35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंची नवी गर्जना : हिंदूना नख लावाल, तर हिंदू म्हणून अंगावर...

राज ठाकरेंची नवी गर्जना : हिंदूना नख लावाल, तर हिंदू म्हणून अंगावर जाईन

टीम लय भारी

मुंबई : मी मराठी सुद्धा आहे, आणि हिंदू सुद्धा आहे. मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर जाईन, आणि हिंदू म्हणून नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन अशी गर्जना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाअधिवेशनात केली. बदललेला झेंडा हा माझ्या मनातील आहे. त्यावरील महाराजांची राजमुद्रा ही आमची प्रेरणा आहे. या राजमुद्रेचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे स्पष्टीकरण राज यांनी यावेळी दिले.

राज ठाकरेंची नवी गर्जना : हिंदूना नख लावाल, तर हिंदू म्हणून अंगावर जाईन
मनसेचा नवा झेंडा

राज ठाकरे यांचे भाषण वाचा जसेच्या तसे

माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… झेंडा आवडला का ? येत्या ९ मार्चला पक्षाला १४ वर्षे पूर्ण होतील. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही विचार करीत होतो, पक्षाचे एक अधिवेशन घेणे गरजेचे आहे. सभा ज्यावेळी होते त्यावेळी सगळेजण एकत्र येतात. पण अधिवेशनात मनसेचे पदाधिकारी एकत्र येतात. दिवसभर एकमेकांची विचारपूस करतात. नाहीतरी अधिवेशनाची परंपरा हळूहळू कमी होत चालली आहे. पदाधिकाऱ्यांनी अनेक ठराव मांडले. अनेकजण उत्तम बोलतात. ९ मार्चला वर्धापन दिन, २४ मार्चला गुढीपाडव्याची सभा आहे.

राज ठाकरेंची नवी गर्जना : हिंदूना नख लावाल, तर हिंदू म्हणून अंगावर जाईन
जाहिरात

अनेक विषयांवर बोलायचे आहे. त्या अगोदर काही संघटनात्मक दोन – तीन विषय मांडायचे आहेत. परत त्या गोष्टी पक्षात होता कामा नयेत. त्यातील पहिला भाग सोशल मीडिया. फेसबुक, ट्विटर या सगळ्या गोष्टी आहेत. पक्षाचे अनेक पदाधिकारी, काही महाराष्ट्र सैनिक… ज्यांचा काही नाही संबंध नाही. डावा उजवा. पक्षासंदर्भात कोणतीही गोष्ट वाईट पद्धतीने आलेली चालणार नाही. तुम्हाला मत व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी नेते आहेत. अशा प्रकारची गोष्ट मला कुठून आढळली तर त्या व्यक्तीला मी त्या पदावरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष बऱ्याचदा सारख्या वयाचे असतात. वय जरी सारखे असले तरी पद महत्वाचे आहे. त्यांचा आदर ठेवा. लोकांपर्यंत गेले पाहीजे. त्यासाठी सोशल मीडिया कसा हाताळायचा याची खबरदारी तुम्ही घेतली पाहीजे.

कसं असतं की, मी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकारांनी आपल्याला खूप साथ दिली. पुढेही देतील अशी अपेक्षा आहे. यशाला खूप बाप असतात. यश मिळाले की, सगळे सांगतात माझ्यामुळे यश मिळाले. यशाला बाप खूप असतात, अन् अपयशाला सल्लागार खूप असतात.

पक्षात एक सेल तयार करीत आहोत. महाराष्ट्रातील ज्या लोकांना संघटना म्हणून काम करायचे असेल त्यांनी नोंद करावी. बारामतीचे पाठक सर आणि वसंत फडके हे दोघे तुमच्या संपर्कात राहतील. संघटनात्मक रचना आहेच, पण ती अधिक घट्ट करण्यासाठी हे दोघेजण आहेत. जे काम करणार नाहीत, त्यांचे नाव माझ्याकडे येईल.

शॅडो कॅबिनेट तयार केली आहे. पक्षातील नेते व सरचिटणीस एक टीम तयार करतील. महाराष्ट्रावर परिणाम करणारी महत्वाची खाती योग्य काम करतात की नाही त्यावर लक्ष ठेवतील. आपले सरकार आले तरी त्या टीम हे काम करतील.

झेंडा का बदलला ?. सन २००६ मध्ये मनसे पक्ष स्थापन केला तेव्हा माझ्या मनातला जो झेंडा होता तो हा आहे. मी शिवतिर्थावरच्या पहिल्या सभेत सांगितले होते, माझ्या आजोबांनी शिवसेनेला नाव दिले. संयुक्त महाराष्ट्र समितीचा हा झेंडा होता. नंतर संयुक्त महाराष्ट्र समिती विस्कटली, आणि शिवसेना जन्माला आली. बाळासाहेबांनी पुढे शिवसेनेला वाढवले. माझ्या मनात हा झेंडा होता. तो मी आता घेतला आहे. पण त्यावेळी मला बरेचजण म्हणाले की, हिरवा असला पाहीजे, सोशल इंजिनिअरींग झाले पाहीजे. मी म्हटले होते, अहो सर्वांना बरोबर घेऊनच शिवरायांनी शिवराज्य स्थापन केले. यापेक्षा मोठे सोशल इंजिनिअरींग काय असू शकते. त्यावेळी मी ३७ वर्षांचा होता. त्यामुळे मी सगळ्यांचे ऐकले.

गेल्या वर्षांभरापासून मला वाटत होते की, आपण बदलले पाहीजे. आताच्या परिस्थितीमुळे मी झेंडा आणल्याचे अनेकजण म्हणतात. पण तो योगायोग आहे. मूळ डिएनए हा झेंडा आहे. ‘कुणी धरलं आणि कुणी सोडलं’ (शिवसेनेने) याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही.

पक्षाच्या अधिवेशनात हा झेंडा आणायचे ठरवले होते. म्हणून आज हा झेंडा आणला. एक गोष्ट सांगतो, ही महाराजांची राजमुद्रा आहे. हा इतर झेंडा नाही. तो हातात घ्याल तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसता कामा नये. राजमुद्रा ही आपली प्रेरणा आहे.

आपले दोन झेंडे आहेत. हा एक, आणि दुसरा निशाणीचा. निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही. त्यामुळे राजमुद्रेचा गैरवापर होता कामा नये. पक्षाचा झेंडा बदलणे पहिल्यांदा होत नाही. १९८० साली जनसंघाने भारतीय जनता पक्ष असे नवे नाव धारण केले. त्यावेळी झेंडाही बदलला. मराठीत म्हण आहे, कात टाकावी लागते. भाकरी का करपली असेही म्हटले जाते.

मराठीचे काय होणार. हिंदुत्वाकडे का.. आजच सांगून ठेवतो. अंडरलाईन करून ठेवा. मी मराठी देखील आहे, आणि हिंदूदेखील आहे. यापूर्वीची १४ वर्षांतील भाषणे काढून बघितली तरी हे पाहायला मिळेल. मराठीला नख लावायला गेला तर मराठी म्हणून अंगावर जाईन. हिंदू म्हणून नख लावायला गेलात तरी हिंदू म्हणून अंगावर जाईन. माझा कोणताही वैचारिक गोंधळ नाही. मला रस्ता ठाऊक आहे. मी गेले काही दिवस ऐकतोय. हिंदूत्व हे धरणार, हिंदुत्व ते सोडणार.

देशाशी प्रामाणिक असलेले मुसलमान आमचेचे आहेत. मी एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान यांना नाकारू शकत नाही. जावेद अख्तरांना आम्ही नाकारू शकत नाही. ऊर्दू ही मुसलमानांची भाषा कधीच नव्हती. जर ती मुसलमानांची भाषा असती तर बांगलादेशी स्वतंत्र नसते. भाषा रिलिजनची नसते ती एका रिजनची असते. हे जरी एका बाजूला सगळेजण असले ती मी सरसकट मानायला तयार नाही. जे इथे येऊन धिंगाणा घालणार तिथे आम्ही आडवेच जाणार. रझा अकादामीच्या लोकांनी आंदोलन करून पोलिसांवर हात टाकला तेव्हा आम्हीच आंदोलन केले. ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना हाकलण्याचे काम मनसेने केले होते, तेव्हा का नाही मला विचारले की, हिंदूत्वाकडे चाललात म्हणून. दहिहंडीच्या थरांवर बोलले तेव्हाही मीच बोललो. हिंदू सणांच्या वेळी मनसेच उभी राहिली.

मी हे आज नाही बोलत आहे. याच्या अगोदरही मी अनेकवेळा बोललो आहे. धर्म घरांत ठेवावा. मशिदीवरील भोंगे बंद करा. आमची आरती, तुमची प्रार्थना आहे. तुम्ही जरूर नमाज पढा. पण भोंगे कशाला ? बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमान किती कोटी आत शिरलेत याचा काहीही पत्ता नाही. या मुसलमानांना हाकलून द्या हे मी कधीपासून बोलतोय. मग तेव्हा का नाही मला विचारले, हिंदूत्वाकडे चाललात का ? आम्हाला का विचारताय इकडे जाणार की तिकडे जाणार ?

भारत धर्मशाळा आहे का कुणीही इथे यायला. बांगलादेशातून भारतात यायला अडीच हजार रूपये लागतात. अडिच हजार रुपये दिले की बांगलादेशातून भारतात येतात. पाकिस्तानी नेपाळमार्गे इकडे येताहेत. समझौता एक्स्प्रेस बंद करा, भारत – पाकिस्तान बस सेवा बंद करा. हवेत कशाला त्यांच्याशी संबंध. उद्या जर युद्ध झाले तर आपल्याला आतच लढावे लागेल.

मी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पण चांगले केले तेव्हा अभिनंदन सुद्धा केले. ज्यावेळी मोदी यांनी ३७० कलम हटवले त्यावेळी अभिनंदन सुद्धा केले. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबद्दल निर्णय दिला तेव्हा मी बाळासाहेब हवे होते असे म्हणालो होतो. एनआरसीबद्दल चर्चा सुरू आहे. लोक बोलत आहेत. पण हवेत कशाला हे सगळे. ही सगळी माहिती पोलिसांकडे आहे. पोलिसांना एकदा ४८ तास द्या, अन् बघा ते काय करतील. एनआरसीवरून अनेक मोर्चे निघायला लागले. हजारो मोर्चे निघायला लागले. अनेक मुस्लिम रस्त्यावर यायला लागले. कलम ३७०, राम मंदिर याचा राग काढण्यासाठी या मुसलमानांनी मोर्चे काढले. बाहेरच्या मुसलमानांसाठी इथल्या मुसलमानांनी कशाला मोर्चे काढले. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. माझा रंग तोच आहे. हे धोके आपण नीट समजून घेणे गरजेचे आहे. राज ठाकरे विरोधासाठी विरोध करीत नाही.

जगभरात जा. यू ट्यूब उघडा. त्या देशांमधील सुरक्षा व्यवस्था. रेस्टॉरण्टमध्ये त्यांच्या पोलिसांच्या गाड्या लागतात. बाहेरून आलेल्यांकडून पासपोर्ट विचारतात. कारण अनेकजण तिथे गेले की पासपोर्ट फेकून देतात. पासपोर्ट नसेल तर आला तिथे जायचे. नाहीतर जेलमध्ये जायचे. तिकडे जाताना व्हिसा देताना चौकशी करतात. ज्याच्याकडे अमेरिकन, ब्रिटीश पासपोर्ट असतो, त्यांना जगात कुठल्याही देशात जायला व्हिसा लागत नाही. आपल्याला व्हिसा लागतो. आपल्याकडे सगळीकडून येतात. आपली धर्मशाळा झालीय. बाकीच्या देशांसारखे भारताने कडक व्हायला हवे. आपण ज्वालामुखी, अनेक बॉम्बवर आपण बसलेलो आहोत. कधी काय होईल ते सांगता येत नाही. एनआरसी वगैरे ठिक आहे. पण इथे आलेल्या बांगलादेशींना पहिल्यांदा हाकलून दिले पाहीजे. त्यासाठी मी केंद्र सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहे. माझ्याकडे एक माहिती आली आहे. ती माहिती मी देशाच्या गृहमंत्र्यांना व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आपल्याकडे काही असे भाग आहेत, तिथे अनेक मौलवी येताहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, प्रचंड मोठा कट शिजतोय. जर ही माहिती त्यांना असेल तर पोलिसांना मोकळे हात देणे गरजेचे आहे.

इतर राजकीय विचार आहेत. मध्यंतरी ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या २५ मार्चला टराटरा फाडेन. या देशात आलेले बाहेरचे मुसलमान बाहेर पाठविणे गरजेचे आहे. देशात निघालेल्या मोर्च्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. मोर्चाला उत्तर मोर्चाने. येत्या ९ फेब्रुवारीला बाहेरून आलेल्या मुसलमानांना बाहेर पाठवा या मागणीसाठी आझाद मैदानात मोर्चा काढणार आहे.

हे सुद्धा वाचा

भारतात मोडी लिपी नाही, तर फक्त मोदी लिपी दिसते : राज ठाकरे

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी