34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रBan on firecrackers : धोकादायक फटाक्यांवर आवाज फाऊंडेशनतर्फे बंदीची मागणी; दमा आणि...

Ban on firecrackers : धोकादायक फटाक्यांवर आवाज फाऊंडेशनतर्फे बंदीची मागणी; दमा आणि डोळ्यांसंदर्भातील आजार होण्याची भीती

टीम लय भारी

मुंबई : अनेक व्यापारी संघटनांनी यंदाच्या दिवाळीत (Ban on firecrackers) चीनला आर्थिक दणका देण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चिनी मालावर बहिष्कार घालावा यासाठी सोशल मीडियावर विविध प्रकारचे मेसेज देखील पाठवले जात आहेत. यात सांगितले जात आहे की, चीन भारतीय नागरिकांना नुकसानदायक ठरतीय असे फटाके व सजावटीसाठी वापरले जाणारे लाइट्स भारतात पाठवत आहे.

याआधी लडाखमध्ये भारतीय जवान व चिनी सैन्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. या वादानंतर, दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत. याचे पडसाद याआधीही भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळाले. विविध सणांच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी येणा-या चिनी बनावटीच्या वस्तूंवर दुकानदारांसह नागरिकांकडून बहिष्कार टाकला गेल्याचे दिसून आले. यामुळे चीनचे बरेच आर्थिक नुकसान झाल्याचेही समोर आले आहे.

आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये गृहमंत्रालयाच्या अधिका-याच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, चीन भारतात असे फटाके व सजावटीसाठीचे लाइट्स पाठवत आहे, ज्यामुळे लोकांना दम्याचा त्रास उद्भवू शकतो. शिवाय, यामुळे डोळ्यांशी निगडीत आजार देखील पसरतील.

केंद्र सरकारची संस्था पीआयबीने जेव्हा या व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा असे समोर आले की, गृहमंत्रालयाकडून अशाप्रकारची कोणतीही सूचना केली गेलेली नाही. गृहमंत्रालयाच्या कोणत्याच अधिका-याने चीनहून फटाके व लाइट्स पाठवले जात असल्याचा दावा केलेला नाही.

या मेसेजमध्ये गृहमंत्रालयाचे वरिष्ठ तपास अधिकारी विश्वजीत मुखर्जी यांच्या हवाल्याने म्हटले गेले की गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तान थेट भारतावर हल्ला करू शकत नाही, म्हणून त्यांनी भारताचा बदला घेण्याची चीनकडे मागणी केली आहे. चीनने भारतात दमा पसरवण्यासाठी विशेष फटाके तयार केले आहेत. हे कार्बन मोनोऑक्साइड सारखा विषारी धूर सोडतात. याशिवाय भारतात नेत्र रोग वाढवण्यासाठी विशेष प्रकारचे सजावट लाइट्स देखील बनवले जात आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पारा वापरला गेला आहे. मेसेजमध्ये सल्ला देण्यात आला आहे की या चिनी उत्पादनांचा वापर करू नका.

पीआयबीचे म्हणणे आहे की, लोकांनी अशाप्रकारच्या खोट्या मेसेजपासून सावध रहावे व हे मेसेज पुढे पाठवण्याअगोदर त्याची सत्यता पडताळून घ्यावी. भारतात राखीपोर्णिमेपासून ते दिवाळीपर्यंतच्या उत्सव काळात स्थानिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिनी वस्तूंची आयात होत असते. अंदाजे दिवाळीमध्ये भारतात ४० हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री होते. तर, ‘सीएआयटी’ या व्यापारी संघटनेने म्हटले आहे की, यंदाच्या दिवाळीत भारतीय व्यापारी स्थानिक उत्पादनांनाच विक्रीसाठी प्राधान्य देणार आहे. यामुळे चीनला एकप्रकारे इशारा मिळणार आहे.

फटाक्यांच्या उत्पादनात निम्म्यानी घट

 

कोरोनाच्या भीतीमुळे देशातील प्रमुख शहरांतील फटका उत्पादनावर ५० टक्के परिणाम झाला असून या वर्षी चीनमधून येणा-या फटाक्यांवरही निर्बंध आहेत. परिणामी अत्यल्प उत्पादन झाल्याचे फटाका उद्योजक सांगत आहेत. उत्पादन अत्यल्प असले तरी साथरोगामुळे ग्राहक फटाके घेण्यासाठी किती येतील, याचीही शंका या क्षेत्रातील उद्योजकांना आहे. प्रदूषण आणि थंडीमुळे कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता असल्याने फटाका उद्योगाची उलाढाल खूप कमी होईल. देशभरातील ही बाजारपेठ पाच हजार कोटी रुपयांची असते. ती निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.

देशात बहुतांश फटाके हाताने बनविले जातात. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक उत्पादकांनी कामगारांना कामावर बोलावले नाही. काम सुरू झाले तेव्हा अतिवृष्टीमुळे फटाके वाळणे आणि त्याची पॅकिंग करणे शक्य नव्हते. परिणामी या क्षेत्रातील सारी गणिते बिघडली आहेत. या वर्षी कोरोनामुळे प्रदूषण रोखण्यासाठी फटाके उडवू नयेत असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहक येईल का, अशी शंकाही उत्पादकांच्या मनात आहे. तेरखेडा येथे मराठवाडय़ात सर्वाधिक फटका उत्पादक आहेत. येथील उद्योजक तैय्यब दारुवाला म्हणाले,‘ शिवकाशी येथे सर्वाधिक फटाक्याचे उत्पादन होते. तसेच मराठवाडय़ात तेरखेडा या गावात फटक्यांचे अनेक कारखाने आहेत. लातूर आणि बीड जिल्ह्यातही काही कारखाने आहेत. सुतळी बॉम्ब, फुलबाजी आणि वाजणारे तोटे आदी आम्ही तयार करतो. कोरोनाकाळात कामगारांना बोलावणे शक्य नव्हते. ज्या भागात हे कारखाने असतात तेथे वीजही घेता येत नाही. प्रत्येक उत्पादन तयार करण्यासाठी स्वतंत्र खोल्या लागतात. अशी पायाभूत सुविधा जमीन अधिक असेल तरच करता येते. या वर्षी संकटाची साखळीच सुरू आहे. त्यामुळे फटाक्याची उलाढाल फार होणार नाही.

शिवाकाशी येथून कच्चा माल खरेदी-विक्री करणा-यांच्या मते तेथील सुमारे ५०० कारखाने बंद आहेत. त्यामुळे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटले आहे.

फुलबाजी, सुतळी बॉम्ब आणि आवाज करणारे तोटे यासाठी पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि अ‍ॅल्युनियम भुकटी अशी संयुगे लागतात. त्याच्या किमतीमध्ये तशी फारशी वाढ नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या दरामध्येच फटाके मिळतील. पण या वर्षी उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घसरलेले आहे.

बहुतांश फटाके हाताने बनविले जातात. कागदाची चौकोनी पुडी करून त्यात शोभेची दारू भरली जाते. त्याला वरून सुतळी गुंडाळली जाते. त्यानंतर हे फटाके वाळविले जातात. प्रत्येक फटक्यात कोणत्या प्रकारची शोभेची दारू वापरायची यावर तो फटका आवाजाचा असेल की नाही हे ठरविले जाते.

या वर्षी फटाके उडविणे हे प्रदूषणाला वाढविणारे असल्याने फटाके उडवू नयेत, असे पर्यावरणप्रेमी आवर्जून सांगत आहेत. कोरोनाकाळात श्वास घेण्यास त्रास होईल अशीच ही कृती असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीही सांगत असल्याने फटका व्यवसायाकडे ग्राहक किती येतील, या विषयी उत्पादकांच्या मनातही शंका होती.

धोकादायक, घातक आणि विषारी फटाक्यांवर बंदी घाला – आवाज फाऊंडेशन

 

आवाज फाऊंडेशनने प्रयोगशाळेत फटाक्यांची चाचणी केली असून, यामध्ये पर्यावरण आणि मानवी आरोग्यास हानीकारक घटक आढळले आहेत. परिणामी अशा धोकादायक, घातक आणि विषारी रसायनांचा समावेश असलेल्या फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, असा सूर लावण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाऊले उचलावीत, असे म्हणणे आवाज फाऊंडेशनने मांडले आहे.

फटाक्यांमध्ये मानवी आरोग्यासाठी अत्यंत विषारी घटक आहेत. ज्यात सल्फर ट्रायऑक्साइड, व्हॅनिडियम पेंटॉक्साइड, पोटॅशियम ऑक्साईड्स आणि कॉपर ऑक्साईड्स आहे. हे सर्व विषारी आहे. ही हानिकारक रसायने हवेत सोडली जातात. त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडते. या व्यतिरिक्त ध्वनी प्रदूषण देखील होत असून, यावर उपाय म्हणजे पर्यावरण पूरक दिवाळी साजरे करण्यात यावे, असे म्हणणे मांडले जात आहे. आता फटाक्यांमधील धोकादायक रसायनांच्या चाचणी परिणामामुळे मानवी आरोग्यास होणार्‍या गंभीर धोक्याबद्दल विचार करा. ज्यायोगे वायुप्रदूषण प्रश्न सोडता येऊ शकेल, असे आवाज फाऊंडेशनने म्हटले आहे.

हवा आणि ध्वनी प्रदूषणात भर पडण्याची शक्यता असून, फटाके वापरणे अधिक धोकादायक आहे. परिणामी सरकारला विनंती आहे की तातडीने सर्व फटाक्यांच्या वापरावर बंदी घाला, अशी मागणी सरतेशेवटी केली आहे, अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी दिली.

दुसरीकडे दिवाळीत फटाके फोडू नका. कारण फटाके फोडले आणि त्याचा धूर मोठ्या प्रमाणावर वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांसह नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे यावर्षी कोरोनाला हरविण्यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या तज्ज्ञांनी केले आहे.

दरम्यान, दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांना केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी