33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रBalasaheb Thorat : 'भाजपच्या असंतुष्टांना सत्तेची लालसा, म्हणून धडपड'

Balasaheb Thorat : ‘भाजपच्या असंतुष्टांना सत्तेची लालसा, म्हणून धडपड’

टीम लय भारी

मुंबई : भाजपची नेतेमंडळी असंतुष्ट (BJP dissatisfied) असून त्यांना सत्तेची लालसा आहे, यामुळेच ते सरकार पाडण्यासाठी धडपडत आहेत,  असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना असे वाटते की, काही तरी करावे आणि महाविकास आघाडी सरकार पाडावे. पण ते शक्य नाही. आमचे सरकार स्थिर आहे. तिन्ही पक्षाचे नेते समन्वय साधून काम करत आहेत. भाजपवाले विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचे काम करत आहेत, असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यांच्या मागणीनंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आधी राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. कोरोना व्हायरसच्या बिकट परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारचे काम योग्य प्रकारे सुरु आहे. तिन्ही पक्षात चांगला समन्वय आहे. उलट कोरोनाच्या संकटात मदत करण्याची गरज असताना भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत आहे. पण त्यांच्या या भेटींमुळे सरकारला काही फरक पडणार नाही, असे थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

सरकारच्या स्थिरतेविषयी विनाकारण गैरसमज निर्माण केला जात आहे. पण आमचे महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. आमच्यात समन्वय नाही अशी कोणतीही बाब नाही. आमची रोज अनेक वेळा चर्चा होत असते, भेठीगाठी होत असतात. त्यामुळे सरकार अस्थिर असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. सरकारला त्रास देण्यासाठी त्यांचा रोज खटाटोप सुरू आहे. भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यांच्या या भेटींमुळे सरकारला काही फरक पडणार नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे, असे म्हणत थोरात (Balasaheb Thorat) यांनी नारायण राणेंसह (Narayan Rane) भाजप नेत्यांना टोला लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल संध्याकाळी तातडीची व महत्त्वाची बैठक झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सकाळी अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. मात्र, पडद्यामागे नक्कीच काहीतरी घडामोडी घडत असल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली. त्यातच माजी मुख्यमंत्री व सध्या भाजपचे खासदार असलेले नारायण राणे यांनी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठक झाली. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊतही या बैठकीला उपस्थित होते. तब्बल दीड तास ही चर्चा चालली.

या बैठकीनंतर संजय राऊत यांनी आज ट्विट करून सरकारला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘सरकारच्या स्थिरतेबाबत कुणी बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सर्वात मोठा पक्ष असूनही महाराष्ट्रात सरकार स्थापन करता न आल्याचा सल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात आहे. त्यातूनच ठाकरे सरकार कसे अस्थिर होईल, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जाते. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी याची झलक दिसली होती. आता कोरोनाच्या संकटाचे निमित्त करून केंद्र सरकार पुढचे पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

महाविकास आघाडी सरकार कोरोनामुळे निर्माण झालेले संकट हाताळण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. याचदरम्यान राज्यातील अनेक नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यपालांच्या भेटीसाठी नेत्यांची रांग लागल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी