35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeराजकीयSunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ

तुषार खरात

राज ठाकरे यांच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ला येत्या ९ मार्चला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. या १४ वर्षांच्या काळात मनसेने अनेक चढउतार पाहिले. अर्थात उतारच जास्त पाहण्याचे नशिबी आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीत वाढलेल्या राज ठाकरे यांच्याकडे प्रभावी वक्तृत्वशैली आहे. अभ्यासू वृत्ती आहे. माणसेही त्यांना ओळखता येतात. बाळासाहेबांचे राजकारण, संघटन कौशल्य, माणसे जोडण्याची कला, एवढेच काय अगदी व्यंगचित्रकला सुद्धा राज यांनी जवळून पाहिली, आणि हे सगळे आत्मसात सुद्धा केले.

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ
बाळासाहेब ठाकरेंच्या सावलीतच राज ठाकरे वाढले

बाळासाहेबांच्या एवढे जवळ राहण्याचे भाग्य उद्धव ठाकरे यांनाही लाभले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी जेव्हा बंड पुकारून मनसेची स्थापना केली तेव्हा शिवसेनेला भगदाड पडेल असे वाटले होते. शिवसेनेतील तेव्हाचे मातब्बर नेते शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर, वसंत गीते, प्रवीण दरेकर इत्यादी मंडळी सुद्धा राज साहेबांबरोबर बाहेर पडली. काही दिवस अगोदरच नारायण राणे हे सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसवासी झाले होते.

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ
उद्धव ठाकरे यांची शिवसेनेत एंट्री होताच नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाची शैली राज यांना पक्की ठाऊक आहे. त्यामुळे राज ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ला यशाच्या शिखरावर नेतील, असा होरा त्यावेळच्या राजकीय अभ्यासकांनी बांधला होता. बाळासाहेब ठाकरेंनी पुत्राला म्हणजे उद्धव ठाकरे यांना वारसा हक्काने आपली गादी दिली आहे. पुत्रप्रेमासाठी बाळासाहेबांनी राज यांना दुय्यम स्थान दिले आहे. असा त्यावेळी प्रचार झाला होता. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सन २००६ मध्ये मोठ्या दिमाखात ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ची स्थापना केली. त्यावेळी आपला पक्ष ‘मराठी’ आणि ‘महाराष्ट्र’ हितासाठीच असल्याचे त्यांनी ठासून सांगितले होते. पक्षाच्या ध्वजामध्ये निळा, हिरवा व भगवा असे तिन्ही रंग होते. दलित, मुस्लीम व हिंदू अशा सगळ्यांना सामावून घेणारा हा पक्ष असल्याचे त्यांनी त्यावेळच्या ध्वजातून दाखविले होते. त्यानंतरची पुढची १४ वर्षे त्यांचा प्रवास ‘मराठी’ व ‘महाराष्ट्र’ या मुद्द्यावरच झाला.

सुरूवातीला मराठी मतदारांनी मनसेला डोक्यावर घेतले. तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते. राज्यातही आणि केंद्रातही. या सत्ताधारी पक्षांविषयी जनतेमध्ये कोणतेही नाविन्य, कुतूहल उरलेले नव्हते. भाजपमध्येही कमालीची मरगळ होती. केंद्रीय नेतृत्व लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे होते. नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्व यायला अजून अवकाश होता. राज्यात गोपीनाथ मुंडे नाराज होते. ते काँग्रेसमध्ये जातील अशाही चर्चा होत्या. नारायण राणे व राज ठाकरे यांच्या बंडामुळे शिवसेनेला घरघर लागल्यासारखे वातावरण होते. उद्धव ठाकरेंना आपला करिश्मा दाखवायला अजून बराच वेळ होता. किंबहूना उद्धव ठाकरे टीकेचे धनी ठरले होते. अशा राजकीय अविश्वासाच्या वातावरणात राज ठाकरे आपल्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ला घेऊन मैदानात उतरले. एका बाजूला त्यांची जबदस्त भाषणे, तर दुसऱ्या बाजूला मनसैनिकांची रस्त्यांवरील आंदोलने यांमुळे ‘मनसे’ने मराठी मनांवर गारूड केले. तरूणांमध्ये तर मोठीच क्रेज निर्माण झाली होती. सामान्य जनताच काय, अगदी राजकीय नेतेही राज यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी नितीन गडकरी, विनोद तावडे, गोपीनाथ मुंडे हे सुद्धा राज ठाकरे यांची सोबत घेण्यासाठी आसुसले होते. देवेंद्र फडणवीस तेव्हा भाजपमधील अगदीच किरकोळ नेते होते. ‘मराठी’चा कैवार घेऊन राज यांनी पुरत्या महाराष्ट्रात हवा केली होती.

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी राज ठाकरे यांना भेटले होते.

अशा या भारलेल्या वातावरणात मनसेने मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत ७ नगरसेवक निवडून आणले. दुसऱ्या निवडणुकीत तर तब्बल २७ नगरसेवक निवडून आणले. नाशिक महानगरपालिकेची पूर्ण सत्ता मनसेच्या ताब्यात आली. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने १५ लाख मते घेतली. त्यामुळे शिवसेना व भाजपचे उमेदवार आपटले. त्याचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. इतके मोठे यश मिळाल्यानंतर खरेतर मनसेला मागे वळून पाहण्याची गरजच नव्हती. साधा सरपंच म्हणून निवडून येऊ शकणार नाही, असे तरूण आमदार – नगरसेवक म्हणून लिलया विजयी झाले. राज ठाकरे यांच्या जादूची ती कमाल होती. राज ठाकरे यांचे मनसैनिक मराठी मुद्द्यावर रस्त्यावरच्या आंदोलनातही अग्रेसर होते. त्यांनी परप्रांतियांना सळो की पळो करून सोडले होते. महाराष्ट्रातील सरकारी यंत्रणेनेही मनसेचा मोठा धसका घेतला होता.

पण दुर्दैवाने मनसेचा हा झंझावात फार काळ टिकला नाही. राज ठाकरे यांनी लोकांना स्वप्नं दाखविली होती. जनतेची ही स्वप्ने पूर्ण करण्यामध्ये राज ठाकरे यांच्या आमदार – नगरसेवकांना स्वारस्य नव्हते. आपण आमदार – नगरसेवक झालो पाहिजे. आपण भक्कळ पैसा कमविला पाहीजे असा स्वार्थ घेऊनच अनेकजण पक्षात आले होते. या स्वार्थी लोकांनी राज ठाकरे यांच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राकडे कधी पाहिलेच नाही. उलट पक्ष बदनाम करण्याचेच काम त्यांनी केले. हे ओळखायला राज ठाकरे यांना उशीर झाला. किंबहूना आपल्या पक्षातील अशा स्वार्थी मंडळींना लगाम घालण्यात राज कमी कमी पडले. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनातून मनसेबद्दलचे प्रेम काहीसे कमी झाले. अशातच अनेक मंडळींनी राज यांची साथ सोडून पुन्हा शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केला.

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ
‘मराठी’साठी राज ठाकरे यांनी न्यायालयाचेही उंबरठे झिजवले

याच दरम्यान सन २०१४ च्या लोकसभा निवडणुका झाल्या. नरेंद्र मोदी यांची त्यावेळी मोठी लाट उसळली होती. दुर्दैवाने राज यांनीही नरेंद्र मोदींचे गुणगाण गायले. त्यावेळी ते गुजरातलाही जाऊन आले. राज ठाकरेंनी स्वतःची लोकप्रियता एक प्रकारे नरेंद्र मोदी यांच्या हवालीच दिल्यासारखे झाले. त्या लोकसभा निवडणुकीत भाजप – शिवसेनेच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अवघा एक आमदार निवडून आला. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. शिवसेनेतून मनसेमध्ये आलेले जुन्नरचे सुधाकर सोनावणे यांच्या रुपाने मनसेचे विधानसभेतील आस्तित्व कसेबसे टिकले. नाशिक व मुंबई महानगरपालिकेतही मनसेच्या पदरी अपयश आले.

सन २००६ पासून २०१४ पर्यंत मनसे फॉर्मात होती. पण सन २०१४ नंतर लागलेली उतरती कळा अद्याप कायम आहे. आताच्या २०१९ मधील विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या पदरी निराशच पडली. लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा केला नव्हता. पण नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्याविरोधात राज ठाकरे यांनी जोरदार सभा घेतल्या. राज यांच्या सभांमुळे भाजपलाही घाम फुटला. त्यांच्या या सभांचा काँग्रेस व राष्ट्रवादीला फायदा होईल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. या काळात ते शरद पवार यांच्या अगदीच निकट गेले. भाजपवर ते सतत घणाघाती टीका करीत होते. पुलवामा, बालाकोट अशा मुद्द्यांवरून त्यांनी भाजपला घेरले होते.

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ
ऱाज यांनी सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले होते, पण २०१९ मध्ये मात्र मोदी यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला होता.

नंतर विधानसभा निवडणुकीतही राज यांनी जोरदार सभा घेतल्या. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना फार जागा मिळतील असे कुणालाही वाटत नव्हते. पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला अपेक्षेपेक्षाही जास्त यश मिळाले. या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांना चांगले यश मिळाले असताना मनसेला मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले. हे कमी म्हणून की काय, भाजपसोबतचा महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने राज्यात सत्ता स्थापन केली.

सहानुभूती म्हणा किंवा गरजवंत म्हणा पण गेल्या काही वर्षांत राज ठाकरेंची काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढली होती. सन २०१९ नंतर कदाचित ती आणखी वाढली असती. त्यातून मनसेला उभारीही मिळू शकली असती. पण झाले भलतेच. या दोन्ही पक्षांसोबत शिवसेना गेली आणि थेट सत्तेत सहभागी झाली. त्यामुळे मनसेला कुणीही सहानुभूतीदार भिडू उरलेला नाही. शिवाय २०१४ नंतर पक्षाला लागलेली ओहोटी थांबवायची कशी हा प्रश्न महत्वाचा आहेच. नरेंद्र मोदी यांच्यावर यथेच्छ टीका केली. केंद्र व राज्यातील भाजप सरकारला उघड्यावर पाडण्याचेही काम केले. पण मनसेला यश मिळाले नाही. याचाच अर्थ मराठी मुद्द्यावर मनसेला यश मिळणे दुरापास्त आहे असे राज यांच्या लक्षात आले असावे.

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ
शरद पवार व राज ठाकरे यांच्यात सन २०१४ ते २०१९ या काळात फारच जवळीक वाढली होती.

आता शिवसेना ही काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष निधर्मवादी आहेत. शिवसेना मात्र हिंदूत्ववादी आहे. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला आपली आक्रमक हिंदूत्ववादी भूमिका आता मांडता येणार नाही. शिवसेना मुस्लिमांवर थेट टीका करू शकणार नाही. अशी टीका एकवेळ राष्ट्रवादी सहन करेल, पण काँग्रेस कदापी सहन करणार नाही. त्यामुळे शिवसेनेला मवाळ हिंदुत्वाची कास धरावी लागणार आहे हे अगदीच स्पष्ट आहे.

जे ‘मराठी’ आणि ‘महाराष्ट्रा’ने दिले नाही ते आता हिंदूत्वातून मिळू शकते असा ठाम विश्वास राज ठाकरे यांना वाटत असावा. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेल्याने शिवसेनेशी एकनिष्ठ असलेला हिंदू दुखावला गेला आहे. ही पोकळी भरून काढण्याची संधी आपल्याला चालून आली आहे. हा दुखावलेला हिंदू वर्ग आपल्याकडे आकर्षित करता येऊ शकतो. त्याचाच फायदा राज ठाकरे यांनी उठविण्याचा निर्धार केलेला दिसत आहे.

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ
जुना ध्वज आणि जुने धोरण मनसेला यश मिळवून देईल याची खात्री आता राज यांना वाटत नाही.

दुसरे असे की, राज ठाकरे यांच्या परप्रांतीय विरोधामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही मनसेसोबत २०१९ च्या निवडणुका लढवायला नकार दिला होता. पण परप्रांतियांचा मुद्दा मवाळ करून हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमक करायचा, आणि भाजपशी सुसंगत भूमिका घ्यायची असाही विचार राज यांचा असू शकतो. तसे केले तर भाजप व मनसे पुढील काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढले तर त्याचे नवल वाटायला नको.

‘यशाला वाटेकरी, अन् अपयशाला सल्लागार भरपूर असतात’ हा आधुनिक सुविचार राज यांनीच परवाच्या भाषणात सांगितला. हे सांगत असताना ते अपयशाला किती कंटाळले आहेत हे सुद्धा त्यांनी सुचित केले. अपयश आणखी किती काळ पचवायचे. मराठी व महाराष्ट्राच्या मुद्द्याने त्यांना फार साथ दिली नाही. भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर यथेच्छ टीका करूनही निवडणुकीत यश मिळाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे बोट धरून तग धरायचे म्हटले तर तिथे शिवसेना आडवी आली. त्यामुळे यश मिळविण्यासाठी काहीतरी नवी भूमिका घेणे गरजेचे होते. त्यातूनच राज यांनी हिंदुत्वाचे उघड धोरण स्विकारले आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळेल हा आता पुढील काळच सांगू शकेल.

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ
‘हिंदुत्वा’मुळे ‘मनसे”च्या अपयशाला लगाम बसेल असे राज ठाकरे यांना वाटत असावे.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना मराठी व महाराष्ट्राच्या मुद्द्यावरच केली होती. बाळासाहेबांच्या सभांनाही प्रचंड गर्दी व्हायची. सुरूवातीच्या काळात बाळासाहेबांनाही निवडणुकांमध्ये अपयश मिळायचे. यश मिळविण्यासाठी बराच काळ जावा लागला. बाळासाहेबांनीही नंतर मराठी मुद्दा मवाळ करून हिंदूत्वाची कास धरली. हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतरच १९९६ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपच्या साथीने सत्ता स्थापन झाली होती. बाळासाहेबांचा हा इतिहास कदाचित राज ठाकरेंना खुणावत असावा.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंची नवी गर्जना : हिंदूना नख लावाल, तर हिंदू म्हणून अंगावर जाईन

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी