31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसचिन वाझे यांची उचलबांगडी होणार, गृहमंत्र्यांचे विधान परिषदेत निवेदन

सचिन वाझे यांची उचलबांगडी होणार, गृहमंत्र्यांचे विधान परिषदेत निवेदन

टीम लय भारी

मुंबई :- मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनीच केल्याचा धक्कादायक आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून दुसऱ्या ठिकाणावर पाठवणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषित केले. तर, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली.

कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी अनिल देशमुख विधानपरिषदेत उपस्थित होते. अनिल देशमुख यांनी निवदेनाच्या सुरुवातीला राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. परंतु यावरुन विरोधकांनी गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार आहे अशी विचारणा करत त्यावर बोलण्याची मागणी केली. अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले की, “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल”. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे ही यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितले. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. सचिन वाझे यांची बदली नाही तर निलंबन करुन अटक करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

“सचिन वाझे प्रकरणावरुन वातावरण अत्यंत संतप्त आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केल आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

कोण लागून गेला सचिन वाझे?

“मनसुख हिरेन प्रकरणात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या नष्ट करण्यासाठी सरकार संधी देत आहे. राज्यातील जनतेचा सरकावर विश्वास राहिलेला नाही. कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावई आहे का सभापती महोदय? का हे सरकार पाठीशी घालत आहे?,” असे संतप्त सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारले. पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे असा आरोप करताना सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी