35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईधारावीत पुन्हा 'कोरोना'चा फैलाव वाढला

धारावीत पुन्हा ‘कोरोना’चा फैलाव वाढला

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले असून सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

धारावीत पुन्हा दर दिवशी ५० पेक्षा जास्त रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे पालिकेने उपाययोजना सुरू केल्या असून लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. खास धारावीसाठी तयार करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर आतापर्यंत ४२४ लोकांनी लस घेतली आहे.

मुंबईत गेल्या आठवडयापासून मोठया संख्येने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या वर्षभरातील दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक मोडीत काढत बाधितांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून ओळख झालेल्या धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जी उत्तर विभागांतर्गत धारावी, दादर आणि माहीम हे परिसर येतात. त्यापैकी माहीम परिसरात धारावीपेक्षा ही अधिक रुग्ण आढळून येत आहे.

धारावीत छोटा शीव रुग्णालय अशी ओळख असलेल्या नागरी आरोग्य केंद्रात ही लसीकरणाला २२ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या केंद्रावर दिवसाला एक हजार लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र गेल्या तीन दिवसांत या ठिकाणी ४२४ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाने अभिनव संकल्पना अमलात आणल्या आहेत. या भागात चारचाकी वाहनांवरून ध्वनिक्षेपकांवरून लोकांमध्ये लसीकरणाबाबत आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती केली जात आहे. लक्ष वेधून घेणारी गाणी ऐकवत लोकांना लसीकरणासाठी येण्याबाबत आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर या भागात विविध भाषिक लोक राहत असल्यामुळे मराठी, हिंदी, तेलुगू, तमीळ, उर्दू आदी भाषांमधून लेखी आवाहन ही केले जात आहे.

 जी उत्तर विभागातील रुग्णांची सद्य:स्थिती

०.६४%   रुग्णवाढीचा दर

१०९     दिवस रुग्ण दुपटीचा कालावधी

३६४     प्रतिबंधित मजले

१४       प्रतिबंधित इमारती

२         प्रतिबंधित विभाग

विभाग  गुरुवारचे रुग्ण    एकूण उपचाराधीन रुग्ण

दादर    ४७                             ४२८

धारावी  ५८                             २८५

माहीम  ७५                             ५३७

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी