35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रआश्चर्यम : दोन सख्खे भाऊ भाजप – शिवसेनेच्या अधिकृत तिकिटांवर आमने सामने

आश्चर्यम : दोन सख्खे भाऊ भाजप – शिवसेनेच्या अधिकृत तिकिटांवर आमने सामने

तुषार खरात : लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजप व शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोघांनाही आपापल्या पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. दोघांनीही पक्षाचे एबी फॉर्म भरलेले आहेत. अर्ज माघार घ्यायच्या शेवटच्या दिवशी दोघांपैकी कोणीच अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे दोघांमधील लढत निश्चित ठरलेली आहे. आश्चर्य म्हणजे, हे दोन्ही उमेदवार सख्खे भाऊ आहेत. परंतु हे सख्खे भाऊ एकमेकांचे कट्टर वैरी आहेत. या दोघा भावांमध्ये सरस कोण ठरणार याची लोकांमध्ये उत्सुकता आहेच, पण भाजप व शिवसेना पक्ष पातळीवरही कोण बाजी मारणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. या दोघा भावांबरोबरच आणखी एक तिसरा मातब्बर उमेदवार रिंगणात आहे. दोघांच्या भांडणात हा तिसऱा उमेदवार आपले गुणवत्तेने सरशी मारून जाईल, असेही अंदाज आता व्यक्त होऊ लागले आहेत.

आश्चर्यम : दोन सख्खे भाऊ भाजप – शिवसेनेच्या अधिकृत तिकिटांवर आमने सामने

 

महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकतेची ठरलेली ही लढत होऊ घातली आहे, सातारा जिल्ह्यातील माण – खटाव विधानसभा मतदारसंघात. काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासीय झालेले विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे या मतदारसंघात तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. त्यांचे सख्खे भाऊ शेखर गोरे राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत आले आहेत. दोघांनाही अनुक्रमे भाजप व शिवसेनेने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे.

 

वास्तवात, जयकुमार गोरे व शेखर गोरे या दोघा बंधुनी साधारण 12 – 15 वर्षांपूर्वी एकत्रच राजकारणाला सुरूवात केली होती. सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. जयकुमार गोरे यांना निवडून आणण्यामध्ये शेखर यांचा मोठा वाटा होता. जयकुमार यांच्यासाठी त्यांनी मतदारसंघाची मजबूत बांधणी केली होती. परंतु कालांतराने जयकुमार व शेखर या दोघा भावांमध्ये पटेनासे झाले. नंतर तर दोघांचे प्रचंड फाटले. एकमेकांचे तोंड पाहणे सुद्धा त्यांनी सोडून दिले. दोघांच्या कार्यकर्त्यांची तर अनेकदा आमनेसामने मारामारी सुद्धा झाली. त्यामुळे आपसुकच दोघांनी वेगवेगळे मार्ग पत्करले. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार काँग्रेसचे उमेदवार होते, तर शेखर गोरे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार होते. दोघांमध्ये तुंबळ लढत झाली. पण शेखर गोरे थोडे कमी पडले. जयकुमार यांची दुसऱ्यांदा लॉटरी लागली. त्यानंतर शेखर यांनी रासपला रामराम ठोकला व राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आताच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेखर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी आमदारकी शाबूत ठेवण्याच्या महत्वकांक्षेपायी जयकुमार यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला. जयकुमार यांना आमदारकीची सलग तिसरी टर्म टिकवून ठेवायची आहे, तर शेखर गोरे यांना जयकुमारला पराभूत करून स्वतःची ताकद दाखवून द्यायची आहे.

 

या दोघांची झुंज सुरू असतानाच तिसरे मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा झंझावात सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाआघाडीसह भाजप – शिवसेनेतील जुने नाराज गट, राष्ट्रीय समाज पक्ष इत्यादी पक्ष व गट – तटांच्या पाठींब्यावर देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

 

गोरे बंधू आणि देशमुख यांच्यात अतिशय महत्वाचा फरक आहे. गोरे बंधूंवर अनेक गुन्हे दाखल आहेत. तालुका स्तरावरील पोलीस, तहसिलदार, प्रांत, कृषी अधिकारी, तलाठी, गटविकास अधिकारी यांच्यापासून ते गावातील सामान्य राजकीय कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते अशा अनेक निष्पाप लोकांना गोरे यांनी नेहमीच धाकदपटशा दाखवला आहे. गोरे बंधूमुळे माण – खटाव मतदारसंघ महाराष्ट्रात बदनाम आहे. गावावरून ओवाळून टाकलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या दोन्ही बंधूनी प्रोत्साहन व ताकद दिली. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते, नागरिक, सरकारी कर्मचाऱ्यांवर या दोघांच्या कार्यकर्त्यांची नेहमीच दहशत राहिलेली आहे.

 

दुसऱ्या बाजूला प्रभाकर देशमुख यांनी उच्च पदांवर काम केले आहे. गोरे बंधूंच्या तुलनेत देशमुख यांच्याकडे अफाट ज्ञान, बुद्धीमता, नाविन्यपूर्ण कल्पना यांचा साठा आहे. कृषी, जलसंधारण, उद्योग, ग्रामविकास, शिक्षण या क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे. जोडीला नम्रता, विनयता, जमिनीवर पाय ठेवून काम करणे हे गुण त्यांच्याकडे आहेत. निवृत्तीनंतर देशमुख यांनी जलसंधारण, ग्राम विकास, सेंद्रीय शेती, गट शेती, कौशल्य शिक्षण, क्रीडा उपक्रम या कामांच्या माध्यमातून माण – खटाव मतदारसंघ पिंजून काढला आहे. गावागावांतील तरूण, बाया बापड्यांशी देशमुख व त्यांच्या पत्नी अनुराधा देशमुख यांनी आपलेसे केले आहे.

 

त्यामुळे माण – खटावची लढत दोन सख्ख्या भावांमध्ये आहे असे वरून वाटत असले तरी दांडगाई विरूद्ध सौजन्यशिलता असा सुद्धा या निवडणुकीला महत्वाचा कंगोरा आहे. या लढतीत भाऊ विजयी होणार का, दांडगाई वरचढ ठरणार का, बुद्धिमत्ता व सौजन्यशिलतेचा सन्मान होणार का, कमळ फुलणार का, धनुष्यबाण तीर मारणार का, की गुंडगिरीच्या विरोधात बहुपक्षीय एकजुटीच्या लोकशाहीचा विजय होणार अशी अनेकांगी उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी