30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यJanataCurfew : नरेंद्र मोदींच्या आवाहनाचा उलटाच परिणाम, टाळ्या – थाळ्या वाजविण्यासाठी लोकांनी...

JanataCurfew : नरेंद्र मोदींच्या आवाहनाचा उलटाच परिणाम, टाळ्या – थाळ्या वाजविण्यासाठी लोकांनी केली गर्दी

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’चा ( Coronavirus ) संसर्ग रोखायच्या असेल तर गर्दी टाळणे गरजेचे आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ( JanataCurfew ) आवाहनाचा उलटाच परिणाम आज पाहायला मिळाला. सायंकाळी पाच वाजता लोकांनी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्यासाठी मोठी गर्दी केली. एखाद्या सणाप्रमाणे लोक एकत्र येऊन आनंद व्यक्त करीत होते. ‘कोरोना’च्या विरोधात घोषणाही देत होते.

‘कोरोना’ला रोखण्याच्या अनुषंगाने गर्दी टाळण्याची गरज आहे. दोन लोकांमध्ये किमान तीन फुटांचे अंतर असावे असे आवाहन केले जात आहे. पण नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे लोकांनी खबरदारी घेण्याऐवजी बेजबाबदारपणाच दाखविला आहे. गॅलरीत आणि अगदी सोसायट्यांच्या आवारात येऊन लोकांनी सायंकाळी ५ वाजता गर्दी केली. वृद्ध, लहान मुले, महिला, तरूण यांचा यात मोठा सहभाग होता. ‘कोरोना’च्या खबरदारीला तिलांजली देत हे लोक टाळी आणि थाळी वाजवत असताना दिसत होते. विशेष म्हणजे, हे चित्र वृत्तवाहिन्यांवर सुद्धा दाखविले जात होते.

आज रविवारच्या सुटीचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली. रविवारमुळे बहुतांशजणांना सुटीच असते. त्यातच पंतप्रधानांच्या आवाहनामुळे लोकांनी घरी राहणे पसंत केले. त्यामुळे राज्यातील शहरे, रस्ते सामासूम होते. आपत्कालिन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी पाच वाजता थाळी आणि टाळी वाजविण्याचे अनाकलनीय आवाहन मोदी यांनी केले होते. या आवाहनाला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. पण जे करायला नको तेच नेमके केले. अनेक ठिकाणी दोन माणसांमध्ये वीतभर सुद्धा अंतर राहणार नाही इतकी गर्दी करण्यात आली होती.

 एक दिवसाच्या कर्फ्यूने ‘कोरोना’ जाणार नाही

कोणत्याही संकटाचे रूपांतर स्वतःची लोकप्रियता वाढविण्यासाठी करायचे ही नरेंद्र मोदी यांची शैली आहे. त्यानुसार त्यांनी ‘कोरोना’चे सुद्धा भांडवल केले. रविवारचा दिवशी त्यांनी या संकटाला इव्हेन्टचे रूप दिले. पूर्ण दिवस घराबाहेर पडू नका असे आवाहन केले. त्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ असे या इव्हेन्टला नाव दिले. पण केवळ १२ – १४ तास घरांत बसून ‘कोरोना’ अटोक्यात येऊ शकत नाही. त्यासाठी मोठ्या कालावधीपर्यंत लोकांनी एकमेकांच्या संपर्कापासून दूर राहणे गरजेचे आहे.

आपत्कालिन सेवा देणाऱ्यांचे प्रश्न सोडविले तर त्यांचे खरे कौतुक होईल

आपत्कालिन सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स, पोलीस आदी कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. पण असे मोकळे कौतुक करण्याऐवजी या कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे प्रश्न त्यांनी सोडवायला हवेत. इस्पितळे वाढविणे, वैद्यकीय यंत्रणा सक्षम करणे याकडे नरेंद्र मोदी यांनी लक्ष द्यायला हवे अशा भावना सामान्य लोकांकडून व्यक्त होत आहेत.

हे सुद्धा वाचा

Covid-19 : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याच्या सीमा सीलबंद करणार : राजेश टोपे

Lockdown : मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्र बंद, रेल्वेही बंद : उद्धव ठाकरे यांची घोषणा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी