33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशनमराठी माध्यमाची प्राथमिक शाळा होणार हायटेक, आदर्श गाव 'निढळ'चे आणखी एक पाऊल

मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा होणार हायटेक, आदर्श गाव ‘निढळ’चे आणखी एक पाऊल

विलास कुलकर्णी : लय भारी न्यूज नेटवर्क

सातारा : इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे जिकडेतिकडे पेव फुटले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत अनेक माध्यमिक शाळा अध्ययन – अध्यापन पद्धतीमध्ये प्रभावी कामगिरी करीत आहेत. विशेषतः शहरी भागामध्ये अशा शाळांचे प्रमाण वाढले आहे. परंतु ग्रामीण भागातील एक प्राथमिक शाळा – ती सुद्धा मराठी माध्यमाची, आता कात टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शाळा उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या निढळ या आदर्श गावात ही शाळा उभी राहत आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असलेली ही शाळा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. शाळेची जीर्ण झालेली इमारत पाडून आता तिथे नवी इमारत उभारण्यात येणार आहे. स्वतः दळवी व गावकऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तब्बल 60 लाख रुपये खर्च करून ही शाळा उभारण्यात येणार आहे. सोबतीला डिजिटल क्लासरूम, डिजिटल बोर्ड, इंटरनेट सुविधा, ऑडियो – व्हिडीओ असे तंत्रज्ञान असेल. शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग, एक डिजिटल क्लासरूम, शिक्षकांसाठीची खोली, मुख्याध्यापकांचे दालन अशा एकूण सात खोल्या असतील. बदलत्या काळाशी सुसंगत अशी ही शाळा असेल.

मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा होणार हायटेक, आदर्श गाव 'निढळ'चे आणखी एक पाऊल
निढळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संकल्पचित्र

शाळेसाठीचा निधी उभा करण्यासाठी फिनोलेक्स कंपनीने मदतीचा हात दिला आहे. खासगी सामाजिक सहभाग (सीएसआर) निधीतून फिनोलेक्सने ही मदत केली आहे. फिनोलेक्सच्या मुंकुंद माधव ट्रस्टमार्फत 45 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देऊ केले आहे. या ट्रस्टच्या विश्वस्त नीतू छाब्रिया यांनी आम्हांस तात्काळ मदत देऊ केली. त्यानंतर उर्वरीत 15 लाख रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेकडून मंजूर झाले. शाळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल, व आगामी शैक्षणिक वर्षांत मुलांसाठी ही नवी शाळा तयार झाली असेल, अशी माहिती चंद्रकांत दळवी यांनी ‘लय भारी न्यूज नेटवर्क’शी बोलताना दिली.

निढळच्या विकासाला सुरूवात शिक्षणापासूनच झाली. हनुमान विद्यालय निढळ या आमच्या माध्यमिक शाळेच्या उभारणीसाठी गावामध्ये सन 1983 ते 1993 या दहा वर्षांच्या कालावधीत मोठी चळवळ उभी राहिली होती. गावकरी, नोकरदार यांनी मोठ्या प्रमाण देणगी दिल्या. गावांतील निर्मळ आडनावांच्या मंडळींनी 10 एकर जागा दिली. त्यानंतर माध्यमिक शाळेची देखणी इमारत उभी राहिली. माध्यमिक शाळेप्रमाणेच प्राथमिक शाळाही उभारण्याबाबत बरीच चर्चा सुरू होती. अखेर या चर्चेला मूर्त स्वरूप मिळाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शाळा उभी राहिलेली असेल.

– चंद्रकांत दळवी, निवृत्त आयएएस अधिकारी

शाळेच्या नवीन इमारतीच्या भुमिपुजनाचा कार्यक्रम नुकताच चंद्रकांत दळवी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व फिनोलेक्सचे अधिकारी संतोष शेलार उपस्थित होते.

शाळेची सध्याची इमारत सन 1907 मध्ये बांधली होती. सुरूवातीला दोन खोल्या होत्या. नंतर त्या वाढविण्यात आल्या. तब्बल एकशे दहा वर्षे या जुन्या इमारतीची दयनीय अवस्था झाली होती. दुरूस्ती करण्यासारखीही परिस्थिती नव्हती. दुसऱ्या बाजूला निढळ गावात अन्य विकासकामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली होती. माध्यमिक शाळा, ग्रामपंचायत, सोसायटी, महिला बचत भवन, निळकंठेश्वर पतसंस्था, जिल्हा सहकारी बँक यांसाठी देखण्या इमारती उभ्या राहिल्या होत्या. प्राथमिक शाळेचा विकास मागे राहिला होता. त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी मिळून शाळा उभारणीचा आराखडा तयार केला. त्याला नीतू छाब्रिया आणि जिल्हा परिषदेने सहकार्य केले. त्यामुळे शाळा उभारणीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.

मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा होणार हायटेक, आदर्श गाव 'निढळ'चे आणखी एक पाऊल
शाळेच्या नवीन इमारतीच्या भुमिपुजनाचा कार्यक्रम नुकताच चंद्रकांत दळवी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व फिनोलेक्सचे अधिकारी संतोष शेलार उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन गुरव गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी गावचे सरपंच श्रीमंत दादासो  निर्मळ, उपसरपंच छाया बाळकृष्ण खुस्पे, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, व्यवस्थापकीय समिती, सर्व संस्थांचे पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी