28 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमहाराष्ट्रगणरायाच्या आगमनाअगोदर रस्ते खड्डेमुक्त करा; अश्विनी भिडे यांचे आदेश 

गणरायाच्या आगमनाअगोदर रस्ते खड्डेमुक्त करा; अश्विनी भिडे यांचे आदेश 

मंगळवारपासून राज्यात गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाचदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्त्यावरील खड्डे बुजवायला आता पालिका अधिकाऱ्यांची घाई सुरु झाली आहे. शनिवारी तातडीने आढावा बैठकीचे आयोजन करून मुबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी गणपती आगमनाअगोदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या.

गणपती उत्सवाच्या तयारीसाठी प्रभारी आयुक्त आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी शनिवारी बैठकीचे आयोजन केले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व सहायक आयुक्त या बैठकीस उपस्थित होते. मुंबईत गणपती उत्सवानिमित्ताने भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण राखताना पोलिसांसह पालिका अधिकाऱ्यांचीही कसरत होते.

गणपती उत्सवात मोठ्या आकाराच्या मूर्ती आणताना रस्त्यावर खड्डा असल्यास मार्गक्रमणात बाधा येते. कित्येकदा वाहनाचे चाक खड्ड्यात रूतल्यास गणपती मुर्तीचा तोल जात रस्त्यावर पडण्याचीही शक्यता असते. अकरा वर्षांपूर्वी परळ येथील तेजुकाया मंडळाची मूर्ती रस्त्यावर पडून तुटल्याने भाविकांचा संताप अनावर झाला. गणपतीच्या मूर्तीचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकारांनाही भाविकांनी मारहाण केली. ही घटना लक्षात घेता रस्त्यावरील खड्डे तातडीने भरा जेणेकरून गणपती आगमन आणि विसर्जनाला कोणतीही बाधा येणार नाही.

महानगरपालिकेने धोकादायक पुलांची नावे यापूर्वीच जाहीर केली आहेत. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून रहदारी सुरळीत ठेवावी, तसेच पुलांच्या दुतर्फा माहिती फलक लावावेत, अशा सूचनाही अश्विनी भिडे यांनी केल्या.
रस्त्यांप्रमाणेच लहान सहान रस्ते, गल्लीबोळ, झोपडपट्टी आणि तत्सम वस्ती अशा सर्व ठिकाणी स्वच्छता राखण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले.
गणेशोत्सवासाठी पालिकेची तयारी 
– विसर्जनासाठी १९१ कृत्रिम तलावांची निर्मिती
– मिरवणूक मार्गातील झाडांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण
– पालिका अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या वायर काढल्या
– प्रमुख विसर्जन स्थळावर मोफत पेयजल सुविधा
– विसर्जन स्थळानजीक सशुल्क प्रसाधनगृह नागरिकांना विनामूल्य उपलब्ध 
– उत्सव काळात वाहतुकीचा विचार करता विसर्जन. स्थळाजवळ शक्य तितके वाहनतळ विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
– संवेदनशील विसर्जन स्थळावर जर्मन तराफे उपलब्ध होणार
– सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडप परिसरात अधिकाधिक कचरा संकलन पेट्या ठेवणार
– उत्सव काळात मिठाई दुकाने, आस्थापनांची अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने नियमितपणे तपासणी
– विसर्जन ठिकाणी अधिकाधिक निर्माल्य कलश, निर्माल्य वाहक फिरते वाहन उपलब्ध असेल
– धोकादायक पुलांच्या दोन्ही बाजूंना अधिक अंतरापर्यंत माहिती फलक लावणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी