30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षणावरुन उदयनराजे आणि संभाजीराजे आक्रमक

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन उदयनराजे आणि संभाजीराजे आक्रमक

मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्यांचे आरक्षण रद्द करा : उदयनराजे

टीम लय भारी

सातारा : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे. तसेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे या सरकारचे अपयश आहे, असे विधान विरोधी पक्षातील नेते वारंवार करत आहेत. यातच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देता येत नसेल तर, सगळ्यांचे आरक्षण रद्द करा, अशी मागणी केली आहे. तसेच गुणवत्तेनुसार मेरिटवर सर्वांची निवड करा, असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अनेक समाजाला आरक्षण मिळाले आहे. यामुळे मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही प्रवेश मिळत नाही. मात्र, इतर समाजातील विद्यार्थ्यांना कमी गुण मिळूनही प्रवेश मिळतो. प्रवेश न मिळाल्याने मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत. आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा, असे उदयनराजे म्हणाले.

…तर त्यांच्या नांग्या ठेचाव्या लागतील – संभाजीराजे

मराठा आरक्षणावरून छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावण्याचे उद्योग कोणी करत असेल तर त्याच्या नांग्या ठेचाव्या लागतील, असे खासदार संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये ते बोलत होते. आमच्यात कोणताही मतभेद नाही. मराठा समाजाचे नेतृत्व कोणीही करावे. आपण समाजाचा सेवक म्हणून काम करत आहोत, असेही संभाजीराजेंनी सांगितले. तसेच अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचे स्वराज्य निर्माण केलेल्या छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून या वारशाला धक्का लागेल असे कोणतेही कृत्य आपण करणार नसल्याचेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.

मी मराठा समाजाचा सेवक : संभाजीराजे

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली. छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलो आहे. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचे मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्यासोबत राहणार, असे संभाजीराजे म्हणाले.

मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आक्रमक आंदोलने

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्याविषयी मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आक्रमक आंदोलने सुरू आहेत. काही जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोरही ढोल बजाओ आंदोलने केली जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आग्रही आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी