34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाच्या साथीबरोबरच राज्यात घडत असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले.

यावेळी पुन्हा ‘लॉकडाऊन’च्या दिशेने जायचे नसेल तर वेळीच सावध व्हा, असे अगदी स्पष्ट शब्दांत सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला खबरदारीचा इशारा दिला. कोरोनाची लस अजून आलेली नाही. त्यामुळे कोरोना संपला असे समजून वावरू नका. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. सध्या तरी गर्दी टाळणे, मास्क वापरणे आणि हात धूत राहणे हीच त्रिसुत्री आपल्यासाठी तारणहार आहे. ही त्रिसुत्री तुम्हाला पाळावीच लागेल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोनाच्या साथीबरोबरच राज्यात घडत असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले.

दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. लशीवर अवलंबून न राहता, कोरोनाला रोखण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी, याबाबतचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले.

यावेळी उद्धव ठाकरे आज नेमके काय बोलणार? कुठला नवीन निर्णय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही. उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी सर्वांना कुठेही गर्दी न करण्याचे आणि आपआपली काळजी घेण्याचे आवाहन केले.

गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. मात्र आपण ते अतिशय साधेपणाने साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. जनतेकडून मिळालेल्या या सहकार्याला तोड नाही. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारचे सहकार्य मिळेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आतापर्यंतचे सर्व सण संयमाने साजरे केले. कार्तिकी यात्रेलाही गर्दी करु नका. उत्तर भारतीय बांधवांनी छट पूजा कुठेही गर्दी न करता साजरा केली. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे फुगत चाललेला कोरोनाचा आकडा खाली आला. यामुळे अनलॉकमध्ये अनेक सवलती दिल्या. परंतु सगळे उघडले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका. दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. परदेशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. गर्दी वाढली तर कोरोना मरणार नाही, तर तो अधिक वाढणार आहे. यामुळे गर्दी टाळा, असे ते म्हणाले.

जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी दुस-या लाटेचा धोका सांगितला. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक पाश्चिमात्य देशांत तर लाट नव्हे, त्सुनामीच आली आहे. तशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आपल्यासाठी राबत आहेत. त्यांच्यावर आणखी किती ताण आणायचा हा प्रश्न आहे आणि हे आपल्या हाती आहे. अनेक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनाची लाट आली आणि वैद्यकीय कर्मचा-यांची संख्या तोकडी पडली तर मग आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या महिन्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात घसरण सुरू होती. दररोज आढळून येणा-या रुग्णांची संख्या ब-या होणा-यांच्या तुलनेत कमी होती. मात्र दिवाळीत बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर कोरोनामुक्त होणा-यांची संख्या यापेक्षा कमी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना जास्त घातक आहे. तरुणांपासून वुद्धांना या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सर्वांनाच त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.

लशीकरणाबाबत अजून सर्व अंधातरी आहे. २४ ते २५ कोटी जनतेला लशीकरण करायची गरज आहे. लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्चित झालेले नाही. त्यामुळे लस येईल तेव्हा येईल, कोरोनापासून जेवढे शक्य होईल तेवढे लांब राहा, असे आवाहन त्यांनी केले.

जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणा-यांवर ती जबाबदारी नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोल लगावला. अनावश्यक घराबाहेर पडू नका, कोरोनाची लक्षणे दिसली तर लगेच चाचणी करा, ही मी कळकळीची विनंती करतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी जाणे टाळा, मास्क लावणे विसरु नका, हात धुवत रहा, योग्य अंतर पाळा, हेच कोरोना टाळण्याचे उपाय आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी वारंवार सांगितले.

https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/1014327615728701

https://www.facebook.com/search/top?q=cmomaharashtra

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी