31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीय'कोरोना'ची वर्षपूर्ती : मानवाला शहाणपणा शिकवणारा काळ

‘कोरोना’ची वर्षपूर्ती : मानवाला शहाणपणा शिकवणारा काळ

विजयालक्ष्मी तुकाराम खरजे

आज सकाळी सहजच दिनदर्शिकेवर नजर गेली. आजची दिनांक २२ मार्च २०२१ पाहिली अन् गतवर्षीच्या २२ मार्चची आठवण मनात तरळून गेली. याच दिवसापासून सुरू झालेला देशव्यापी लॉकडाऊन आठवला, त्यानंतर पुढे पुढे वाढत गेलेला लॉक डाउन अन् हळूहळू सुरू झालेले अनलॉक. सारं काही एखाद्या चित्रपटाप्रमाणे नजरेसमोरून सरकत होतं.

संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या कोरोना नावाच्या महाभयंकर राक्षसाचा थैमान सुरू झाला, तो चीनमधील ‘वुहान’ शहरातील पशु बाजारपेठेपासून. डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण येथे सापडला. वटवाघळांना मार्फत तो माणसापर्यंत येऊन धडकला.

कोरोनासारख्या साथी या आधी ही जगाने पाहिल्या होत्या, पण कोरोनाची साथ ही सर्व साथीपेक्षा वेगळी आणि अधिक व्यापक ठरली. त्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे दळणवळणाचा वेग आणि माहितीच्या प्रसाराचा वेग. हे दोन्ही वेग आजवरच्या मानवी इतिहासातील सर्वोच्च पातळीवर आहेत. चीन वरून संपूर्ण जगभर हा रोग एवढ्या झपाट्याने पसरला, की संपूर्ण जगाला टाळे लावून बंद करावे लागले.

जगभरातील प्रत्येक व्यक्तीला याची शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक झळ सोसावीच लागली. करोडो लोक मृत्युमुखी पडले. विकसित देशाची अर्थव्यवस्था कोसळली. तर विकसनशील देशांचे तर अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडले. अनेकजण देशोधडीला लागले. उद्योगधंदे बंद पडले. लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. जगामध्ये भय आणि क्लेशदायक परिस्थिती निर्माण झाली. सामाजिक स्थैर्य विस्कळीत झाले. सामाजिक अंतर किंवा फिजिकल डिस्टसिंगची संस्कृती शारीरिक अंतरा ऐवजी समाजात कायमचे सोशल डिस्टंसिंग रुजवेल की, काय अशी भीती वाटू लागली.

नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात, त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतातच ना! बुद्धीच्या जोरावर प्रतिसृष्टी निर्मित करण्याचे स्वप्न पाहणारा माणूस ‘लॉकडाउन’ नामक पिंजऱ्यात बंदिस्त झाला. सकारात्मक गोष्टींचा विचार केला, तर मानव कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हता, तो आता कुटुंबासाठी वेळ द्यायला लागला. नवनवीन पदार्थ घरीच बनवू लागल्यामुळे घरातील सात्विक अन्न खाल्ले जाऊ लागले, परिणामी बाहेरच्या खाण्याने होणारे आजार आणि त्यावरील खर्च ही कमी झाला. प्रत्येक जण आपापली कामे करू लागल्याने स्वावलंबी झाला. इंटरनेटच्या युगात कालबाह्य होत चाललेले खेळ एक पिढी दुसऱ्या पिढीला शिकवू लागली. नवीन तंत्रज्ञान सर्वच पिढीतील लोक आत्मसात करू लागले. ज्या मोबाईलच्या वापरावर शाळा, महाविद्यालयात बंदी होती तीच शाळा आणि महाविद्यालये मोबाईलवर ऑनलाईन सुरू झाली. पैशाची उधळपट्टी करणारे मोठमोठे सोहळे, लग्नकार्य कमी पैशात होऊ लागली. ‘थांबला तो संपला’ असे म्हणणारा माणूस ‘थांबला तो जगला’ असे म्हणू लागला.

माणूस आणि इतर सजीव सर्व निसर्गाचाच एक घटक आहोत. माणसाप्रमाणे इतर सजीवांचाही निसर्गावर तेवढाच अधिकार आहे. निसर्ग नियमांचे पालन माणसालाही करायलाच हवे,  माणूस हेच विसरून गेला. उद्भवलेल्या संकटाने माणसाची मती भानावर आणली. निसर्गाची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, याची समजच माणसाला मिळाली. नात्यांना महत्त्व द्यायला शिकविले. भारतीय परंपरेतील टाकाऊ ठरवल्या गेलेल्या गोष्टी जसे हस्तांदोलन न करता हात जोडून अभिवादन करणे, बाहेरून आले की, हात पाय धुणे. यांसारख्या स्वच्छतेची सवय अंगीकारणे गरजेचे झाले. योग, प्राणायाम सारख्या भारताने जगाला दिलेल्या ज्ञानाची खरी महती पटली. माणूस आयुर्वेदाशी पुन्हा नव्याने दोस्ती करू लागला.

खरंच, गेल्या वर्षभरात अतिसूक्ष्म विषाणूने किती उलथापालथ केली!

शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं,

‘एक विषाणू आला आणि खूप काही शिकवून गेला,

एक विषाणू आला आणि सारं आयुष्यच बदलून गेला!”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी