35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयजनतेला मदत करा, याच माझ्यासाठी शुभेच्छा  : राज ठाकरे      

जनतेला मदत करा, याच माझ्यासाठी शुभेच्छा  : राज ठाकरे      

लय भारी टीम

मुंबई  :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांचा 14 जून रोजी  वाढदिवस आहे.त्यांनी अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत” असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांनी 14 जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. (Raj Thackeray appeals MNS volunteers not to celebrate his Birthday) “कोरोनाच्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करुन लोकांच्या मदतीला धावून जात आहे. अन्नधान्य वाटपापासून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे, अशा बातम्या ऐकून मला आनंद आणि अभिमान वाटत राहायचा” अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

“मी खरंच भाग्यवान आहे…

“मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले. ही मदत करत असताना अनेकांनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे प्राण धोक्यात घातले. काही जणांना कोरोनाची लागणही झाली. पण ना ते मागे हटले, ना त्यांचे कुटुंब” असंही राज ठाकरे म्हणतात.

काय केले राज ठाकरे यांनी आवाहन…

14 तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे अजिबात उचित नाही. म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. पण हे करताना तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही. सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेव्हा तुमच्याशी भेट होईलच.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी