28 C
Mumbai
Friday, September 22, 2023
घरमहाराष्ट्रज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे निधन

ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे निधन

इंग्रजी पत्रकारीतेत साठच्या दशकात मराठी पत्रकार फार विरळ. अशा काळात पत्रकारिता करत क्रिकेट, मनोरंजन विश्व आणि राजकारण या क्षेत्रात लीलया वावरणाऱ्या ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं मंगळवारी ८० व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. सकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवर त्यांचं लेखन प्रसिद्ध होतं. माझी फिल्लमबाजी, कणेकरी ही पुस्तकं आणि कथाकथनाचे त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झाले होते. आपल्या खास कणेकरी शैलीतून ते लिखाण करत. ही व्यक्ती जेवढी बोलायची तेवढंच लिहायचीही. त्यामुळेच की काय मराठी आणि इंग्लिश वृत्तपत्रे यात त्यांचे लिखाण येत असे.

लगाव बत्ती या शिरीष कणेकर यांच्या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि उत्कृष्ट विनोदी वाड्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कारही मिळाला होता. रायगड जिल्ह्यातील पेण हे शिरीष कणेकर यांचं मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वे रुग्णालयात डॉक्टर होते. त्यामुळे भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचं बालपण गेलं. शिरीष कणेकर हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार होते. क्रीडा आणि सिने-पत्रकारितेवर त्यांनी विपुल लेखन केलं आहे. यादो की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूर पारंब्या, कणेकरी, लगाव बत्ती, आसपास, मेतकूट, चित्ररुप, फिल्लमबाजी, कल्चर व्हल्चर या नावांनी ते स्तंभलेखन करत. कधीही दारु न प्यायलेला बेवडा या शीर्षकाने त्यांनी लिहिलेला केश्तो मुखर्जींवरचा लेख आजही लोकांच्या स्मरणात आहे. तसंच दिलीप कुमारचं वर्णन हे बादशाह हा शेवटी बादशाहच असतो या शब्दांमध्ये त्यांनी केलं होतं. तिरकस आणि लिहणं आणि जोरकसपणे मुद्दे मांडणं हे त्यांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य. क्रिकेट, मनोरंजन विश्व आणि राजकारण हे तिन्ही त्यांचे आवडीचे विषय होते. कणेकर यांचा मूळ पिंड हा पत्रकारिता. त्यामुळेच की काय इंडियन एक्प्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी यासाठी शिरीष कणेकरांनी काम केलं. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सामना, पुढारी, साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद, सिंडिकेटेड कॉलम, द डेली या सगळ्या वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केलं आहे.

 

हे सुद्धा वाचा
जयंत पाटील यांना 580 कोटी निधी मिळाल्याच्या बातमीचा फुसका बार, किती रक्कम मिळाली ते विधानसभेत जाहीरच केले

त्र्यंबकेश्वर मंदिरातील परंपरा तपासून घ्या – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

रंगकर्मीचे ‘अण्णा’ जयंत सावरकर यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार

 

क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला – उपमुख्यमंत्री पवार

कोट्यवधी भारतीयांचं वेड असलेल्या क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष ही शिरीष कणेकर यांची ओळख होती. क्रिकेट, सिनेमासह अनेक क्षेत्रातील रंजक गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे होता. या रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांच्याकडे होती.या कलागुणांच्या जोरावर त्यांनी क्रिकेट, सिनेमावेड्या मराठी माणसांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने सिद्धहस्त लेखक, व्यासंगी पत्रकार, मनस्वी कलावंत, दिलखुलास व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांच्या अजरामर साहित्यकृती तसंच कथाकथनाच्या कार्यक्रमांमुळे ते कायम आपल्यासोबत राहतील. शिरीष कणेकर यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरिष कणेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी