30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमनोरंजनSubhedar Movie : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय कोंढाण्याच्या लढाईचा थरार! नव्या...

Subhedar Movie : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय कोंढाण्याच्या लढाईचा थरार! नव्या सिनेमाचा पोस्टर लाँच

शिवराज अष्टक मधील पाचवे पुष्प 'सुभेदार' या सिनेमाचा पोस्टर चित्रपटाच्या टीमकडून लाँच करण्यात आला. या पोस्टरवरून आगामी चित्रपटात दिग्पाल लांजेकर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शूरतेची कथा मांडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या मराठी सिनेसृष्टीत सध्या ऐतिहासिक सिनेमांची लाट आली आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षात या सिनेमांच्या निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली ती म्हणजे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने. फर्जंद चित्रपटापासून सुरूवात केल्यानंतर दिगपाल लांजेकर याने ‘शिवराज अष्टक’ या मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली. या शिवराज अष्टक मधील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ या सिनेमाचा पोस्टर चित्रपटाच्या टीमकडून लाँच करण्यात आला. या पोस्टरवरून आगामी चित्रपटात दिग्पाल लांजेकर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शूरतेची कथा मांडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी दिग्पाल लांजेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चार यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतील ‘शिवराज अष्टक’ या शिवचरित्रावरील चित्रपट श्रुखंलेला तमाम शिवभक्त आणि रसिकांमध्ये खूपच लोकप्रियता मिळाली. त्यामुळे दिग्पालच्या आगामी चित्रपटात काय पहायला मिळणार? याबाबत सर्वांनाच कुतूहल होतं. नुकतीच ‘सुभेदार’ या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. ‘काळावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागाथा… ‘सुभेदार’ अशी या चित्रपटाची अतिशय समर्पक टॅगलाईन आहे. ‘सुभेदार’ या शीर्षकावरून हा चित्रपट सुभेदार तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा असल्याचं समजतं. त्यानुसार या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. पोटच्या मुलाचं लग्न बाजूला सारून किल्ले कोंढाण्याच्या शिखरावर स्वराज्याचं विजयी तोरण बांधण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका बलाढ्य योद्ध्याचा रोमहर्षक पराक्रम ‘सुभेदार’मध्ये अनुभवायला मिळेल.

 

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करणार आहेत. प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायण वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, विनोद निशिद जावळकर, शिवभक्त अनिकेत निशिद जावळकर, श्रुती दौंड या चित्रपटाचे निर्माते आहेत. जून २०२३ मध्ये ‘सुभेदार’ चित्रपट रसिक दरबारी सादर होणार आहे. अशी घोषणा चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर लगेचच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे फर्जंदनंतरच दिग्पालच्या नविन चित्रपटाची नेहमीच प्रेक्षकांना आतुरता असल्याचे पाहायला मिळत असते. त्याचप्रमाणे यंदाही अशाच प्रकारात प्रेक्षकांनी पोस्टरला डोक्यावर घेत सर्वत्र शेअर केल्याचे दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी