31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमुंबईCoronaeffect : हिंदू समजून मुस्लिम मृतदेहावर केले अंत्यसंस्कार!

Coronaeffect : हिंदू समजून मुस्लिम मृतदेहावर केले अंत्यसंस्कार!

टीम लय भारी

नवी मुंबई : रुग्णालयातून चोरीला गेलेल्या तरुणाच्या मृतदेहाबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून मोहम्मद उमर फारुख शेख (२९) या व्यक्तीचा मृतदेह चोरीला गेला नसून त्याचा मृतदेह तरुणीचा असल्याचे समजून तो मृत तरुणीच्या नातेवाईकांना दिला गेल्याचे (Coronaeffect ) तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे ज्या नातेवाईकांना उमर शेखचा मृतदेह देण्यात आला, त्या नातेवाईकांनी देखील आपल्या ताब्यात घेतलेला मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याची खातरजमा केली नाही. त्यांनी उमर शेख याच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असला तरी याचा मनस्ताप मात्र दोन्ही कुटुंबीयांना सहन करावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून तरुणाचा मृतदेह हा तरुणीचा समजून तरुणीच्या नातेवाईकांकडे देण्यात आला. त्यानंतर या मृतदेहावर नातेवाईकांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले गेले.

दरम्यान, मृत उमर शेख याची कोरोनाची टेस्ट (Coronavirus) निगेटीव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने १४ मे रोजी त्याचा मृतदेह घेऊन जाण्याबाबत त्याच्या नातेवाईकांना कळविले होते. मात्र, उमरच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी पैसे जमविण्यास उशीर झाल्याने ते शनिवारी मृतदेह ताब्यात घेण्यास गेले. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिल्यानंतर आयुक्त मिसाळ यांनी याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार वाशी पोलिसांकडून महापालिका रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीचे काम सुरु होते. या फुटेजच्या तपासणीत सदर प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे या धक्कादायक प्रकाराची महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अन्य कारणांमुळे मृत पावणा-या व्यक्तींची देखील सध्या कोविड तपासणी करण्यात येत आहे. कोविड टेस्ट रिपोर्ट येण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत असल्याने तोपर्यंत हे मृतदेह वाशी रुग्णालयातील शवागरात ठेवले जातात.

कोविड टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना दिले जातात. त्यामुळे वाशी येथील महापालिका रुग्णालयातील शवागरात मृतदेहांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयाकडून एका रॅकमध्ये दोन – दोन मृतदेह ठेवण्यात येत आहेत. मोहम्मद उमर फारुख शेखचा मृतदेह देखील अशाच पद्धतीने ठेवण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या धास्तीने शवागरात काम करणा-या कर्मचा-यांनी पॅकबंद असलेला मोहम्मद उमर फारुख शेख याचा मृतदेह महिलेचा असल्याचे समजून त्यांच्या नातेवाईकांना दिला. परंतु आता मोहम्मद उमर फारुख शेख यांच्या नातेवाईकांनी मृतदेह परत देण्याची मागणी केली आहे. आम्हाला आमचा मृतदेह परत द्यावा, अशी मागणी अब्दुल करिम या नातेवाईकाने केली आहे. त्यामुळे आता अधिक गोंधळ उडाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी