31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Bhushan : महाराष्ट्राची मान संपूर्ण जगात उंचावणारे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना...

Maharashtra Bhushan : महाराष्ट्राची मान संपूर्ण जगात उंचावणारे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टीम लय भारी

नांदेड : सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले (ranjitsinh disale) यांनी महाराष्ट्राची मान संपूर्ण जगात उंचावलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या सुपूत्रास महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केले आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना नुकताच आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लोबल टिचर प्राईज हा सन्मान देण्यात आला. सन्मानचिन्हासह 7 कोटी रूपयांची रक्कम त्यांना पुरस्काराच्या रूपाने मिळणार आहे.

शिक्षण क्षेत्रात खास करून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे. महाराष्ट्राच्या या सुपूत्राने राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळविले आहेत. देशासह जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे नाव त्यांनी अजरामर केले आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी निम्मी रक्कम त्यांच्या सोबत अंतिम फेरीत आलेल्या स्पर्धकांना शैक्षणिक कामासाठी प्रदान करण्याचा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखविला आहे. त्यांच्या या कृतीतून महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले संस्कार व शिक्षणाचे महत्व अधोरेखित होते.

अशा या सर्वगुणसंपन्न शिक्षकास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन गौरविल्यास अभिजात गुणसंपन्न शिक्षकाचा गौरव केल्याचे समाधान महाराष्ट्रातील तमाम जनतेला मिळणार आहे. त्यामुळे अशा या गुणी शिक्षकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात यावा अशी मागणी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हा पुरस्कार डिसले यांना देण्यात यावा यासाठी पुढाकार घेण्याची विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडेही केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी