहतो.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे भविष्य हे महाराष्ट्रातील लोकांच्या हातात आहे. काँग्रेसला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचे नेटवर्क तयार करावे लागणार आहे. नेते व कार्यकर्ते पुन्हा नक्कीच जुळतील. पण त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शिर्षत्व नेतृत्त्व आणि कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणजेच महाराष्ट्र प्रदेशातील नेतृत्त्व सक्षम असणे गरजेचे आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तत्काळ बदलण्याची नितांत गरज आहे. प्रदेशाध्यक्ष असा असावा, जो महाराष्ट्राच्या गावा-गावांत फिरून जनतेचे प्रश्न उचलून त्यास वाचा फोडेल आणि काँग्रेसची स्थिती मजबूत करेल. काँग्रेसच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या पत्राची गंभीर दाखल घ्यावी, अशी विनंती डॉ. आशिष देशमुख यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

38 mins ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

49 mins ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

1 hour ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

1 hour ago

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस गृहभेटीला

मानवी जीवनाच्या अर्ध्या टप्प्यावर आयुष्याचा लेखाजोखा मांडत असताना प्रेम, आपुलकी, स्नेह, आत्मीयता, आदर व ईश्वर…

2 hours ago

T20 World Cup साठी शुभमन गिल राखीव; रिषभ पंत, संजू सॅमसनचा समावेश

भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकासाठी नुकतीच टीम ची घोषणा केली आहे(Shubman Gill will play as…

4 hours ago