34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रThackeray government अखेर सरकार जागे झाले - धार्मिक स्थळे उघडण्यावरुन भाजपची टीका

Thackeray government अखेर सरकार जागे झाले – धार्मिक स्थळे उघडण्यावरुन भाजपची टीका

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील मंदिरे पाडव्यापासून (सोमवार) उघडण्यास अखेर राज्य सरकारने (Thackeray government) परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हा निर्णय आज जाहीर करण्यात आला. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मंदिरे उघडण्यासाठी भाजपाकडून राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलने करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्यांनी आम्ही केलेल्या आंदोलनामुळेच अखेर सरकार जागे झाल्याचे ट्विट ठाकरे सरकार विरोधात केले आहेत.

भाजपने सरकारचे डोळे उघडले, म्हणुनच मंदिराचे दार उघडले! – नितेश राणे

”भाजपनी सरकारचे डोळे उघडले.. म्हणुनच मंदिराचे दारे उघडले!! सगळ्यांचे अभिनंदन…” असे म्हणत नितेश राणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपा महाराष्ट्रला टॅग केले आहे.

उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचले – प्रवीण दरेकर

त्याआधी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील, ”उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचले. महाराष्ट्रातील लाखो वारक-यांची जी मागणी होती. हिंदुत्व प्रेमी जनतेची मागणी होती. किंबहुना मंदिरावर असणा-या व्यावसायिकांची मागणी होती. त्यांचा रेटा दबावाने या ठिकाणी शासनाला निर्णय घ्याव लागला. उशीरा का होईना, घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो.” अशी या निर्णयावर प्रतिक्रिया दिलेली आहे.

कुंभकरण झोपेतील डरपोक सरकार अखेर जागे झाले – राम कदम

भाजपा आमदार राम कदम यांनी ट्विट करुन अखेर सरकार जागे झाल्याचे म्हटले आहे. तसेच, जनतेचा हा मोठा विजय आहे. कुंभकरण निर्द्रावस्थेत असलेलं सरकार अखेर जागं झालंय, डरपोक सरकारचा हा मोठा पराभव आहे, असा टोलाही कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला – तुषार भोसले

आचार्य तुषार भोसले यांनीही ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला असे म्हणत हिंदुत्वाचा मोठा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तुषार भोसले यांनी मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन केले होते.

दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरे मात्र उघडण्यास आतापर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती. या मुद्यावरून भाजपाने आक्रमक धोरण स्वीकारले होते. शिवाय, वारकरी संप्रदायामध्येही सरकारबद्दल नाराजी वाढत होती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरेही खुली करावीत, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी