35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत ४५० दुकाने जळून खाक

पुण्यात फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत ४५० दुकाने जळून खाक

टीम लय भारी

पुणे : पुणे शहरातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रोडवरील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट येथे शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास अचानक भीषण आग (Fire) लागली. या आगीत सुमारे ४५० कापडाची दुकाने व गोदामे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जवळपास साडेतीन तासांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले असून सध्या कूलिंगचे काम सुरू असल्याचे कँटोन्मेंट अग्निशमन केंद्र आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

पुण्यातल्या एमजी रोडवर असणा-या या फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्यामुळे या भागामध्ये जाण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना मोठी कसरत करावी लागली. हे अडथळे पार करून काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या ५० जवानांसह १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत आगीने मार्केटमधील शेकडो दुकाने आगीत भस्मसात झाली होती.

दरम्यान, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लष्कर परिसरात आग लागण्याची दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. आठवडाभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज मार्केटलाही भीषण आग लागली होती. त्यामध्ये मार्केटमधील चिकन व मासळी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ फॅशन स्ट्रीट बाजारपेठही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने, तेथील व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे.

फॅशन स्ट्रीटवर लागलेल्या आगीची तीव्रता मोठी असून या दुर्घटनेत मार्केटचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन विभागाने पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागासोबत फॅशन स्ट्रीटचे फायर ऑडिट केले होते. त्यामध्ये फॅशन स्ट्रीटला आग लागण्याची भीती वर्तविण्यात आली होती. त्यामुळे बोर्डाने गाळेधारकांवर कारवाईची मोहीमही हाती घेतली होती. त्या विरोधात फॅशन स्ट्रीटमधील व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे ही कारवाई थंड बस्त्यात पडली होती. बोर्डाच्या अध्यक्षांनी काही महिन्यांपूर्वी फॅशन स्ट्रीटची पाहणी करत नव्याने फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी