34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब थोरात आज राज्यपालांना भेटणार

बाळासाहेब थोरात आज राज्यपालांना भेटणार

टीम लय भारी

मुंबई : कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजपा सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबित करून ही विधेयके मंजूर करुन घेतली. केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मूल्ये व संसदीय नियम पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावेत यासाठी देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. काँग्रेस पक्ष या शेतक-यांसोबत असून कायदे मागे घेईपर्यंत संघर्ष करत राहील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते आज दुपारी ३ वाजता मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ४ वाजता राजभवनावर जाऊन शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार आहेत.

केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. राज्यभरात ‘स्पिकअप फॉर फार्मर्स’ ही ऑनलाईन मोहीम चालवण्यात आली. या मोहिमेत काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेला शेतक-यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जनतेने भाजपा सरकार व त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करून शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्याची मागणी समाजमाध्यमांवर व्हिडीओ अपलोड करून केली, असे थोरात यांनी सांगितले.

याचबरोबर, कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतक-यांना मोठा आधार आहेत. हा आधारच मोडीत काढण्याचे काम या नव्या कायद्यामुळे होणार आहे. शेतक-यांना आर्थिक आधार मिळत होता. तो ही या नव्या कायद्यामुळे संपुष्टात येणार असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होईल. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अजून बळकट केले पाहिजे, किमान आधारभूत किंमतीची तरतूद नव्या कायद्यात असली पाहिजे या मागण्यांसह काँग्रेस पक्ष शेतक-यांबरोबर आंदोलनात उतरला आहे. हे काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर आंदोलन, मोर्चे काढणार आहे. तसेच एक कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार आहे. अन्नदात्याला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष केंद्रातील भाजपा सरकार विरोधात संघर्ष करत राहील, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी