30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयघोटाळेबाज भाजप हीच काँग्रेससाठी नामी संधी

घोटाळेबाज भाजप हीच काँग्रेससाठी नामी संधी

आदरणीय मल्लिकार्जुन खर्गे साहेब,

प्रभारी, काँग्रेस पक्ष (महाराष्ट्र )

महोदय,

देशात आणि राज्यात सध्याच्या काँग्रेस पक्षाची अवस्था फारच भयानक आहे. पक्षात कार्यकर्ते आहेत की नाहीत हा प्रश्न उपस्थित व्हावा असे वातावरण आहे.

ना कोणते प्रभावी आंदोलने, ना कोणती प्रभावी टिका टिपणी. फक्त पांढऱ्या शुभ्र, कडक इस्त्री मधील नेतेच कधीतरी आमावस्या पौर्णिमेला दिसतात. बाकी कार्यकर्त्यांचा भीषण दुष्काळ जाणवतो ( Opportunity for Congress to defeat BJP ).

खर्गे साहेब, देशात अतिशय वाईट, गंभीर आणि भुतों न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर आपण श्रद्धांजली व्यक्त करताना म्हणतो की, त्या व्यक्तीच्या जाण्याने समाजात पोकळी निर्माण झाली आहे.

खरे तर ती पोकळी वगैरे शब्द म्हणजे पोकळच असतात. परंतु सत्ताधारी भाजपा पुढे विरोधकांची मात्र पोकळी निर्माण झाली आहे हे मात्र नक्की.

त्या पोकळीची अनेक कारणे आहेत. भाजपाला जो कोणी नेता विरोध करेल त्याच्या भ्रष्टाचाराच्या फायली बाहेर काढू अशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उघड उघड धमकीच दिली जाते. त्याला घाबरून तो नेता गप्प बसतो.

ज्या आंदोलनाची दखल मीडिया घेते ते आंदोलन यशस्वी झाले असा एक सर्वसामान्य समज आहे. अण्णा हजारे आठवतात का ?  काय म्हणताय आरएसएसवाले ?  नाही नाही ते नाही. त्यांचे बघा आंदोलन मीडियाने कव्हर केले होते. संपूर्ण देश अण्णा अण्णा करण्यास मीडियाने भाग पाडले होते. ते अण्णा. असो.

सध्याचा ९५ % मीडिया हा दलाल आणि मोदी भक्त असल्याने ते तुम्हा विरोधकांना कोणतेच फुटेज देणार नाहीत. मोदीसाहेब सत्तेतून पायउतार होईपर्यंत या गुलाम मीडियाकडून तुम्ही कोणतीच अपेक्षा ठेऊ नका.

यापुढे तुमच्या काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया आता मेन मीडिया म्हणून वापरावा. तुमच्या पक्षाचा फक्त आयटी सेल असेल तर तो कार्यरत ठेवाच. परंतु ज्याप्रमाणे तुम्ही पक्षाची कार्यकारणी जाहीर करता त्याच धर्तीवर तुम्ही जिल्ह्याजिल्ह्यांत सोशल मीडियाची कार्यकारणी जाहीर करा.

या मंडळींना तुम्ही जोरात कामाला लावा. प्रत्येकाच्या कामाचे नियोजन करा. दर पंधरा दिवसांनी त्यांच्या कामाचा आढावा घ्या. पक्षाच्या फंडाचा जास्तीत जास्त वापर तुम्ही सोशल मीडिया सेल वर खर्च करा. अतिशय व्यावसायिकपणे तुम्ही हा सेल सांभाळा. त्यांना इतके मजबूत करा की , भाजपा सळो की पळो झाला पाहिजे .

या सोशल मीडियावरच भाजपाने देशाची सत्ता हस्तगत केली हे आपण चांगलेच जाणता. तुम्ही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून भाजपाची खेळी त्यांच्यावरच उलटवू शकता.

साहेब, केंद्र सरकारने गेल्या साडे सहा वर्षामध्ये इतक्या भयंकर आणि मोठ्या चुका केलेल्या आहेत आणि दररोज करीत आहेत त्या जर तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणल्या तर त्या सरकारविरुद्ध आंदोलने करायला तुमच्या पक्षाला ३६५ दिवस सुद्धा कमी पडतील.

उदाहरणार्थ काही महत्वाचे मुद्दे …

१. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख ( हा मुद्दा जुना नसून सर्वसामान्य जनतेचा आहे).

२. काळा पैसा बाहेर काढणार त्याचे काय ?

३. भाजपा पक्षाने देशभरात पक्षासाठी केलेली जमीन खरेदी

४. दिल्लीत बांधलेले सेव्हन स्टार भाजपा कार्यालय

५. पेट्रोल – डिझेलचे गगनाला भिडलेले भाव

६. विविध बँक घोटाळे

७. ईव्हीएम मशीन घोटाळा

८. फसलेली आणि प्रचंड आर्थिक घोटाळा असलेली नोटबंदी

९. संपूर्णपणे फसलेली जीएसटी

१०. हळूहळू होत असलेले रेल्वेचे खासगीकरण

११. सरकारी कंपन्यांची विक्री

१२. चुकीचे परदेशी धोरण

१३. पूर्वीचे सगळे मित्र देश शत्रू झालेत. उदा. नेपाळ, बांगलादेश

१४. संविधानाने स्थापन झालेली काँग्रेस पक्षांची सरकारे पाडणे. उदा . गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान इत्यादी

१५. चुकलेला लॉकडाऊन

१६. लॉकडाऊन चुकल्यामुळे कोरोनाच्या महासंकटास केंद्र सरकार जबाबदार

१७. देशाची अर्थव्यवस्था संपुष्टात येण्याचे निश्चित

१८. पीएम केअरचा महाप्रचंड घोटाळा

१९. चिनी आक्रमण

२०. चिनी आक्रमणाबाबत केलेले चुकीची वक्तव्ये

साहेब, हे बसल्या बसल्या लक्षात आलेले काही मुद्दे. जर ध्यानस्थ होऊन याचा विचार केला तर पीएच.डी.चा एक थिसिस होईल. इतक्या मोठ्या चुका यांनी केल्या आहेत. दररोज करीत आहेत.

लोकसभेच्या निवडणुका २०२४ होणार आहेत. आपल्या हातात साडे तीन वर्षे आहेत. भाजपाची मंडळी चलाख आहेत. त्यांच्याकडे पुढील २० वर्षाचे आराखडे तयार असतात. ती फारच हुशार लोकं आहेत. तुम्हाला एका विषयात गुंतवून ते दुसरेच मुद्दे पुढे आणतात आणि त्यांच्या दृष्टीने जे महत्वाचे असते ते तिसऱ्याच विषयाची बांधणी करीत असतात.

आता इतक्या कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात सुद्धा ते ५ ऑगस्टला रामजन्मभूमीचे भूमिपूजन करणार. पुढील साडे तीन वर्षात ते मंदिर बांधून पूर्ण करतील आणि त्या मंदिराच्या कामावर ते पुन्हा मते मागतील. उत्तरप्रदेश आणि बिहारचे मतदार भावुक आणि धार्मिक आहेत. लोकसभेच्या सर्वात जास्त जागा ह्याच दोन राज्यात आहेत. तुम्ही गणित समजून घ्या.

त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील ४८ जागा आहेत. साहेब, आपण महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आहात. या ४८ जागांपैकी एकही जागा भाजपाला जाता कामा नये. केंद्र सरकार आणि भाजपाबद्दल जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. आपल्या पक्षाने त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. तो जर घेता येत नसेल तर आपल्यासारखे कपाळ करंटे आपणच असाल.

महाराष्ट्र सरकारमध्ये आपणही प्रमुख घटक आहात. राज्यात सरकारमध्ये आहात म्हणून केंद्र सरकार विरोधात आपण आंदोलने करू शकत नाही असे नाही. दर आठवड्याला आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केलीच पाहिजेत.

केंद्र सरकारच्या विरोधात आपल्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रके वाटली पाहिजेत. आपण लोकसभेचा प्रचार ५ ऑगस्टपासूनच सुरू केला पाहिजे. ते रामजन्मभूमीचे भूमिपूजन करून लोकसभेचा निवडणूक प्रचार सुरू करीत आहेत. तुम्ही सुद्धा प्रचाराला सुरुवात करा.

महाराष्ट्र सरकारमध्ये आपल्याला काहीच स्थान नाही म्हणून आपले तथाकथित नेते उगीचच थयथयाट करीत आहेत. नशिबाने आणि पवार साहेबांच्या मेहेरबानीने सत्तेत आहात याचा त्यांना विसर पडतो. तिन्ही पक्षांनी एकजीव होऊन काम करा.

ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीसारखे वागलात तर भाजपाच्या रामाला तुम्ही तोंड देऊ शकता. अन्यथा हे भाजपायी राम स्वतः सत्तेत राहून तुम्हाला पुन्हा पुन्हा ५ – ५ वर्षाच्या स्लॉटने राजकीय वनवासात पाठवून देतील. सावध राहा. ते भाजपायी आपल्या तिघांमध्ये भांडणे लावतील, आपल्या आमदारांना लॉलीपॉप देतील आणि आपल्या पक्षाचा घात करतील.

आज संपूर्ण देशात राहुल गांधी या एकट्या माणसाने नरेंद्र मोदींसारख्या बलाढ्य माणसाशी पंगा घेतला आहे. फक्त आणि फक्त राहुल गांधीच नरेंद्र मोदींच्या विरोधात एकटे बोलत आहेत. बाकी देशात विरोधी नेते कोणी आहेत की नाही हा गंभीर आणि तितकाच महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राहुल गांधींना यांनी कितीही वेळा पप्पू म्हणून हिणवू देत. शेवटी राहुल गांधीच भारत नावाच्या देशाचे योग्य प्रधानमंत्री आहे हे भविष्यात सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.

तुम्ही काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपाच्या धोरणाविरोधात दररोज तुटून पडले पाहिजे. जनतेतील असंतोषाचा फायदा तुम्ही कधी घेणार ? आज तुमच्या जागी भाजपा असता तर तुम्हाला त्यांनी सळो की पळो करून सोडले असते.

साहेब, काँग्रेस पक्षाने मोदी साहेबांना गुजरात राज्यातच रोखले असते ना तर आताची काँग्रेसची दुर्दशा झाली नसती. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे गुजरातचे. त्यांना मोदी, शाह टीमने झुलवत ठेवले. गाफील ठेवले.

मोदींच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याबाबत सोनिया गांधींना अहमद पटेल यांनी त्या त्या वेळी जाणीवपूर्वक सल्ला दिला. त्याचे फळ आज काँग्रेसला आणि पर्यायाने सगळ्या देशाला ( यात भक्त सुद्धा आले ) भोगावे लागत आहेत.

साहेब, महाराष्ट्रात आपले सरकार आहे. त्याचा तुम्ही केंद्राच्या विरोधासाठी योग्य वापर करू शकता. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी महिन्या – दोन महिन्यांतून प्रत्यक्ष भेटत जा. फोनवरून सतत संपर्कात रहा.

शेवटी सध्याच्या आपल्या पक्षातील आमदारांच्या सतत बैठका घ्या. त्यांचे बौद्धिक घ्या. त्यांना मोकळे सोडू नका. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. त्यांच्या कुंडल्या मांडूनच तर भाजपा प्रत्येक वेळेस नवा मुहूर्त बाहेर काढत आहे. तेव्हा त्यांचे पंचांग बिघडविण्याचे काम हे महाराष्ट्राचे प्रभारी या नात्याने आपल्याला  करावयाचे आहे.

आपण एक उत्तम वक्ते, प्रशासक आणि अनेक नेतृत्व गुण असलेले नेते आहात. आपल्याला अधिक सांगणे बरे वाटत नाही.  परंतु कधी कधी आम्हा सर्वसामान्य माणसाला जे समजते ते अगदी वरच्या थरातील नेत्याला का कळत नाही असे बऱ्याचदा वाटते म्हणून हा पत्रप्रपंच.

धन्यवाद !

भाजपाला वैतागलेला आणि काँग्रेस सत्तेत यावी याचे स्वप्न पाहणारा एक सर्वसामान्य माणूस ,

ॲड. विश्वास काश्यप

माजी पोलीस अधिकारी,

मुंबई

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी