31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयफडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचले : काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याचा बाळासाहेबांना शब्द...

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचले : काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याचा बाळासाहेबांना शब्द दिला होता का ?

लय भारी न्यूज नेटवर्क

नागपूर : उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असे वचन मी बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. मग काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिला होता का असा बोचरा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले आहे. पण या तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद आहे. यापुढे हे सरकार कुठल्या दिशेने चालणार हे आताच दिसू लागले आहे. शेतकऱ्यांना न्याय दिला नाही म्हणून तुम्हाला विरोधात बसविल्याची टीका जयंत पाटील यांनी आमच्यावर केली होती. पण पाटील यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, १९९० नंतर फक्त एकाच पक्षाला दोन वेळा १०० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या आहेत. त्या भाजपने जिंकल्या आहेत. जनतेने भाजप व शिवसेना युतीला बहुमत दिले होते. शरद पवार यांनीही वारंवार म्हटले होते की, त्यांना बहुमत मिळालेले नाही. ते विरोधी पक्षात बसणार आहेत. पण ४० टक्के जागा मिळविणारे तिन्ही पक्ष एकत्र आल्याने ते सत्तेत आले. राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेले हे सरकार आहे. जनतेने त्यांना निवडून दिलेले नाही. जनतेचा कौल आम्हाला होता, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

सामनामधून शरद पवारांवर टीका

शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. परंतु शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने शरद पवारांवर जहरी टीका केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी फडणवीस यांनी ‘सामना’मध्ये पवारांबद्दल लिहिलेले उतारेच वाचून दाखविले. त्यावरून धनंजय मुंडे, एकनाथ शिंदे व गुलाबराव पाटील यांनी हरकत घेतली. त्यामुळे अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘सामना’चे हे उतारे कामकाजातून वगळण्यात येत असल्याचे सांगितले.

गोवा, मणिपूरपेक्षा महाराष्ट्रात फरक आहे

शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. त्यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदे यांनी गोवा व मणिपूरमध्ये भाजपने काय केले होते असा सवाल केला. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, कोणतेही दोन पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे गेले, व निवडणुकीनंतर विभक्त झाले असे देशात घडलेले नाही. गोवा व मणिपूरमध्ये असे झाले नव्हते याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

हे सुद्धा वाचा

VIDEO : रोहित पवारांचे विधानसभेत पहिलेच भाषण, भाजपवर केला हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सुद्धा अंगावर धावून जायचो

एकनाथ खडसे म्हणाले, मी भाजपमध्येच राहणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी