31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा-कुणबी एकच; फूट पाडणाऱ्यांना जरांगेंनी सुनावले

मराठा-कुणबी एकच; फूट पाडणाऱ्यांना जरांगेंनी सुनावले

‘मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय तुमचं हे पोरगं एक इंचही मागे हटणार नाही’, या शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला विश्वास दिला. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची आज खेड राजगुरूनगरमध्ये तसेच बारामतीमध्ये लाखोंची सभा झाली. यावेळी २२ ऑक्टोबरनंतर आंदोलनाची दिशा ठरवू! तरीही सरकार २४ ऑक्टोबरची वाट पाहणार नाही, त्याअगोदरच मराठ्यांना आरक्षण मिळेल, असा विश्वासही जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला. यापूर्वी जरांगे-पाटील यांची पहिली मोठी सभा अंतरवाली सराटी गावात १४ ऑक्टोबरला झाली होती. त्यावेळी त्यांनी  आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर खेड राजगुरूनमधील लाखोंच्या मराठा समाजाला आरक्षणाच्या लढ्यासाठी लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

राजगुरूनगरमधील मराठा समाजाच्या सभेला संबोधित करताना जरांगे-पाटील यांनी २४ तारखेपर्यंत सरकारला काहीही बोलणार नाही. आणि आंदोलनाची दिशा २२ ऑक्टोबरला ठरवू. मात्र, आता आणि गरज पडल्यास पुढेही आंदोलन शांततेच्याच मार्गाने करायचे आहे. कारण शांततेतील आंदोलन सरकारला झेपणारे नाही, असे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ४० दिवस संपले की तुमची मराठ्यांशी गाठ आहे. आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आपल्याला लढायचे आहे म्हणून सर्वांना सावध राहा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी बारामतीमधील सभेत केले. त्याचवेळी एवढे निष्ठूर सरकार कधीही पाहिले नव्हते, अशी टीका सरकारवर केली.

मराठ्यांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार

मुंबईत बुधवारी (१८ ऑक्टोबर) सुनील कावळे या मराठा आंदोलकाने आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांत १४ ते १५ मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केली. या सर्व आत्महत्यांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी केला. सरकारच्या अनास्थेमुळे आमच्या मुलांचे बळी चाललेत. यांचे बलिदान वाया जाता कामा नये. म्हणून आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबायचे नाही, असा निर्धार जरांगे-पाटील यांनी केला.

मराठा-कुणबी एकच, राणेंना टोला

मराठा आणि कुणबी एकच आहे. शेती करतो कुणबी, असे सांगत जरांगे-पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना  नाव न घेता फटकारले. कुणबी वेगळा आणि ९६ कुळी मराठा वेगळा, जरांगेंनी अभ्यास करावा, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. त्यावर कुणबी म्हणजे शेती. आता शेती हा सुधारित शब्द वापरला जातो, असे सांगितले. मराठा क्षत्रिय आहे, मराठा शेती करतो. मग त्याने कुणबी प्रमाणपत्र मागितले तर काय हरकत आहे, असा सवाल जरांगेंनी केला.

जरांगेंची त्रिसूत्री

मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी मराठा समाजाला त्रिसूत्री सांगितली.

  1. उद्यापासून (२१ ऑक्टोबर) आपापल्या जिल्ह्यातील प्रत्येक सर्कलमध्ये जा, प्रत्येक मराठ्याच्या घरी जा आणि त्याला आरक्षणाचं महत्त्व सांगा.
  2. मराठ्यांनी एकत्र का यायला हवे हेही त्यांना समजावून सांगा.
  3. तिसरे महत्त्वाचे सूत्र म्हणजे आत्महत्या करू नका, हे सगळ्यांना सांगा. तसेच दंगा, जाळपोळ न करता शांततेत आंदोलनाचे महत्त्व सांगा. जाळपोळीमुळे गुन्हे दाखल होतात. पोरे जेलमध्ये जातात, मग आरक्षण मिळून काय फायदा होणार, असा सवाल त्यांनी केला.

आरक्षणासाठी सरकारकडे  पुरावे

सरकार आणि आपले असे ठरले होते की, चार दिवसांत घाईघाईत कायदा बनवला तर ते टिकणारे नसेल, त्याला आव्हान दिले जाईल. पण आता सरकारने स्थापन केलेल्या समितीला पाच हजार पुरावे आढळून आले आहेत. त्यामुळे आरक्षणातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. मराठा आरक्षण कायद्यासाठी पुराव्याचा आधार मिळाला आहे.

भविष्यात आमदार जरांगे-पाटील?

जरांगे-पाटील यांनी निवडणुकीला उभे राहावे, असे आवाहन सभेपूर्वीच्या भाषणात कार्यकर्त्यांनी केले. संपूर्ण मराठा समाज जरांगे-पाटील यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे जरांगे सहज आमदार होऊ शकतील. यानंतर जरांगे-पाटील २०२४ मध्ये निवडणुकीतील उभे राहतील का, अशी चर्चा सुरू झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी