31 C
Mumbai
Friday, September 1, 2023
घरराजकीयअजित पवार गट घड्याळाच्याच आशेवर

अजित पवार गट घड्याळाच्याच आशेवर

एकीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत असतानाच महायुतीची देखील आज मुंबईत बैठक पार पडली. आगामी निवडणुकांच्या रणनितीवर आखणी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीचा अजित पवारांचा एक गट भाजपसोबत सत्तेत गेला आहे. हा गट आगामी निवडणुका महायुतीसोबत लढणार असून त्यांना राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह मिळेल अशी आशा वाटत आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज महायुतीच्या बैठकी दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये घ़ड्याळ चिन्हावरच लढणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हाचा प्रश्न निवडणुक आयोगाकडे गेला असून, निवडणुक आयोगाने पवार गटाला मागील काही दिवसांपूर्वी नोटीस देखील पाठविली होती. मात्र या नोटीसीला पवार गटाने सावध उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्ह कोणाला मिळणार या बाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसली तरी अजित पवार गटाकडून वारंवार त्यावर दावा केला जात आहे.

पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्रात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी देखील होत आहे. जरी आमदार, नेते पवारांसोबत नसले तरी जमीनीवरील कार्यकर्ता पवारांसोबत असल्याचे बोलले जात आहे. तसेच पवार मोदी यांच्या विरोधातील इंडिया आघाडीत महत्त्वाची भूमिका देखील पार पाडत आहेत. पवारांनी आपल्यासोबत यावे यासाठी अजित पवार गटाने त्यांची मनधरणी करण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र पवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. इतकेच काय पण फुटीर गटाने आपला फोटो देखील वापरु नये अशी कानउघडणी देखील केली.

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हावर अजित पवार गटाची आता भिस्त आहे. घड्याळ हे पक्ष चिन्ह आपल्यालाच मिळेल असे दावे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे करत आहेत. निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यामुळे अजित पवार गटाला देखील घ़ड्याळ चिन्ह आपल्याला मिळेल असे वाटत आहे.

आजच्या महायुतीच्या बैठकीत सुनिल तटकरे यांनी आगामी निवडणुका घड्याळ चिन्हावरच लढणार हे मुद्दामहून सांगतो असे म्हणत आपल्या तिघांना (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) जिल्हा, तालुका स्तरावर काम करावे लागेल, कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवावे लागेल असे देखील ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा 
मोदींच्या निकटवर्तीय मंत्र्याच्या घरात आढळला मृतदेह! मंत्री महोदय फसणार?
प्रेम संबंधास नकार, एक्स गर्लफ्रेंडची हत्याकरुन मृतदेह आंबोली घाटात फेकला
मेगाभरती! सरकारी नोकरी मिळवण्याची तरुणांना संधी!

यावेळी ते म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वात एक नवा विचार घेऊन देशभरात काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही जरी तुमच्यासोबत पहिल्यांदाच व्यासपीठावर असलो तरी आमच्या मनात संभ्रम असण्याचे काही कारण नाही. वैचारिक मतभेद असू शकतात, आपल्याला एकत्र येण्यास उशीर जरी झाला असला तरी आपले उद्दिष्ट 48 जागा जिंकण्याचे असून त्यासाठी एकत्र रहावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी