31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंच्या निवासस्थानी निर्णय घेणे ही सरकारची घटनाबाह्य कृती, अतुल लोंढे यांचा...

राज ठाकरेंच्या निवासस्थानी निर्णय घेणे ही सरकारची घटनाबाह्य कृती, अतुल लोंढे यांचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील टोल प्रश्नांबाबत आज शुक्रवारी, (13 ऑक्टोबर) सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत अंदाजे 2 तास चर्चा केली. ही चर्चा राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी झाली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील टोलप्रश्नांवर राज्य सरकारने मोठे निर्णय घेतल्याचे जाहीर केले. यावरुन आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सरकारवर टीका करत राज्य सरकारचे राज ठाकरेंच्या घरी जाऊन सरकारी निर्णय घेणे घटनाबाह्य असल्याचा आरोप केला आहे.

अतुल लोंढे राज्य सरकारवर टीका करत म्हणाले, “राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे. विरोधी पक्षाने जनतेचा एखादा मुद्दा सरकारकडे मांडला तर त्यावर सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो. कोणाच्या घरी मंत्री व अधिकारी पाठवून नाही.”


“राज्यातील सरकार विश्वास गमावलेले आहे म्हणून कोणीही येते व समांतर सरकार चालवू शकते अशा पद्धतीचा संदेश शिंदे सरकराचे मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. भ्रष्टाचार होत आहे, आम्ही भ्रष्टाचारी आहोत हे सरकारनेच मान्य केले आहे. तसेच टोल नाक्यांवर सरकारी कॅमेऱ्यांबरोबरच मनसेचे कॅमेरेही लावले जाणार आहेत, हे या घटनाबाह्य आहे. सरकारच्या कॅमेऱ्यांबरोबर मनसेचे कॅमेरे कशासाठी?” असं सवाल त्यांनी विचारला आहे.

अतुल लोंढे पुढे म्हणाले, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुरुवारी सायंकाळी टोल प्रश्नी बैठक घेतली आणि लगेच सकाळी रस्ते विकास मंडळाचे मंत्री दादा भूसे आदेशानुसार राज ठाकरे यांच्या घरी गेले. मंत्री भुसे व सरकारी अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. बेरोजगारांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, महागाईच्या प्रश्नावर हे सरकार एवढे तत्पर व गंभीर कधीच दिसले नाही पण राज ठाकरेंच्या मागण्यासंदर्भात सरकार मनसेच्या दारी गेले.”

“शिंदे सरकारला सत्तेत राहण्याचा काही अधिकार राहिलेला नाही. या सरकारचे उफराटे काम आहे. शासन आपल्या दारी आणि लोक देवाघरी तसेच भ्रष्टाचाराच्या दारी शासन आपल्या घरी, अशा पद्धतीची ही व्यवस्था असून हे निषेधार्ह आहे. सरकारवर लोकांचा विश्वास असला पाहिजे, पण या सरकारने आपली विश्वासार्हता पूर्ण गमावली आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही,” असे लोंढे म्हणाले.

हे ही वाचा 

टोलविरोधात राज ठाकरेंची भूमिका मवाळ?

टोलनाक्यांच्या सुविधांवरून राज ठाकरे आक्रमक

टोलनाक्यांच्या सुविधांवरून राज ठाकरे आक्रमक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टोलप्रश्नाबाबत पुन्हा एकदा आंदोलन चालू केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राज्यात कोणत्याच टोलनाक्यावर चारचाकी वाहनांवर टोल आकारला जात नाही’ असे व्यक्तव्य केले होते. या व्यक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, ‘राज्यात टोलमाफी बंद न केल्यास राज्यातील टोलनाके जाळून टाकू’ असा धमकीवजा इशारा त्यांनी सरकारला दिला होता.


त्यानंतर, गुरुवारी (12 ऑक्टोबर) ‘सह्याद्री’ अतिथिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली होती. या भेटीत टोलप्रश्नाबाबत तरतुदी, टोलमधील पारदर्शकता, टोलच्या मोबदल्यात जनतेला मिळणाऱ्या सुविधा अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली, पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे, शुक्रवारी दादा भुसे यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट देऊन सुमारे 2 तास चर्चा केली. त्यानंतर काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी