31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओVideo : तानाजी चित्रपटात आक्षेपार्ह संवाद : शिवरायांचे स्वराज्य भगव्यासाठी, अन् ब्राह्मणांच्या...

Video : तानाजी चित्रपटात आक्षेपार्ह संवाद : शिवरायांचे स्वराज्य भगव्यासाठी, अन् ब्राह्मणांच्या जानव्यासाठी

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. शिवरायांच्या स्वराज्यात हिंदूंसह अठरापगड जातीचे, मुस्लिम धर्माचेही मोठे सरदार होते. परंतु अनेकांनी शिवरायांची प्रतिमा कट्टर हिंदूत्वावादी अशी रंगविली आहे. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या ‘तानाजी’ या चित्रपटातही शिवरायांचे स्वराज्य हिंदूत्ववादी व ब्राह्मणांचे असावे अशा पद्धतीने संवाद घुसडविण्यात आले आहेत.

अजय देवगण निर्मित ‘तानाजी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात अजय देवगणच्या तोंडी ‘प्रत्येक मराठा स्वराज्य, शिवाजी व ‘भगव्या’साठी वेडा आहे.’ असे वाक्य आहे. काजोल हिच्या तोंडीही असेच एक वादग्रस्त वाक्य घालण्यात आले आहे. ‘जेव्हा शिवाजी राज्यांची तलवार चालते तेव्हा महिलांचा पदर व ‘ब्राह्मणांचे जानवे’ सुरक्षित राहते’ असा संवाद काजोलच्या तोंडी आहे. अजय देवगण व काजोल यांच्या या संवादांत भगवा व ब्राह्मण या दोन संदर्भांमुळे शिवाजी महाराजांची प्रतिमा नाहकपणे कट्टर हिंदूत्वावादी रंगविली जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

साधारण तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रयतेचे राजे, अठरापगड जातींचे सहकारी, शेतकरी हितांविषयीची शिवरायांची भूमिका याबद्दल एकही संवाद दिसून येत नाही. ‘तानाजी’च्या ट्रेलरमध्येच शिवरायांना हिंदूत्ववादी दाखविले असेल, तर संपूर्ण चित्रपटात काय असेल असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सोबतीला अनेक मावळे जमा केले होते. यातीलच तानाजी मालुसरे हे एक मावळे होते. शिवाजी महाराजांच्या सुचनेवरूनच तानाजी यांनी कोंढाणा किल्ला जिंकला होता. परंतु हा किल्ला जिंकताना तानाजींना बलिदान द्यावे लागले होते. तानाजी यांच्यासह लढलेले बहुतांश मराठा सैनिक हे अठरापगड जातीतीलच होते. ट्रेलरमध्ये तानाजी व त्यांच्या लढाऊ सैनिकांचा पराक्रम दाखविणारा संवाद अधिक ठळकपणे असायला हवा होता. पण त्याऐवजी ब्राह्मण व भगवे असे शब्द घुसडवून अजय देवगण यांना नक्की कोणता संदेश द्यायचा आहे, असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Video : तानाजी चित्रपटात आक्षेपार्ह संवाद : शिवरायांचे स्वराज्य भगव्यासाठी, अन् ब्राह्मणांच्या जानव्यासाठी

कोंढाण्याच्या लढाईनंतर दोन म्हणी अजरामर होऊन गेल्या. ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे’, ‘गड आला, पण सिंह गेला’ या अजरामर झालेल्या दोन ऐतिहासिक म्हणी मराठी लोकांच्या तोंडावर आहेत. त्याला मात्र या ट्रेलरमधील संवादात कुठेही स्थान दिलेले नाही. त्यामुळे खऱ्या इतिहासापासून हा चित्रपट भलतीकडेच भरकटला नाही ना, असेही बोलले जात आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी आमच्या लहानपणापासून जे कट्टर हिंदूत्ववादी शिवाजी महाराज बिंबविले आहेत, त्याचाच दुसरा पार्ट तानाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहताना दिसतो. शिवाजी महाराज कधीही कट्टर हिंदूत्ववादी नव्हते. ते पूर्णतः मानवतावादी होते. त्यांच्याकडे प्रत्येक जाती धर्माचे, विशेषतः मुसलमान सैनिक होते. हे सैनिक छत्रपतींवर जिवापाड प्रेम करीत होते. महाराजांनी प्रत्येक स्त्रियांवर आईसमानच प्रेम केले. मग ती परदेशी स्त्री असो की, भारतीय समाजातील तळागाळातील स्त्री असो. त्यांच्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय मातृवादी होता. त्यामुळे त्यांनी फक्त मराठा, महिला किंवा जानवेदारी ब्राह्मण यांचेच संरक्षण केले असे म्हणणे म्हणजे छत्रपतींच्या कर्तृत्वावर डाग लावण्यासारखे आहे. विशेषत: त्यांना हिंदूत्ववादी राजा प्रस्थापित करणे म्हणजे त्यांची थोरवी मर्यादीत करण्यासारखी आहे. अजय देवगणने शिवाजी महाराजांना कितीही हिंदूत्ववादी या चक्रव्युहात फसविण्याचा प्रयत्न केला तरीही शिवाजी महाराजांचे मुळ कर्तृत्व हे ते भेदून बाहेर येईल. ते मानवतावादी होते हे सिद्ध होत राहिल. देवगण यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद वगळावेत, तसेच शिवरायांची प्रतिमा रयतेचा राजा म्हणूनच लोकांसमोर आणावी अन्यथा त्यांच्या घरासमोर ‘मी बुध्दिस्ट फाऊंडेशन’तर्फे लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

-एड. विश्वास काश्यप,अध्यक्ष, मी बुध्दिस्ट फाऊंडेशन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी