29 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeआरोग्यबीकेसी जम्बो कोविड रुग्णालयातील सावळागोंधळ आणि रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणा-यांवर कारवाईची मागणी

बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयातील सावळागोंधळ आणि रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणा-यांवर कारवाईची मागणी

टीम लय भारी

मुंबई : बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयात (BKC Jumbo Covid Hospital) मोठ्या प्रमाणावर गलथान कारभार सुरु आहे. एकीकडे कोरोनाने जवळची माणसे हिरावली जात आहेत तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणाने त्यांचे शेवटचे दर्शनही घेणे कुटुंबियांच्या नशीबी आले नाही. बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयातील या सावळागोंधळाची कसून चौकशी करावी आणि हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणा-यांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मालाड येथील भाजपा नगरसेविका योगिता सुनिल कोळी यांनी केली आहे.

बीकेसी जम्बो कोविड केंद्राने (BKC Jumbo Covid Hospital) घोळ घातल्याने नुकतेच ६७ वर्षीय संगीता सदानंद तनाळकर यांचा अंतिम विधी हा त्यांच्या कुटुंबाला करता आला नाही. संगीता तनाळकर यांचा मृतदेह रजनी परब यांचा समजून तो परब यांना देण्यात आला. परब यांनी अंत्यसंस्कारही केले. त्यानंतर चार दिवसांनी उघडकीस आले की ७२ वर्षीय रजनी परब या जीवंत असून त्या बीकेसी कोविड सेंटरमध्येच उपचार घेत आहेत. बीकेसी जम्बो कोविड केंद्राने केलेल्या घोळामुळे या दोन्ही कुटुंबांना प्रचंड मानसिक त्रास झाला.

दुसरीकडे महापालिका आर/ साऊथ वॉर रुममधील आरोग्य अधिका-याने साईनगर येथील अपूर्वा लॅबमध्ये टेस्टसाठी दिलेला कोरोना पॉजिटीव्हचा अहवाल आलेला नसतानाही कांदिवली येथील राजेश्वरी राजेश सावंत या ४१ वर्षीय महिलेला कोविड पॉजिटीव्ह असल्याचे पत्र देत बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयात १० एप्रिल रोजी उपचारासाठी पाठवले. बीकेसी कोवीड सेंटरमधील प्रशासन व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व योग्य उपचार न झाल्याने राजेश्वरी सावंत यांचा १४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर दुस-या दिवशी १५ एप्रिल रोजी राजेश्वरी या कोरोना निगेटीव्ह असल्याचा अहवाल देण्यात आला. या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? सदर महिला पॉजिटीव्ह नसल्याने त्या महिलेवर चुकीचे औषधोपचार झाल्याने तिचा मृत्यू झाला.

याबाबत राजेश्वरीच्या नातेवाईकांनी आणि काही लोकप्रतिनिधींनी सांगूनही त्यांच्या बोलण्याकडेही बीकेसीच्या डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. लोकप्रतिनिधींनाच जर हे डॉक्टर आणि डीन राजेश डेरे जुमानत नसतील तर येथे सर्वसामान्य जनतेचे काय होल असतील, हे निदर्शनास येते. कोणीही येथे फोन केला तरी ते गांभीर्याने घेत नाहीत. येथे रुग्णांवर योग्य उपचार न केल्याने रुग्णांचा नाहक बळी जात आहे. बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयात 3 दिवस राजेश्वरी यांच्यावर केवळ कोरोना संशयित म्हणून कोणत्या आधारावर उपचार केले? या तीन दिवसांत त्यांचे आरटी पीसीआर टेस्ट आणि सीटी स्कॅन का केले नाही? सर्वात गंभीर बाब म्हणजे योग्य उपचार होत नसल्याने व प्रकृती अधिकच खालावल्याने राजेश सावंत यांनी राजेश्वरी यांना 13 तारखेला दुपारी मालाड येथील खासगी रुग्णालयात हलवले. तेथे कोरोना पॉझिटीव्ह अहवाल नसल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे योग्य उपचाराअभावी 14 तारखेला रात्री त्यांचे निधन झाले. अतिशय गंभीर बाब म्हणजे अंत्यविधी झाल्यानंतर दुस-या दिवशी म्हणजे 15 तारखेला राजेश्वरी या कोरोना निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. याला नेमके जबाबदार कोण? जर कांदिवलीच्या लॅबने कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट दिलेला नव्हता, तर मग बीकेसी कोवीड रुग्णालयात कोणते उपचार केले आणि केले ते योग्य केले का, असा प्रश्न नगरसेविका योगिता कोळी यांनी केला आहे. तसेच राजेश्वरी सावंत यांच्या मृत्यूस जबाबदार असणा-यांवर खूनाचा गुन्हा दाखल करुन संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कोळी यांनी केली आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झाला आहे. अशावेळी बीकेसी जम्बो कोविड सेंटर रुग्णालयामध्ये कर्तव्यावरील डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्ड बॉय यांनी रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना योग्य प्रकारे उपचार देण्याची गरज आहे. रुग्णालय प्रशासनानेही रुग्णांकडे विशेष लक्ष देणे व मदतीचा हात देणे गरजेचे आहे. मात्र बीकेसी जम्बो कोविड सेंटर रूग्णालयासह मुंबईतल्या सर्वच कोविड सेंटरमधील डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय आणि प्रशासनाच्या उदासिन व भोंगळ कारभारामुळे सर्व ठिकाणी रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून त्यांचे नातेवाईकही हतबल झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे नगरसेविका योगिता कोळी यांनी सांगितले.

रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाहीत. कोणाचा मृत्यू झाला आणि कोणावर उपचार सुरु आहेत, याकडे येथील कर्मचा-यांचे योग्य लक्ष नसते. डॉक्टर आणि कर्मचारी कर्तव्यावर असताना रुग्णसेवा करण्याऐवजी व्हाटसअप आणि सोशल मीडियावर पोस्ट वाचण्यात दंग असतात. बाहेरुन रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि लोकप्रतिनिधींनी फोन करुन चौकशी केली तरी त्यांना नेहमीची ठरलेली उत्तरे दिली जातात. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो, असे त्या म्हणाल्या.

रुग्णांवर वेळेवर उपचार केले जात नाहीत. रुग्णांना वेळेवर जेवण, आहार दिले जात नाही. रुग्णांना दिला जात असलेला आहार निकृष्ठ दर्जाचा असतो. रुग्णांनी उलटी केल्याने येथील वॉर्डामध्ये अस्वच्छता असते. शौचालयांमध्येही घाण असते. ऑक्सीजन बेडवरील रुग्णांना शौचालयापर्यंत जाणे शक्य होत नसल्याने रुग्ण वॉर्डातच लघवी-संडास करत असल्याने येथील परिस्थिती अतिशय भीषण आणि गंभीर आहे. अशाप्रकारच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असून याप्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी नगरसेविका कोळी यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी