33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रगडकरींकडून रोहित पवारांची मागणी मान्य; तब्बल ३९९ कोटींच्या कामाची मंजूरी

गडकरींकडून रोहित पवारांची मागणी मान्य; तब्बल ३९९ कोटींच्या कामाची मंजूरी

टीम लय भारी

मुंबई :- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्या भेटीच्या वेळी रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे आढळगाव ते जामखेड महामार्गाच्या दोन लेनच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. रोहित पवारांची ही मागणी गडकरी यांनी मंजूर केली आहे. आढळगाव ते जामखेड महामार्गासाठी गडकरी यांनी ३९९.३३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

आमदार रोहित पवारांनी आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील रस्त्याच्या कामांसाठी राज्यपातळीवर प्रयत्न करतानाच केंद्रात जाऊनही पाठपुरावा केला आहे. त्याला यशही मिळाले आहे. न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड या राज्यमहामार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून या मार्गातील आढळगाव ते जामखेड या ६२.७७ किमी. मार्गाचे दोन लेनमध्ये चौपदरीकरण होणार आहे. या कामासाठी ३९९.३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघाचे भाग्य उजळले आहे. प्रवासी वाहतूकीसह कारखानदारी वाहतूकीसाठीही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. केवळ इतकेच नव्हे तर नगर-सोलापूर ५१६ (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात असणारे अडथळे देखील दूर होऊन या कामाची निविदा निघाली आहे. नगर सोलापूर व आढळगाव ते जामखेड हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग तालुक्याच्या व एकंदरीतच जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत.

१८ महिन्यात रस्ता पूर्ण होणार

तालुक्यातील या रस्त्यांच्या प्रश्नासाठी रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दोनदा भेट घेऊन निवेदन दिले होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत एकदा बैठक घेऊन संबंधित कामाचा पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विषयात आर्वजून लक्ष घातले होते. अखेर या पाठपुराव्याला यश आल्याने मतदारसंघातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १८ महिन्यांच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण होणार असून रस्ता झाल्यापासून १० वर्षे त्याच्या डागडुजीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पुढील काळात या महामार्गांमुळे मोठा कायापालट होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

आता नागरिकांची गैरसोय दूर होईल

‘तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा तालुक्याच्या विकासासाठी एक महत्वाचा घटक आहे. नगर- सोलापूर व आढळगाव ते जामखेड रस्त्याच्या कामांसाठी मी सातत्यानं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होतो. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. जनेतच्या मागणीचा मान राखत त्यांनी भरीव निधी मंजूर केला. याबाबत माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार. या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास निश्चित मदत होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी