31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमुंबईआप्पासाहेबांना 'महाराष्ट्र भूषण' श्री सदस्यांना मृत्यू भीषण..नेटकरी बरसले !

आप्पासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ श्री सदस्यांना मृत्यू भीषण..नेटकरी बरसले !

खारघर येथे रविवारी पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात रणरणत्या उन्हात पोळून 13 श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेचे तीव्र राजकीय व सामाजिक पडसाद उमटू लागले आहेत. सोशल मीडियावर विरोधी पक्षातील नेत्यांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गोव्याला जायचे असल्यामुळे महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्याची वेळ बद्दलविण्यात आल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.

13 निरपराध श्री सेवकांच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनावर तोफ डागताना कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी असायला पाहिजे, हे प्रशासनाला कळत नाही काय? असा संतप्त सवाल विचारला आहे. निष्पाप श्री सेवकांच्या नाहक मृत्यूसाठी सांस्कृतिक कार्य खाते जबाबदार असून याप्रकरणी प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

नागपुरातील वज्रमूठ सभा आटोपताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कामोठे येथील रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या श्री सेवकांची आस्थेने विचारपूस केली.
सोशल मीडियावर या दुर्दैवी घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा केवळ मतपेटीसाठी होता. तब्बल 40 अंश सेल्सियस तापमानात आम्हाला होरपळायला लावले. सांगा आम्ही काय पाप केले होते? असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.
ट्विटरवर याबाबत काही नेटकऱ्यांनी काव्य ओळी टाकून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

“श्री आप्पासाहेबांना पुरस्कार महाराष्ट्र भूषण
नावात श्रीसदस्य असलेल्यांना मृत्यू भीषण

आम्ही काय पाप केले होते, 40 डिग्रीत पेटवण्यास
आधीच शेताच्या घामात चिपाड झालेले देह
थिजून गेले तुम्ही दिलेल्या मॄत्यूच्या भाषणात

उन्हाशीही भ्रष्टाचार केला तुम्ही,
उघड्या मैदानात आणले लोक वितळून जाण्या
तुमच्या डोक्यावर हायफाय छप्पर लाखोंचे

आप्पा आणि नेते आले गाड्या, विमानातून उडत
मृत्यूला कवटाळण्या भाविक रस्ते, शेताडी खुडत

आपण करू एसीतून ठंडा ठंडा कुल प्रवास
अडवून ठेऊ वाहतूक तासन्तास, लोकांच्या मरणासाठी

हे पुरस्कार सामाजिक भूषणाचे की मतपेटीचे?
गरिबांचे आयुष्य संपलेले असते पाच लाखांच्या मदतीत
त्यांचे अध्यात्माचे दुकान आणि यांचे राजकीय मकान
मात्र सुरू राहते पुढचे सावज हेरण्यासाठी
काल नानासाहेब, आज आप्पासाहेब उद्या सचिनसाहेब

लोकांच्या सरणावर भाजलेल्या पोळ्यांना
वास येतो आहे, निवडणुकींच्या घाणेरड्या खेळीचा

मना सज्जना आध्यात्मिक दुकान छान सुरू राहावे
राजकारणी, बुवाबाबांना श्रीहरी पाविजेतो स्वभावे
जनी सर्वसुखी असा कोण आहे?
तुमच्याकृपे मृत्यू घडो तेच आहेत
जय जय रघुवीर समर्थ!

एका नेटकऱ्याने अशी कविता करून या दुर्दैवी घटनेविषयी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

आता यांची संभावना ‘महाराष्ट्र दूषण’ म्हणून करावी का? तुमच्या सत्कारासाठी जमले होते ना तुमचे भक्त? मग का नाही गेलात विचारपूस करायला hospital मध्ये?? बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज यांच्या जीवावर उडवता ना?? Shame on धर्माधिकारी family….थोडाफार आदर होता मनात तो देखील नष्ट झाला…
अशा संतप्त शब्दात एका नेटकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा:

‘श्री सदस्यां’च्या मृत्युस आयोजकांसह अमित शाह कारणीभूत; विरोधी पक्षांचा घणाघात

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातासोबत चेंगराचेंगरीही; हा आयोजकांचा हलगर्जीपणा; अजितदादांनी सांगितली नेमकी चूक

महाराष्ट्र भूषण : शिंदे सरकारच्या 42°© रणरणत्या उन्हातील इव्हेंटने घेतले 11 बळी

“मना दुर्जना शक्तिपंथेचि जावे | महाराष्ट्र भूषण अधर्मास द्यावे | जनी लाजलज्जेस सोडून द्यावे | मनी अन् मसलचे दिवे ओवळावे ||

या काव्य ओळीच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल एकाने प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनासाठी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. पालघरवर बोलणाऱ्यांनी आता खारघरवर बोलावे, असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Bhushan to Appasaheb death to shree sadasya; netizens troll to event, Maharashtra Bhushan, Amit Shah, Sudhir Mungantiwar, cm eknath shinde, NCP, BJP, shivsena

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी