34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमुंबईAnil Ambani : अनिल अंबानी यांनी पत्नीचे सर्व दागिने विकले; तर घरखर्चासाठी...

Anil Ambani : अनिल अंबानी यांनी पत्नीचे सर्व दागिने विकले; तर घरखर्चासाठी घेतले मुलाकडून कर्ज

टीम लय भारी

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची अवस्था आणखीनच बिकट झाल्याचे समोर आले आहे. अनिल अंबानी यांना आता त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले लढणेही अवघड होऊन बसले आहे. हे खटले लढवण्यासाठी अनिल अंबानी यांना आपल्या घरातील सर्व दागिने विकून टाकावे लागले. (Anil Ambani sold off all his jewellery to pay off legal fees for the ongoing case) तसेच सध्या खर्चासाठीही त्यांच्यावर मुलाकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे.

एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. वकिलांची फी भरण्यासाठी त्यांच्यावर दागिने विकण्याची वेळ आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांनी इंग्लंडमधील कोर्टात ही माहिती दिली.

इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने २२ मे २०२० रोजी अनिल अंबानींना १२ जून २०२० पर्यंत चीनच्या तीन बँकांचे ७१,६९,१७,६८१ डॉलर्स (जवळपास ५ हजार २८१ कोटी रुपये) कर्जाची रक्कम आणि ५० हजार पौंड्स (जवळपास ७ कोटी रुपये) कायदेशीर प्रक्रियेच्या खर्चाच्या रकमेपोटी भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १५ जून रोजी इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाच्या नेतृत्वाखाली चिनी बँकांनी अनिल अंबानी यांच्या संपत्तीची माहिती देण्याची मागणी केली.

या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत अंबानी यांनी सध्याच्या आपल्या आर्थिक परिस्थितीबीबत माहिती दिली आहे. अनिल अंबनी म्हणाले की, मी एक सर्वसामान्य आयुष्य जगत असून सध्या माझा खर्च पत्नी टीना अंबानी करत आहे. तसेच मागील सहा महिन्यात पत्नीचे ९ कोटी ९० लाखांचे दागिने विकले आहेत. आता स्वत:जवळ काही किंमती ऐवज उरलेला नाही, अशी माहिती अनिल अंबानी यांनी न्यायालयाला दिली.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनिल अंबानी लंडनमधील उच्च न्यायालयासमोर हजर राहिले. यावेळी जवळपास तीन तास प्रश्नोत्तरे झाली. संपत्ती, कर्जदार आणि खर्चाबाबतची माहिती त्यांना विचारण्यात आली. यावेळी माझ्या श्रीमंतीविषयी माध्यमांनी अफवा पसरवल्या, माझ्याजवळ कधीच रोल्स रॉयस ही आलिशान मोटार नव्हती. आताही केवळ एकच कार आपल्या सोबत आहे, असे अनिल अंबानी यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले आहे.

मध्यंतरी एरिक्सन या स्वीडिश टेलिकॉम कंपनीचे ६० दशलक्ष पौंडाचे देणे दिले नाही तर तुरुंगात टाकण्याची तंबी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांना दिली तेव्हा मोठे बंधू मुकेश यांनी ते पैसे देऊन कुटुंबाची लाज राखली होती. पण आता कुटुंबात कोणी मदत करायला तयार नाही, असे अनिल अंबानी यांनी स्पष्ट केले होते.

याच व्यक्तीला मोदींनी ३० हजार कोटींचे कंत्राट दिले : प्रशांत भूषण

 

अनिल अंबानी यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीवरून आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी निशाणा साधला आहे. ‘अनिल अंबानी यांनी युकेमधील न्यायालयात, वकिलांची फी भरण्यासाठी पत्नीचे दागिने विकले असून आता आपल्याकडे काहीही नाही, केवळ एक छोटी कार आहे अशी माहिती दिली. ही तीच व्यक्ती आहे ज्यांना मोदींनी ३० हजार कोटींचे राफेलचे ऑफसेट कंत्राट दिले,’ असे प्रशांत भूषण यांनी ट्विट केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी