31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यराज्यातील शहरी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद राहणार : राजेश टोपे

राज्यातील शहरी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद राहणार : राजेश टोपे

टीम लय भारी

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या ३१ मार्चपर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात परीक्षा सुरू राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
दरम्यान, राज्यात कोरोनाचे २६ रुग्ण आढळून आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या संदर्भात निवेदन करताना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने वेळीच हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू केला आहे. राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरण तलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.

राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या काळात मंडळ परीक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट करताना परीक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत, याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे.

राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायिक, यात्रा, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 26 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे येथे १०, मुंबई ५, रायगड १, कल्याण १, अहमदनगर १, नागपूर ४, ठाणे १, यवतमाळ २ रूग्ण आढळून आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी