33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईशरद पवारांनी धनंजय मुंडे यांचे 'या कारणा'साठी केले कौतुक

शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचे ‘या कारणा’साठी केले कौतुक

टीम लय भारी

मुंबई : धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून चार महिन्यांपूर्वी सूत्रे हाती घेतली. जानेवारीपासून दर महिन्याला आपल्या कामाचा अहवाल तयार करायला त्यांनी सुरूवात केली आहे. हा अहवाल ते शरद पवार व पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांकडे सादर करतात. आज सुद्धा मुंडे यांनी फेब्रुवारी महिन्यातील आपल्या कामाचा अहवाल पवार यांच्याकडे सादर केला. मुंडे यांच्या या आगळया वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करून पवारांनी शाबासकीची थाप दिली आहे.

सामाजिक न्याय मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी जानेवारी -२०२० या महिन्यात मंत्री म्हणून केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा पक्षश्रेष्ठी व राज्यातील जनतेसमोर मांडत मासिक अहवाल सादर करण्याची परंपरा सुरू केली होती. त्यानंतर आता फेब्रुवारी -२०२० या महिन्यात केलेल्या कामकाजाचा अहवालही मुंडेनी सादर करत ही परंपरा कायम ठेवली आहे.

फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कामकाजाचा ४० पानी अहवाल मुंडेंनी शरद पवार यांना सादर केला असून या अहवालाच्या प्रती पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनाही ते सादर करणार आहेत.

या अहवालामध्ये २९ दिवसांत फेब्रुवारी महिन्यात विभागांतर्गत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, मंत्रालयातील उपस्थिती, मंत्रालय बैठकीतील उपस्थिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनातील उपस्थिती व अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभाग व बीड जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या तरतुदी यांसह पालकमंत्री म्हणून केलेले कार्य व सामाजिक कार्याची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुंडे यांनी हा ४० पानी कार्य अहवाल शरद पवार यांना सादर केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते खा. सुनील तटकरे यांनाही या अहवालाच्या प्रती मुंडे सादर करणार आहेत.
मुंडे यांनी राज्याच्या जनतेसमोरही या अहवालाच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडण्याची परंपरा अखंड ठेवली आहे. शरद पवार यांनी मुंडेंच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सादर केलेल्या फेब्रुवारी – २०२० च्या या अहवालामध्ये विभागामार्फत घेण्यात आलेले ऊसतोड कामगार महामंडळ, माणगाव परिषदेचे आयोजन, वसतिगृहातील सेंट्रल किचन योजना, बार्टी संस्थेसोबत झालेली बैठक यांसह सर्व कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालय सोयीसुविधा विस्तार, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे यासह परळी या त्यांच्या मतदारसंघात केलेली कामे इत्यादी कामकाजाची सविस्तर माहिती दिली आहे.

या अहवालाच्या शेवटी महिन्याभरातील कामकाजाचा दिवसनिहाय अहवाल असून मुंडेंनी जनतेसाठी किती वेळ दिला याचाही सविस्तर लेखाजोखा मांडला आहे.

धनंजय मुंडे हे त्यांच्यातील संवेदनशीलता, त्यांच्या वक्तृत्व, निर्णय क्षमतेसह सामाजिक जाणिवा व वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. दर महिन्याला केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडल्याने पुन्हा एकदा हा वेगळेपणा दिसून आला असून याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतूक केले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी