30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउदयनराजेंकडून पगडी घालून घेतात, अन् आम्हाला टोप्या लावतात : उद्धव ठाकरे यांची...

उदयनराजेंकडून पगडी घालून घेतात, अन् आम्हाला टोप्या लावतात : उद्धव ठाकरे यांची मोदी, शाहांवर टीका

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी – अमित शाह यांचे मला दिवसांतून दोन – चार वेळा फोन यायचे. सगळे निवळले म्हणून मी सुद्धा त्यावेळी मोदी व शाह यांचे उमेदवारी अर्ज भरायला गेलो होतो. पण नंतर त्यांना विसर पडला. उदयनराजेंकडून ते पगडी घालून घेतात. पण आम्हाला टोप्या लावतात, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी शाह व मोदी यांचे नाव न घेता केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सत्ता स्थापनेसाठी आमची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजपच्या नेत्यांनीच आमची काँग्रेस नेत्यांसोबत ओळख करून द्यावी. नितीन गडकरी व अहमद पटेल यांची आपसांत ओळख आहे. आमची कुणाशी ओळख नाही, अशा शब्दांत त्यांनी गडकरी यांनाही चिमटा काढला.

फडणवीस यांच्यावर तर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मी खोटेपणा मान्य करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत अमित शाह यांच्यासोबत अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली होती. पण काळजीवाहू (देवेंद्र फडणवीस) खोटे बोलतात हेच काळजीचे कारण आहे. शिवसेना प्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा झाली होती. अमित शाहांनी देवेंद्र फडणवीसांना माहिती दिली होती. फडणवीस म्हणाले होते, आता जाहीर करु नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेल असं ते म्हटले होते. तसेच आता सांगितलं तर पक्षात माझी अडचण होईल असंही फडणवीस म्हणाले होते. ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आता घेतला. मला खोटारडा ठरवला जात आहे. म्हणून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. जमत नाही असं म्हटलं तर एकवेळ ठीक आहे. पण ठरलंच नाही हे सहन करणार नाही. खोटं बोलण्याचा हिशोब काढला तर अच्छे दिन, नोटबंदीपासून कोण खोटं बोललं हे दिसेल. असा टोलाही त्यांनी लगावला. मी नरेंद्र मोदींवर कधीच टीका केलेली नाही, त्यांनी मला धाकटा भाऊ मानलं आहे, भावा-भावाचं नातं पाहून कोणाच्या पोटात दुखत असेल, तर त्याचा मोदींनी शोध घ्यावा. लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्यावर युती केली त्याचा आनंद होता. मात्र, जे झालं गेलं ते गंगेला मिळालं, गंगा साफ केली नसली तरी गंगा साफ करताना यांची मनं कलुषित झाली. यांच्या मनात सत्तेची लालसा इतक्या स्तरावर जाईन याची कल्पना नव्हती. असंही उध्दव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. त्यांनी मागील 5 वर्षात जे अचाट कामं केल्याचे म्हटले आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आम्ही त्यांच्यासोबत 5 वर्ष राहिलो नसतो तर त्यांना कामे करता आली नसती. म्हणजेच आम्ही विकासाच्या आड आलो नाही. आम्ही शब्द पाळतो. बाळासाहेबांकडून मी तेच शिकलो आहे. असंही उध्दव ठाकरे म्हणाले.

मी शिवसेनाप्रमुखांना मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते. ते मी काहीही करून पाळणारच. नाणारबद्दल सुद्धा हे खोटे बोलले. लोकसभेच्या युतीमध्ये अमित शाह यांचे अनेकदा फोन आले होते. मी अमित शाह, नरेंद्र मोदी यांचे उमेदवारी अर्ज भरायला गेलो होतो. त्यावेळी दिवसांतून मोदी – शाह यांचे दोन – चार वेळा फोन येत होते. मग आता का येत नाहीत ? ते उदयनराजेंकडून पगडी घालून घेतात, पण आम्हाला टोप्या घालतात. याचे आश्चर्य वाटते. मला खोटे ठरवले म्हणून भाजपसोबत सरकार स्थापनेची चर्चा थांबविली.

शिवसेनाप्रमुखांचा पुत्र कधी खोटे बोलू शकत नाही. मी अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी यांच्यावर टीका केली नाही. मोदी यांच्यावरही कधी टीका केली नाही. जे काही बोललो ते धोरणांवर बोललो. देवेंद्र म्हणतात, त्यांचे सरकार येणार. त्यांचे पर्याय ओपन झाले की, आमचेही होतील. हिंदूत्व म्हणजे सच्चाई. भाजपचे हिंदूत्व खोटे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मी विचारू इच्छितो की, खोटे बोलणे हिंदूत्वाच्या व्याख्येत बसते का ? महायुतीतील इतर पक्षांना विचारा तुम्हाला किती जागा मिळाल्या. तुमच्या चिन्हावर किती जागा लढविल्या. सरकार स्थापनेचा मी दावा केलेला नाही. माझे म्हणणे आहे की, लोकसभेच्या वेळी जे ठरले ते व्हायला हवे, असा पुनरूच्चार उद्धव यांनी केला.

महाराष्ट्रात भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना मदतकेंद्र सुरू करणार आहे. मी सगळ्या जिल्हाप्रमुखांशी बोललो आहे. निवडणुकीच्या पूर्वी घोषणा केली होती, त्या दुष्काळ मदतीची रक्कमही अजून आलेली नाही. लोक जिल्हाधिकाऱ्यांकडे जात आहेत. जिल्हाधिकारी म्हणतात आमच्याकडे पैसेच आलेले नाहीत, अशी टीका उद्धव यांनी फडणवीस सरकारवर केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी