34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईएकाच दालनात दोन मंत्र्यांचा कारभार

एकाच दालनात दोन मंत्र्यांचा कारभार

टीम लय भारी

मुंबई : ‘कार्यालय देता का कार्यालय’ अशी केविलवाणी अवस्था मंत्र्यांची झाली आहे. मंत्रालय इमारतीमध्ये सगळ्या मंत्र्यांना सामावून घेईल इतकी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे अनेक मंत्र्यांना विधानभवनात कार्यालये देण्यात आली आहेत. पण विधानभवनात जाण्याची इच्छा बऱ्याच मंत्र्यांची नाही. दुसऱ्या बाजूला अनेक मंत्र्यांच्या दालनाची कामेही सुरू आहेत. या स्थितीमुळे धनंजय मुंडे व संजय बनसोडे या दोन मंत्र्यांचे काम एकाच दालनातून सुरू असल्याचे विचित्र चित्र दिसत आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सध्या तात्पुरत्या स्वरूपात सहाव्या मजल्यावरील कार्यालयातून काम करीत आहेत. त्यांचे मूळ कार्यालय पहिल्या मजल्यावर आहे. पण त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार काम करीत होते. अजित पवारांनी आता पहिल्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर आपला कारभार हलवला आहे. परंतु पहिल्या मजल्यावरील धनंजय मुंडेंच्या दालनाचे नुतनीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अजून किमान पंधरवडाभर तरी मुंडे यांना पहिल्या मजल्यावरील दालन मिळणार नाही. त्यामुळे सहाव्या मजल्यावर अजितदादांच्या दालनाला खेटूनच धनंजय मुंडेंचे तात्पुरते कार्यालय अजूनही कार्यरत आहे.

पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांना विधानभवनात दालन देण्यात आले होते. विधान भवनातील दालन स्विकारण्यास बनसोडे यांची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या दालनातच ठिय्या मांडला आहे. धनंजय मुंडे मंत्रालयात नसतात तेव्हा त्यांच्या कार्यालयात संजय बनसोडे आपला कारभार चालवतात. गंमत म्हणजे, या दालनात संजय बनसोडेंच्या बैठका सुरू असतात. पण तिथे अधिकारी मात्र धनंजय मुंडे यांचे असतात. त्यामुळे भेटायला येणाऱ्या लोकांची मात्र चांगलीच पंचाईत होत आहे.

पुढील पंधरवड्यात धनंजय मुंडे पहिल्या मजल्यावरील आपल्या दालनात प्रस्थान करतील. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील हे दालन रिकामे होईल. पण त्याचा ताबा बनसोडे यांना घ्यायचा आहे. मात्र अगोदरच्या नियोजनानुसार लगत असलेल्या अजितदादांच्या दालनातच हे दालन सामाविष्ठ करायचे होते. त्या ठिकाणी अजितदादांच्या अधिकाऱ्यांच्या केबिन्स व भेटायला येणाऱ्या लोकांसाठी प्रतिक्षागृह तयार करायचे होते. पण ही जागा आपल्यासाठी हवी असल्याचा आग्रह संजय बनसोडे यांनी धरला आहे. त्यामुळे अजितदादा आपल्या संभाव्य कार्यालयातील हा तुकडा आता बनसोडे यांनाच देवून टाकतील अशी चिन्हे आहेत.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी लवकर पहिल्या मजल्यावर स्थलांतर करावे याकडे संजय बनसोडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब थोरातांनी टाकलेला शब्द अजितदादांनी तात्काळ केला पूर्ण

Super EXCLUSIVE : धनंजय मुंडेंनी पंतप्रधान कार्यालयाचा अनागोंदी कारभार आणला चव्हाट्यावर

डॉ. आंबेडकरांच्या शिक्षण संस्थांसाठी १२० कोटींची गरज; उद्धव ठाकरे, अजितदादांकडे मंत्री संजय बनसोडेंची मागणी

आदित्य ठाकरेंच्या पावलावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचेही पाऊल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी