34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रCovid19 : उद्धव ठाकरेंचा इशारा, आग भडकविण्याचे काम करू नका, मी सहन...

Covid19 : उद्धव ठाकरेंचा इशारा, आग भडकविण्याचे काम करू नका, मी सहन करणार नाही

टीम लय भारी

मुंबई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ( Covid19 ) वांद्रे येथे आज उसळलेल्या गर्दीनंतर उद्धव ठाकरे यांनी ‘आग भडकविण्याचे काम करू नका, मी कोणाला सोडणार नाही. ही राजकारण करण्याची वेळ नाही. ते गरीब मजूर आहेत. त्यांचा वापर राजकारणासाठी करू नका’ अशा शब्दांत समाजकंटकांना इशारा दिला आहे.

हे वैश्विक ( Covid19 ) संकट आहे. सगळेजण एकजूट दाखवून या संकटाला सामोरे जाऊया. याच्यात राजकारण आणू नका. राजकारण करण्यासाठी आयुष्य पडले आहे. केंद्र व राज्य सरकार हातात हात घेऊन काम करीत आहे. माझे सगळ्या पक्षांच्या प्रमुखांशी बोलणे झाले आहे.

Coronavirus

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, शरद पवार, राज ठाकरे अशा प्रमुख राजकीय नेत्यांशी मी बोललो आहे. हे सगळेजण सकारात्मक आहेत. मी अनेक मुल्ला मौलवींशीही बोललो असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

लॉकडाऊन आज संपेल असे वाटल्याने वांद्रे रेल्वे स्थानकात परप्रांतीय मजूर आले होते. गावी जाण्यासाठी रेल्वे सुरू झाल्या असल्याचे पिल्लू कुणीतरी सोडून दिल्याने ते जमा झाले होते. रेल्वे सुरू करण्याबाबत मी सुद्धा केंद्र सरकारला बोललो आहे.

पण बाहेरील राज्यातून मुंबईत आलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की, तुम्ही इथे राहा. तुमची सगळी काळजी आम्ही घेतो. या संकटकाळात तुमची गैरसोय होऊ देणार नाही. तुम्ही आपल्याच देशात आहात. लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्ही हवे तिथे जाऊ शकता. पण तोपर्यंत इथेच थांबा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्रात जास्त रूग्ण असल्याचा जाणीवपूर्वक प्रचार सुरू आहे. त्याबद्दलही ठाकरे यांनी आपल्या भाषणात परामर्श घेतला. ते म्हणाले, इतर राज्यांच्या तुलनेत आपण जास्त ( Covid19 ) चाचण्या केल्या आहेत. घरोघरी जाऊन आपण चाचण्या करीत आहोत. मुंबई – पुणे एकच शहर झाल्यासारखी स्थिती आहे. इथे आव जाव घर तुम्हारा अशी स्थिती आहे. त्यामुळे जरी रूग्ण वाढले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही.

डॉक्टरांचा मी एक टास्क फोर्स तयार केला आहे. कालपासून ते काम करीत आहेत. महाराष्ट्रात उपाचाराची दिशा हा टास्क फोर्स ठरवित आहे. ही टीम आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करीत आहे. सरकारी, महापालिका व खासगी डॉक्टर यांत सहभागी झाले आहेत.

कोविड ( Covid19 ) आणि कोविड नसलेल्या रूग्णालयांची विभागणी केली आहे. कोविड नसलेल्या रूग्णालयांत इतर गंभीर आजारांवर उपचार केले जात आहेत.

कोरोना ( Covid19 ) आपत्तीनंतर पुढे आर्थिक संकट येऊ घातलं आहे. त्यालाही तोंड देण्याची तयारी आपण करीत आहोत. त्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली टीम तयार केली आहे. लॉकडाऊन कसा कमी करावा. कोणते उद्योग हळहळू सुरू करता येतील. त्यावर ही टीम काम करीत आहे.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सुद्धा एक टीम तयार केली आहे. विजय केळकर, अजित रानडे अशा तज्ज्ञांचा या टीममध्ये समावेश आहे. या संकटात वाचायचे कसे. दुष्परिणाम कसे टाळायचे. पुन्हा झेप कशी घ्यायची याची तयारी ही टीम करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपला देश कृषीप्रधान आहे. बळीराजा आपला आत्मा आहे. त्यामुळे या ( Covid19 ) आपत्तीमध्ये आपण शेतकऱ्यांना अडविलेले नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत, शेतीविषय़क दुकाने चालू राहू द्या. शेतकऱ्यांचा माल थांबवू नका. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरायचे कारण नाही.

पंतप्रधान बोलले आहेत, त्यानुसार 20 तारखेनंतर किती उद्योग सुरू करायचे हे सुद्धा आम्ही ठरवू. तोपर्यंत कुणी घाबरू नका. राज्यातील 10 जिल्ह्यांत विषाणूला प्रवेश करू दिलेला नाही. उरलेल्या जिल्ह्यांतूनही हा विषाणू हद्दपार करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई व पुण्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. जिथे रूग्ण आढळत आहेत, तिथे कॉरन्टाईन करीत आहोत. तो झोन सील केला जात आहे. अन्य ठिकाणी कोरोना ( Covid19 ) पसरणार नाही याची काळजी घेत आहोत. अन्नधान्य, दुध, औषधे अशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरू आहे.

‘कोरोना’वर ( Covid19 ) उपचारासाठी महाराष्ट्राने काही प्रयोग केले आहेत. या प्रयोगांना केंद्राकडे परवानगी मागितली आहे. देशावरील संकटात महाराष्ट्र नेहमीच देशाच्या मदतीला धावून गेला आहे.

आपल्याकडे मूळ तुटवडा हा पीपीई कीटचा आहे. जगभरात सगळीकडेच हा तुटवडा आहे. पण आपण डॉक्टर्स व वैद्यकीय स्टाफला पीपीई कीट तयार करून देत आहेत. कुणी व्हेंटीलेटर्स तयार करून देत आहेत. अनेक उद्योजक पुढे येत आहेत.

गेल्या आठवड्यात मी आवाहन केले होते. वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त परिचारिका, वॉर्ड बॉय, डॉक्टर, लष्करातील वैद्यकीय सेवा बजावलेले जवान, वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेले तरूण अशांनी पुढे यावे. महाराष्ट्राला तुमची गरज असल्याचे मी म्हटले होते. त्यानंतर आतापर्यंत 21 हजार जणांनी आपली नावे पाठविली आहेत. या सगळ्यांची छाननी सुरू आहे.

राज्यभर धान्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू आहे. सव्वा कोटी कुटुंबियांनी धान्य नेले आहे. केंद्राच्या योजनेतील तांदूळ वाटप सुद्धा सुरू आहे. डाळ वाटप करण्याचाही आमचा प्रयत्न आहे.

शिवभोजन 80 हजार ताटे वाढविली आहेत. दररोज लोकांना भोजन दिले जात आहे. आणखी आवश्यकता वाटली तरी शिवभोजनच्या ताटे वाढविली जातील. 6 लाख मजुरांच्या जेवण व नाश्ताच्या सोय केलेली आहे. तरीही हे लोक परेशान आहेत. कारण त्यांना त्यांच्या गावी जायचे. पण त्यांनी चिंता करू नये. आम्ही तुमची काळजी घेण्यास समर्थ आहोत, असे ठाकरे म्हणाले.

पुढील एक – दीड महिन्यांत पाऊस सुरू होईल. दुर्गम भागात औषधे, अन्न धान्य पुरवठा करावा लागेल. त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी आताच कामाला लागा असे मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. आदिवासी भागात पावसाळ्यात वाहतूक करणे दुरापास्त होत असते. तिथे आताच उपाययोजना करण्याच्या सुचनाही केल्याचे ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Lockdown2 : मंत्री एकनाथ शिंदेंमुळे तामिळनाडूत अडकलेल्या 160 मराठी तरूणांना मिळाला आधार

Coronavirus अजितदादांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ समितीची स्थापना

Lockdown2 : लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविला, नरेंद्र मोदींची घोषणा

खोट्या व्हिडीओच्या आधारे तबलिगींची बदनामी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी