कोणताही माणूस मोठा होतो तो अंगभूत कर्तृत्वामुळे. अंगात मेहनत घेण्याची हिंमत असेल, यासोबत प्रामाणिकपणा, जिद्द आणि लोकसंग्रह यामुळे सामान्य माणूस मोठा होतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कथा यापेक्षा वेगळी नाही. पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांनी राजकारणात आपले स्थान निर्माण केलेय ते त्यांच्या मेहनतीतून. सकाळी सात वाजता ते सरकारी बंगल्यावर कार्यकर्ते, पदाधिकारी यांना भेटायला तयार असतात. हा दिनक्रम त्यांनी अनेक वर्षे सुरूच ठेवलेला आहे. त्यात खंड पडलेला नाही. हीच त्यांच्या राजकारणाची खासियत मानण्यात येते. जे कायद्यात बसेल, मनाला पटेल तेच अजित पवार करत असतात; त्यामुळे पक्षात आणि पक्षाबाहेर त्यांचे शत्रू आहेत. या शत्रूंना ते त्यांच्या परीने टोलवत असतात.
वडिलांचे अकाली निधन झाल्यावर पदवीधर असलेल्या अजित पवार यांनी शेती केली. शेतातील द्राक्ष गाडीत भरून मुंबईमध्ये विकले. शेती, पणन याचे अर्थशास्त्र शिकून घेतले. काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर राजकारणाचे धडे गिरवले. प्रशासनातील अधिकारी मंडळीकडून काम कसे करून घ्यायचे, वेळप्रसंगी शिस्तीचा बडगा उगारायचा, चांगले काम अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायचे; हे शरद पवार यांचे गुण अजित पवार यांना जवळून पाहता आले. त्यातून त्यांचा पिंड घडत गेला.
या शिदोरीवर त्यांनी २० वर्षाहून अधिक काळ अर्थ, जलसंपदासह विविध महत्वाची खाती सांभाळली आहेत. ते पाचव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. खरेतर मुख्यमंत्री बनण्याची पात्रता त्यांच्याकडे आहे. पण पक्षातील एकूण राजकारण पाहता सध्या तरी मुख्यमंत्री होणे कठीण असल्याने २०१९ मध्ये फडणवीस यांच्या मंत्री मंडळात त्यांनी तीन दिवस उपमुख्यमंत्री पद सांभाळले. पण हे सरकार अल्पावधीत कोसळले. आणि महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले.
या मंत्रिमंडळात अजित पवार यांना सर्वोच्च स्थान मिळू शकते अशी अटकळ होती. पण उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि अजित पवार यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंगले. राज्यातील मुख्यमंत्र्यानंतर महत्वाचे खाते म्हणजे अर्थखाते, हे खाते त्यांच्याकडे होते. सकाळी आठ वाजता ते कार्यालयात हजर राहत असत. कोरोना काळात यात खंड पडला नाही.
अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. देशभरात काँग्रेसची पडझड झाली. त्यामुळे राज्यातील राजकारण काहीसे वेगळ्या वळणाला जात होते. पण अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची मनीषा काही कमी झाली नाही. महाविकास आघाडीत नंतरच्या काळात त्यांचे मन रमत नव्हते. अखेर २ जुलै २०१३ रोजी ते आठ आमदारासह सत्तेत सहभागी झाले. आणि पाचव्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. शरद पवार यांच्याशी पंगा घेऊन अजित पवार यांनी आपला वेगळा गट बनवला असला तरी दोन्ही पवार पक्षात फूट पडल्याचे मान्य करत नाही.
पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. असे असताना अजित पवार गटाचे पक्ष बांधणीचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळेच की काय दररोज मंत्रालय समोरील राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी यांची गर्दी असते. अजित पवार यांनी त्यांच्या कामाचे वेळापत्रक ठरवलेले आहे.
शनिवारी, रविवारी ते बारामतीला असतात. तिथे जिल्ह्याचे, मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी येऊन भेटतात. दोन दिवस वगळून उरलले पाच दिवस सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ते देवगिरी या सरकारी बंगल्यावर आगाऊ वेळ घेतलेल्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना भेटत असतात. त्यानंतर 10 वाजता मंत्रालयात जातात. अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते सकाळपासून त्यांना भेटत असल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अजित पवार यांचे काम सुरू असते.दिवसभराच्या कामाचा शिणवटा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही.