32 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeटॉप न्यूजCoronavirus : उद्या ‘जनता कर्फ्यू’ : सध्या आहे तिथेच थांबा, प्रवास टाळा...

Coronavirus : उद्या ‘जनता कर्फ्यू’ : सध्या आहे तिथेच थांबा, प्रवास टाळा – मोदी

टीम लय भारी

नवी दिल्ली : कोरोना (Coronavirus) विषाणूमुळे उद्भवलेले वैश्‍विक संकट व महामारीवर मात करण्यासाठी गर्दीपासून बचावणे, घरातून बाहेर न पडणे हा संकल्प करून उद्या रविवार, २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व देशवासीयांनी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा केले आहे. या कर्फ्यूदरम्यान कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडू नये.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत ‘घाबरू नका, सतर्क राहा’ असे आवाहन केले आहे. ‘केवळ घरात राहणेच गरजेचे नाही तर तुम्ही ज्या शहरात, ज्या भागात असाल तिथंच राहणं आवश्यक आहे. अनावश्यक प्रवासामुळे ना तुम्हाला मदत होईल ना इतरांना’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आपल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नाचा परिणाम मात्र मोठा असेल, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 

३,७०० रेल्वे आणि १००० उड्डाणे रद्द

जनता कर्फ्यू दरम्यान रेल्वेने रविवारी ३, ७०० रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. आज मध्य रात्रीपासून आणि उद्या रात्री १० वाजेपर्यंत एकही पॅसेंजर ट्रेन धावणार नाही. यामुळे पॅसेंजर ट्रेनच्या सुमारे २४०० फेऱ्या रद्द होणार आहेत. तर मेल आणि एक्स्प्रेसच्या सुमारे १३०० फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबादमधील उपनगरीय लोकल गाड्यांच्या सेवेत मोठ्या संख्येत कपात केली आहे. तर इंडिगो, गोएअर या विमान कंपन्यांनी १ हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

१२ रेल्वे प्रवासी ‘पॉझिटीव्ह’

रेल्वेमधून प्रवास केलेल्या १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. १३ मार्चला दिल्ली ते रामगुंडमपर्यंत धावलेल्या एपी संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबई-जबलपूर मार्गावर १६ मार्चला धावलेल्या गोदान एक्सप्रेस रेल्वे डब्यातील ४ प्रवाशांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

स्टेशन ते रेल्वे गाडीत अन्नपदार्थ मिळणार नाहीत

सर्व रेल्वे स्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम, जन आहार आणि सेल किचन बंद ठेवण्याचे आदेश आयआरसीटीसीने दिले आहेत. तसेच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील कॅटरिंग सेवाही बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत. तसंच कॅटरिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचे आवाहन कॅटरर्सला रेल्वेने केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी